Lokmat Sakhi >Health >Pregnancy > गरोदरपणात योगासने शिकण्याचे आणि नियमित योगा करण्याचे फायदे सांगणाऱ्या एका आईची गोष्ट !

गरोदरपणात योगासने शिकण्याचे आणि नियमित योगा करण्याचे फायदे सांगणाऱ्या एका आईची गोष्ट !

गरोदरपणा म्हणजे केवळ आरामपण नव्हे. उलट या काळात ॲक्टीव्ह असणं, हे गर्भवतीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच महत्त्वाचं आहे. म्हणूनच तर गरोदरपणात नियमित योगाभ्यास केल्याने काय फायदे होऊ शकतात, याविषयी एका आईने सांगितलेला हा स्वानुभव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 05:01 PM2021-07-26T17:01:39+5:302021-07-26T17:38:49+5:30

गरोदरपणा म्हणजे केवळ आरामपण नव्हे. उलट या काळात ॲक्टीव्ह असणं, हे गर्भवतीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच महत्त्वाचं आहे. म्हणूनच तर गरोदरपणात नियमित योगाभ्यास केल्याने काय फायदे होऊ शकतात, याविषयी एका आईने सांगितलेला हा स्वानुभव..

Benefits of yoga in pregnacy and for normal delivery | गरोदरपणात योगासने शिकण्याचे आणि नियमित योगा करण्याचे फायदे सांगणाऱ्या एका आईची गोष्ट !

गरोदरपणात योगासने शिकण्याचे आणि नियमित योगा करण्याचे फायदे सांगणाऱ्या एका आईची गोष्ट !

Highlightsगरोदरपणात प्रत्येक trimester साठी वेगवेगळी आसनं व त्यांचे फायदे आहेत. तसेच शेवटच्या तीन महिन्यात नाॅर्मल डिलिव्हरी व्हावी, याकरीता काही विशेष आसने आखून दिलेली आहेत.

मानसी भिंगार्डे तानावडे
सातव्या महिन्यात सोनोग्राफी केल्यावर कळलं बाळ breech आहे. म्हणजेच पोटात बाळ आडवं आहे. त्यात माझा fibroids चा भूतकाळ. त्यामुळे नैसर्गिकरित्या डिलिव्हरी होणं कठीणच दिसत होतं. सामान्यपणे डिलिव्हरी जवळ आली की, बाळाचं डोकं खाली असावं लागतं. तेव्हाच नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. 
मी स्वतः योगा आणि मल्लखांब यांची कोच असल्याने गरोदरपणात योगासनांचा होणारा फायदा जाणून होते.
त्यासाठी गरोदरपणात आणि नंतर कोणकोणती आसनं करायची, कधी- कधी करावीत हे शिकून घ्यावं असं वाटलं. म्हणूनच गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यापासून मी प्रोफेशनल कोर्स सुरू केला. त्यासोबतच शिकलेली आसनं नियमितपणे करायला सुरूवात केली.

 

सध्या सगळीकडेच सिझेरियन करण्याची लाट आली आहे. अनेक डॉक्टर्स नैसर्गिक कळांची वाट न पाहता थेट
सिझेरियनची तारीखच देतात किंवा अनेकदा पालकही त्यांना हव्या त्या शुभ (?) दिवशी बाळाचा जन्म व्हावा यासाठी सिझेरियन करण्याला प्राधान्य देतात. शहरांमध्ये तर हे लोण फारच पसरलं आहे. नैसर्गिकरित्या बाळंतपण झाल्याने स्त्री लवकरच पुन्हा शारिरीक आणि मानसिकरित्या पूर्ववत होते. ऑपरेशनची वेळ न येता नैसर्गिक बाळांतपण व्हावं म्हणून विशिष्ट योगासनांचा प्रचंड फायदा होतो, हे मला माहित होतं. त्यामुळे मीही डॉक्टरांना ठामपणे सांगितलं, की कळा द्यायला मी तयार आहे आणि मला नैसर्गिकरित्याच बाळंत व्हायचं आहे.
माझा योगाभ्यास तर सुरू होताच. गरोदरपणातल्या योगासनांचा फायदा म्हणजे माझ्या बाळाचं डोकं हळूहळू खालच्या बाजूला सरकलं आणि शेवटच्या सोनोग्राफीमध्ये ते नॉर्मल डिलिव्हरीसाठी योग्य अशा ठिकाणी आलं. हुश्श... बरं वाटलं. ९ व्या महिन्यात माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि बाळ सुखरूप जन्माला आलं.

 

आई झाल्याचा आनंद आभाळभर आहे. पण गरोदरपणाच्या काळात मोठ्ठालं पोट घेऊन तासनतास लॅपटॉपसमोर बसून अखेरीस मी योगाभ्यास विषयक कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला, याचाही आनंद तेवढाच आहे.  आज मी certified pre & post natal yoga trainer झाले आहे. 

गरोदरपणाचे ९ महिने हे ३ भागांत विभागले जातात. त्याला trimester असं म्हणतात. कोर्स करताना समजले की, प्रत्येक trimester साठी वेगवेगळी आसनं व त्यांचे फायदे आहेत. तसेच शेवटच्या तीन महिन्यात नाॅर्मल डिलिव्हरी व्हावी, याकरीता काही विशेष आसने आखून दिलेली आहेत. मी शिकलेल्या सर्व आसनांचा नियमित सराव केला आणि शरिराला नॉर्मल डिलिव्हरीसाठी तयार केलं.

 

 

योगासनांचा असा झाला फायदा
- गरोदर असताना सूक्ष्म योगा, आसने, ध्यान आणि प्राणायाम केल्याने थकवा, चिड़चिड़ हे कधी जाणवलेच नाही. अर्धकटी चक्रासन, विपरीत करणी, बद्ध-कोणासन, ताड़ासन अशी आसनं मी माझ्या गरोदरपणात केली. ही आसनं एखादी सामान्य स्त्रीदेखील करु शकते. क्रीडा क्षेत्रात असून देखील आता माझा सराव होत नाही, त्या कारणामुळे काही आसने करताना अडचण यायची. त्यात मोठ्ठालं पोट. परंतु योगा हा असा प्रकार आहे ज्यामध्ये तुम्हाला जमतं तेवढं केलं तरी त्याचा फायदाच होतो. 
- योगसने अगदी शेवटच्या महिन्यापर्यंत करु शकतो. त्याचा परिणाम म्हणजे रक्तप्रवाहात वाढ, चांगली झोप, प्रेग्नन्सीमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होणे, पेल्विक (pelvik) muscle उघडणे, डिलिव्हरीनंतरच्या अडचणी कमी होणे इत्यादी.

 

डिलिव्हरीनंतरही योगासने
डिलिव्हरी नंतर देखील मी योगासनं सुरूच ठेवली. ज्यामुळे मी पूर्ववत झाले. शरिराने आणि मनानेही. ज्या आता नव्याने आई झाल्या आहेत, त्यांना माहितीच असेल की बाळाचं सगळं करता करता किती थकवा येतो. खासकरून ज्या छोट्या कुटुंबात राहतात. गरोदरपणापासूनच योगासनं केल्याने आणि आताही नियमित योगासनं करत असल्याने मला हा थकवा फारसा जाणवत नाही. आई होणाऱ्या प्रत्येकीचं मन आणि शरीर येणाऱ्या बाळासाठी तयार व्हावं, यादृष्टीने मी ऑनलाईन pre & post natal
yoga चे सेशन्स सुरू करत असून त्याच्या माध्यमातून मी स्वत: जे शिकले, ज्याचा अनुभव घेतला तोच आता सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे.

(( लेखिका मानसी भिंगार्डे तानावडे या योगा आणि मल्लखांब काेच आहेत. संपर्क- ९०२९२१३३८४.))
 

Web Title: Benefits of yoga in pregnacy and for normal delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.