Join us   

काजोलची बहीण तनिषाने केलं एग फ्रीजिंग, म्हणते मूल हवं तेव्हा पाहू, गरज काय लग्नाची ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 1:17 PM

बॉलीवूड अभिनेत्री काजोलची लहान बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची कन्या अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिने मुल होण्यासाठी लग्नाची गरजच काय ? असा प्रश्न उपस्थित करत तिच्या आयुष्यातील एका सगळ्यात मोठ्या रहस्याचा उलगडा केला आहे.

ठळक मुद्दे फ्रिज केलेला एग फलित होऊन गर्भधारणा होईलच याची काहीही खात्री नसते.त्यामुळे एग फ्रिजिंग करू इच्छिणाऱ्या महिलांनी याबाबतची मानसिक तयारी ठेवावी. 

तनिषा मुखर्जी हिने तिच्या खाजगी आयुष्यातील गुपिते नुकतीच उघड केली आहेत. अजूनही अविवाहित असणारी तनिषा म्हणाली, लग्न करणं आणि आई होणं हे कोणत्याही स्त्रीसाठी तिच्या आयुष्यातलं अंतिम ध्येय होऊ शकत नाही. मलाही आई होण्याची घाई नाही, पण भविष्यात जर मला आई व्हावसं वाटलं, तर त्यासाठी मी एक पाऊल मात्र जरूर उचलले असून वयाच्या ३९ व्या वर्षीच माझं एग फ्रिजिंग करून घेतलं आहे. 

 

सध्या तरी तिला आई होण्याची कोणतीही घाई नाही. पण केवळ वय झालं म्हणून आपण मातृत्वापासून वंचित राहू नये, म्हणून तिने हा निर्णय घेतलेला आहे. याबाबत आणखी विस्ताराने सांगताना तनिषा म्हणाली, की वयाच्या ३३ व्या वर्षीच खरंतर मला माझं एग फ्रिजिंग करून घ्यायचं होतं. पण तेव्हा एग फ्रिजिंग करून घेणं माझ्या तब्येतीसाठी योग्य नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच मूल जन्माला घालण्यासाठी जेव्हा अन्य कोणतेही पर्याय नसतील, तेव्हाच हा मार्ग निवडावा असाही सल्ला दिला होता. त्यामुळे मी आणखी काही वर्षे वाट पाहिली आणि त्यानंतर वयाच्या ३९ व्या एग फ्रिजिंग केले. 

 

एग फ्रिजिंगमुळे वाढले वजन एग फ्रिजिंग करून घेणे हा माझ्यासाठी खूप छान आणि आनंददायी अनुभव होता. एग फ्रिजिंग करताना शरीरात प्रोजेस्टरॉन हार्मोनचा मोठा मारा केला जातो. त्यामुळे ही प्रक्रिया झाल्यानंतर माझं वजन देखील खूप वाढलं होतं. या प्रक्रियेत केवळ वजनच वाढत नाही, तर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त ग्लो येतो आणि तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता. गरोदर महिलांच्या चेहऱ्यावरचं तेज मला विलक्षण आवडतं, असंही तनिषाने म्हंटलं आहे. या सगळ्या प्रक्रियेनंतर आपण पुन्हा मेहनत घेतली आणि फिट झालो, असंही तनिषाने म्हंटलं आहे. 

 

काय आहे एग्स फ्रीझिंग? ग्स फ्रीझिंगच्या प्रक्रियेमध्ये, निरोगी एग्स स्त्रियांच्या अंडाशयातून काढून प्रयोगशाळेत साठवली जातात. एग्स फ्रिज झाल्यानंतर जेव्हा एखाद्या स्त्रीला आई होण्याची इच्छा असते, तेव्हा ती तिच्या निरोगी एग्ससह गर्भ धारणा करू शकते.

 

एग फ्रिजिंगचे धोके काय ? एग फ्रिजिंगमुळे अनेकदा थकवा, मळमळ, डोकेदुखी, पोटदुखी, स्तन दुखणं असा त्रास होऊ शकतो. क्वचित केसेसमध्ये रक्ताच्या गाठी, पोटदुखी आणि उलट्या होऊन दवाखान्यात दाखल व्हावं लागतं. मात्र याचं प्रमाण अत्यल्प असतं. फ्रिज केलेला एग फलित होऊन गर्भधारणा होईलच याची काहीही खात्री नसते. साठवणुकीच्या प्रक्रियेत सगळेच एग्स टिकाव धरू शकतात असं नाही. त्यामुळे एग फ्रिजिंग करू इच्छिणाऱ्या महिलांनी याबाबतची मानसिक तयारी ठेवावी. 

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीकाजोल