Join us   

स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी काही दुखलं तर पेनकिलर गोळ्या घ्याव्या का? डॉक्टर सांगतात की...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 4:28 PM

Breast Feeding Week 2021 : या कालावधीत कोणत्याही औषधांचा अतिडोस घेऊ नये, काहीही दुखत असल्यास सतत पेनकिलर घेणं टाळा.

ठळक मुद्दे डॉक्टरांकडून मातांना दिली जाणारी बहुतेक औषधे त्यांच्या मुलांना हानी पोहोचवत नाहीत.गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान करतानाही आईनं औषधोपचार नेहमी वैद्यकीय देखरेखीखालीच घ्यायला हवेत. 

कोणत्याही गोळ्या, औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानं लोक  घेतात. पण स्तनपान करत असलेल्या स्त्रियांना मात्र कोणतीही समस्या उद्भवल्यास यासाठी गोळ्या घ्यायच्या की नाही असा प्रश्न पडतो. कारण बाळावर याचा काही परिणाम होईल का? दूध योग्य प्रमाणात बाळाला मिळू शकेल का? अशा अनेक शंका महिलांच्या मनात असतात. डॉ. परवीन रुशनाईवाला, (स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ, सैफी हॉस्पिटल) यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

स्तनपानादरम्यान औषधं घ्यावीत की टाळावीत?

डॉ. परवीन यांच्यामते स्तनपान करणार्‍या आईने आपला आहार आणि स्वच्छतेबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. स्तनपान आणि औषधांबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. त्यामुळे अनेकदा महत्वाची औषधं घेणंही महिला टाळतात. डॉक्टरांकडून मातांना दिली जाणारी बहुतेक औषधे त्यांच्या मुलांना हानी पोहोचवत नाहीत.

गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान करतानाही आईनं औषधोपचार नेहमी वैद्यकीय देखरेखीखालीच घ्यायला हवेत. पहिले तीन महिने हा एक महत्वपूर्ण कालावधी आहे जिथे फॉलिक एसिड व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची औषधे टाळली जातात. जो केवळ सुरक्षिततेचा उपाय नसून मज्जातंतू नलिकाचे दोष टाळण्यासाठी आवश्यक असतो.

काही रूग्णांना गंभीर मळमळ किंवा उलट्यांचा त्रास असल्यास डॉक्टरांकडून कधीकधी औषधे सुरक्षितपणे लिहून दिली जातात. या कालावधीत कोणत्याही औषधांचा अतिडोस घेऊ नये, काहीही दुखत असल्यास सतत पेनकिलर घेणं टाळा. गंभीर आजार  असल्यास डॉक्टरांना आईसह बाळाचेही आरोग्य विचारात घ्यावे लागते. पण तुम्ही सामान्य, सर्दी, कणकण असल्यास बाळाला दूध देऊ शकता.

बाळाला सतत भूक लागत असेल तर दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम होतो?

केवळ स्तनपानासाठीच नव्हे तर आईच्या संपूर्ण निरोगी आयुष्यासाठी तिने संतुलित आहार घेणे गरजेचे असते .यासाठी बाळाच्या आईने कोणतेही खाद्यपदार्थ टाळण्याची गरज नाही. काही मुलांना सतत थोड्या थोड्या वेळाने दूध हवे असते. दूध मिळाल्यास मुलं रडतात किंवा अस्वस्थ होतात.

असे सतत दूध पाजल्याने दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम होतो, हा काही महिलांमध्ये असलेला एक गैरसमज आहे. त्यामुळे बाळाच्या गरजेनूसार त्यांना पूरेसे दूध द्या.  बाळाची भूक तरीही पूर्ण होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं आहार बदलून पाहा.

स्तनदा मातांनी हे पदार्थ खाल्ल्यास त्यांचे दूध नक्कीच वाढू शकेल

दूध वाढविण्यासाठी आईने लोणी, तूप, दूध हे पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजेत.

अळीव अशा दिवसांमध्ये अतिशय उपयुक्त ठरतात. अळीवामुळे कंबरेचे स्नायू तर मजबूत होतातच पण त्यासोबतच

आईला भरपूर दूध येण्यास मदतही होते. अळीवाची खीर, अळीवाचा शीरा आपल्याकडे खूप जुन्या काळापासून बाळांतिणींना दिला जातो. त्यामुळे स्तनदा मातांनी दूध वाढविण्यासाठी अळीव अवश्य खावेत.

दूध कमी येत असेल तर स्तनदा मातांचे पाणी पिणे कमी होते आहे हे लक्षात घ्यावे. त्यामुळे भरपूर पाणी पिणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आहारात लिक्वीड गोष्टी घेत जाव्यात. योग्य प्रमाणात सूप घ्यावे. तसेच वरण पोळी, पातळ भाजी आणि पोळी कुस्करून खाणे वाढवावे.

डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्याव्या. पालेभाज्या तसेच कडधान्यांचा आहारातील समावेश वाढवावा. 

दूध वाढविण्यासाठी बदाम आणि खारीक खाणेही खूप उपयुक्त ठरते.शतावरी कल्प नियमितपणे घेतल्यासही दुधात वाढ होते, असा अनेक जणींचा अनुभव आहे. 

डाळिंब, सफरचंद आणि टरबूज ही फळेही दूध वाढीसाठी गुणकारी ठरतात. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यप्रेग्नंसीगर्भवती महिला