डिलिव्हरीनंतर काही आठवड्यानंतर आई ज्यावेळी पुन्हा कामाला बाहेर जाण्याचा किंवा बाळाला काही काळासाठी घरी ठेऊन बाहेर जाण्याचा विचार करते तेव्हा तिच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा उभा राहतो की बाळाला त्यावेळात स्तनपानाचं काय? अंगावर पिण्याच्या वयातलं मूल घरी ठेवून बाहेर जाताना आईला फार त्रास होतो, जीव तुटतो. वाटतं, आपलं बाळ भुकेलं होईल आणि आपण त्याला दुध पाजू शकत नाही. त्यावर उपाय म्हणजे शक्य असेल तेव्हा आईनं आपलं दूध काढून ठेवणं आणि पुरेशी काळजी घेऊन बाळ सांभाळणाऱ्या कुणी ते बाळाला देणं. मात्र ते कसं करायचं? पंप वापरावा का? पंप वापरणं अनेकींना किचकट वाटतं. दूध काढून ठेवणं त्रासदायकही वाटतं. तर हे जमवायचं कसं?
दूध पंपाने काढण्यासंदर्भातले समज-गैरसमज?
पंप वापरल्याने स्तनातील संपूर्ण दूध काढून घेता येतं, जेणेकरून जास्त दूध तयार होतं. पंप वापरण्याच्या पूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवा किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने निर्जंतुक करून घ्या. तुमचे स्तन, तुम्ही जिथे पंप करणार आहात ती जागा स्वच्छ आणि पंपिंगसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, उदा. पंप, दूध साठवण्याच्या बाटल्या निर्जंतुक केलेल्या आहेत ना याची खात्री करून घ्या. तुम्हाला जर पंपिंग करायला अडचण येत असेल, तर खालील सूचना वापरून तुम्ही चांगल्या तऱ्हेने दूध पंप करू शकता. तुमच्या बाळाचा विचार करा. तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे त्याचा विचार करा. तुमच्या बाळाच्या अंगाचा गंध येणारा त्याचा कपडा किंवा पांघरून जवळ ठेवा. स्तनावर ओलसर कोमट कपडा लावा. स्तनाग्रे हळुवार चोळा. रिलॅक्स करणारा एखादा प्रसंग डोळ्यासमोर आणा आणि दूध वाहतं आहे असा विचार करा.
दूध कसं काढायचं?
तुम्ही हाताने किंवा यंत्राने दूध काढून साठवून ठेवू शकता. दूध काढण्याचा काही पद्धती पुढीलप्रमाणे आहेत. हाताचा अंगठा आणि बोटं वापरून स्तन दाबून दूध काढणं. यासाठी कौशल्य लागतं, जे सरावाने येतं. मॅन्युअल पंप: यात स्तनाग्रांना जोडून हातांच्या मदतीने दूध काढण्यासाठी एका पंपाचा वापर केला जातो. इलेकट्रीक पंप: हा पंप हाताने वापरायच्या पंपासारखाच असतो. मात्र हाताने दूध पंप करण्याऐवजी बॅटरी किंवा विजेच्या साहाय्याने दूध पंप केलं जातं.
पंप केल्यानंतर दूध कसं साठवावं?
पंप केलेलं दूध कधी वापरायचं आहे यावर ते कसं साठवायचं हे ठरवता येतं. काढून ठेवलेलं दूध ४ तासात वापरायचं असेल तर ते रूम टेम्परेचरला ठेवलं तरी चांगलं राहतं. ४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाला साठवलेलं दूध पुढील ४ दिवस वापरता येतं. तुम्ही काढून ठेवलेलं दूध ४ दिवसात वापरणार नसाल तर ते काढल्या काढल्या गोठवून ठेवणं हा चांगला पर्याय आहे. तुम्ही जर कुठे बाहेर असाल तर बर्फ भरलेल्या कूलरमध्ये ४ तासांपर्यंत दूध ठेवता येतं. नंतर मात्र ते फ्रिजमध्ये टाकलं पाहिजे किंवा गोठवलं पाहिजे.
आईचं दूध साठवण्याची माहिती
आईचं दूध साठवण्यासाठी पिशव्या मिळतात. किंवा घट्ट झाकण्याचा काचेच्या बरणीतही आईचं दूध साठवता येतं. साध्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दूध साठवू नका. त्यासाठी बीपीए फ्री कंटेनर वापरा. आईचं दूध फ्रिजच्या दारात साठवू नका. कारण फ्रिज उघडबंद केल्याने तिथलं तापमान सतत वरखाली होत असतं. प्रत्येक पाकिटावर ते दूध कधी काढलेलं आहे हे स्पष्ट समजेल अशी चिठ्ठी लावा. प्रत्येक बॅगेत थोडं थोडं दूध ठेवा जेणेकरून ते नाईक वेळा बाळाला देता येईल आणि वाया जाणार नाही. सगळ्यात आधी काढलेलं दूध सगळ्यात आधी संपवा. आईचं दूध बाळाला देण्यापूर्वी कोमट करण्याची गरज नसते. मात्र काही जण ते कोमट करतात तर काही जण गारच पाजतात. आईचं दूध कधीही मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नका. पिशवी / बाटली कोमट पाण्यात धरून ते कोमट करा. दुधातील स्निग्धांश वेगळे झाले असतील तर दूध नीट हलवून ते दुधात परत मिसळून घ्या. गोठवलेलं दूध एकदा रूम टेम्परेचरला आलं की ते २ तासाच्या आत वापरलं गेलं पाहिजे. ते पुन्हा गोठवून वापरू नका. आईचं दूध काढून ठेवल्याने ती जवळ नसतांनाही बाळाला आईचं दूध देता येऊ शकतं. त्याला वाढीच्या या महत्वाच्या पैलूपासून वंचित रहावं लागत नाही.
तज्ज्ञ मार्गदर्शन - डॉ. प्रज्ञा चांगेडे ((M.S., F.I.C.O.G, F.C.P.S, D.G.O, I.B.C.L.C)