Join us   

Breastfeeding Week 2022 : बाळाला दूध पाजताना स्तनांमध्ये सूज,कधी वेदना जाणतात? वर्किंग वुमन्ससाठी स्तनपानाच्या 9 टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 4:14 PM

Breastfeeding Week 2022 : बाळंतपणानंतर नोकरीत पुन्हा रुजू होण्याच्या कमीत कमी ४ ते ६ आठवडे आधी नियोजन करण्यास सुरुवात केले पाहिजे.

बाळाचे स्तनपान कायम सुरु कसे ठेवावे हा नोकरी करणाऱ्या मातांसमोरील एक प्रश्न असतो.  बाळंतपणानंतर काम पुन्हा सुरु करायचे म्हणजे बाळाचे अंगावरचे दूध सोडावे लागणार असाच सर्वसामान्य समज असतो. कामाच्या ठिकाणी असलेल्या अनेक अडचणी, दिवसाचे भरपूर तास काम करावे लागणे, त्यातून येणारा ताण, इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत आपण कमी तर पडणार नाही याची भीती आणि स्तनपान करण्याच्या सुविधा उपलब्ध नसणे या आणि अशा अनेक अडचणींमुळे स्तनपान करवणे बंद करावे लागते.  डॉ. वैशाली जोशी, कन्सल्टन्ट, ऑब्स्टेट्रीशियन व गायनॅकॉलॉजिस्ट (कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई)  यांनी याबाबत लोकमत सखीला अधिक माहिती दिली आहे.  (Breastfeeding Tips for Working Mothers)

१ ते ७ ऑगस्ट (Breastfeeding Week 2022) दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह संपूर्ण जगभरात पाळला जातो, अशाप्रकारच्या उपक्रमांमुळे स्तनपान करवणे हा महिलेचा अधिकार असल्याच्या विचाराला समाजमान्यता मिळू लागली आहे.  बाळंतपणानंतर नोकरीतील कामांना पुन्हा सुरुवात केल्यानंतर देखील स्तनपान करवणे सुरु ठेवावे यासाठी महिलांना प्रोत्साहित केले गेले पाहिजे. कामाच्या तासांमध्ये स्तनपान करवण्यासाठी किंवा अंगावरील दूध काढून ठेवण्यासाठी आवश्यक वेळ आणि सुविधा कामाच्या ठिकाणी पुरवल्या गेल्या पाहिजेत. (9 Tips for Working Moms Who Want to Keep Breastfeeding)

बाळंतपणानंतर नोकरीत पुन्हा रुजू होण्याच्या कमीत कमी ४ ते ६ आठवडे आधी नियोजन करण्यास सुरुवात केले पाहिजे. कामाला पुन्हा सुरुवात केल्यावर बाळाला अंगावरील दूध कसे मिळत राहील याचा विचार या नियोजनामध्ये प्रामुख्याने केला गेला पाहिजे. त्यासाठी काही सोप्या उपायांचे पालन करता येईल. 

१. अंगावरील दूध काढून ते रेफ्रिजरेटरमध्ये फ्रीझ करून ठेवा.  अशाप्रकारे आईच्या अंगावरील दुधाची बँक बाळासाठी तयार करून ठेवता येईल.  

२. अशाप्रकारे काढून ठेवलेले आईचे अंगावरील दूध  किंवा फॉर्म्युला दूध घरातील इतर कोणीतरी व्यक्तीने बाटलीमधून बाळाला पाजावे. यामुळे आईच्या जवळ, थेट अंगावर पिण्याची सवय हळूहळू सुटेल आणि नव्या बदलांशी जुळवून घेण्यात बाळाला मदत होईल.

३. तुमच्या हक्काची बाळंतपणाची जास्तीत जास्त रजा किती आहे ते जाणून घेण्यासाठी एचआर प्रतिनिधी किंवा मालकांसोबत बोला. यामुळे प्रसुतीनंतर सुरुवातीचे किमान ४ ते ६ महिने तरी बाळाला फक्त अंगावरचे दूध देणे सुरु ठेवता येईल.  

४. बाळंतपणाची रजा संपवून कामावर पुन्हा रुजू होण्याआधी कामाच्या तासांमध्ये लवचिकता, पार्ट-टाईम किंवा जॉब-शेयर पद्धत, घरून काम करण्याची मुभा अशा काही सुविधा उपलब्ध आहेत का याची नीट माहिती जाणून घ्या. 

५. कामावर रुजू झाल्यानंतर अंगावरचे दूध काढून घेण्यासाठी कामाच्या ठिकाणी एखादी स्वतंत्र खोली, त्यामध्ये इलेक्ट्रिक पॉईंटची सुविधा, खुर्ची, टेबल, प्रायव्हसी आणि स्वच्छता पाळता येईल अशा सोयी आहेत का हे नक्की तपासा.

६. बाळाची पुरेशी काळजी घेता यावी यासाठी  कामाच्या ठिकाणी पाळणाघर आहे का त्याची चौकशी करा. 

७. बाळाचे वय किती आहे त्यानुसार स्तनपान करवण्यासाठी किंवा अंगावरील दूध काढून देण्यासाठी ब्रेक्स दिले जातात याची खात्री करून घ्या. अंगावरील दूध काढून ठेवण्यासाठी सर्वसाधारणपणे दर तीन ते चार तासांनी २० ते ३० मिनिटांचा ब्रेक आवश्यक असतो. 

८. ब्रेस्ट पम्पची निवड योग्य पद्धतीने करा. इलेक्ट्रिक, एका जागेतून दुसऱ्या जागी सहज नेता येऊ शकेल असा, डबल ब्रेस्ट पम्प अधिक जलद आणि जास्त क्षमतेने काम करतो. एका जागेतून दुसऱ्या जागी नेता येऊ शकतील असे पम्प बॅटरीवर चालतात आणि त्यासोबत आईस पॅक्स असतात, त्यामुळे काढलेले दूध साठवून ठेवता येते आणि बाळापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवता येते. 

९. अंगावर दूध चांगल्या प्रकारे, भरपूर येत राहावे यासाठी दिवसभरात नियमितपणे दूध काढत राहणे महत्त्वाचे असते. असे केल्यास स्तनांमध्ये सूज, तणाव व वेदना निर्माण होणे, स्तनांमधून दूध गळू लागणे व कपडे ओले होणे, त्यावर डाग दिसणे अशा समस्या टाळता येतील. 

टॅग्स : हेल्थ टिप्सस्त्रियांचे आरोग्य