काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. एली नावाची ब्रिटनमधील एक तरुणी. तिला आई तर बनायचं होतं; पण लग्नाच्या कुठल्याही बंधनात मात्र अडकायचं नव्हतं. टेस्ट ट्यूब बेबी, आयव्हीएफ तंत्रज्ञान याचीही मदत घ्यायची नव्हती. त्याची दोन कारणं, एकतर हे तंत्रज्ञान खूप महागडं, शिवाय त्याचा सक्सेस रेटही तुलनेत बराच कमी. त्यामुळे स्पर्म बँकेतून शुक्राणू विकत घेण्यापेक्षा तिनं ऑनलाइन शोधाशोध सुरू केली. एक स्पर्म डोनर तिला भेटला. त्यांची ऑनलाइनच चर्चा झाली, मग प्रत्यक्ष भेटायचं ठरलं. आई होण्यासाठी ‘एका भेटीचा सौदा’ही ठरला. त्या भेटीनंतर दोघांचा पुन्हा काहीच संबंध येणार नाही, आयुष्यात पुन्हा दोघांनी एकमेकांचं तोंडही पाहायचं नाही, हे सारं तर उघडच होतं.. अशा रोखठोक व्यवहारात तो शिरस्ताच असतो आणि कोणीच भावनिक बंधनात अडकत नाही. - तर ठरल्याप्रमाणे त्या दिवशी त्यांची भेट तर झाली, पण त्या भेटीचा काही उपयोग झाला नाही. एली गर्भवती राहू शकली नाही. त्यामुळे त्याच डोनरला तिनं परत एकदा भेटीचं निमंत्रण दिलं. या वेळी मात्र ती गर्भवती राहिली. पण, या स्पर्म डोनरवर तिचं पहिल्याच दिवशी प्रेमही बसलं. इकडे त्या स्पर्म डोनरचीही तीच अवस्था झाली. तो प्रोफेशनल स्पर्म डोनर. तोच त्याचा व्यवसाय आणि पैसे कमावण्याचा मार्गही. स्पर्म म्हणजे शुक्राणू डोनेट करून आतापर्यंत तो १५० मुलांचा ‘बाप’ झाला आहे. या सर्व वेळी तो कोणत्याच भावनिक बंधनात अडकला नाही; पण या वेळी मात्र तोही एलीच्या प्रेमात पडला. दोघांना आता एक-दुसऱ्याशिवाय राहणं कठीण झालं आहे. ‘विकी डोनर’ या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याकडेही ‘स्पर्म डोनर’ ही संकल्पना लोकांना बऱ्यापैकी माहीत झाली आहे. आयुष्मान खुराणा अभिनित हा चित्रपट २०१२ साली आला होता. जगभरात अनेक कुटुंबं अशी आहेत, त्यांना मुलांपासून वंचित राहावं लागतं. त्यासाठी वय, शारीरिक, मानसिक अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात, पण ‘मेडिकल क्लिनिक’च्या माध्यमातून या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे स्त्री-पुरुष नैसर्गिकपणे पालक बनू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा ‘डोनेशन’चा पर्याय!
- ही पद्धत सगळीकडेच खूप प्रचलित आहे, पण इंग्लंडमध्ये मात्र एक नवाच प्रकार सध्या रुळतो आहे. बहुसंख्य महिला शुक्राणू विकत घेण्यापेक्षा स्पर्म डोनरच्या सेवाच विकत घेतात. याचीही अनेक कारणं आहेत. ‘स्पर्म डोनर’ कसा आहे, त्याचं आरोग्य कसं आहे, तो जर आरोग्यदायी, सशक्त, निरोगी, तरुण असेल तर आपलं मूलही निरोगी जन्माला येईल असं अनेक महिलांना वाटतं. त्यामुळे अशा पुरुषांवर त्यांचा जास्त भरवसा आहे. एकमेकांच्या संमतीनं काही तासांसाठी या पुरुषांची सोबत विकत घेतली जाते. या व्यवहारात भावनिक गुंतवणूक असत नाही.
एलीनं गर्भवती होण्यासाठी ज्या स्पर्म डोनरचा सहारा घेतला तो सध्या पन्नास वर्षांचा असला, तरी तो शारीरिक, मानसिकदृष्ट्या अतिशय फिट आहे. शिवाय योगा प्रशिक्षक आणि मोठा उद्योगपती आहे. ज्या महिलांना लग्न न करता आई होण्याची इच्छा आहे, त्यांना तो मदत करतो. या मार्गानं आतापर्यंत तो १५० मुलांचा बाप बनला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ ‘शुक्राणूदानातून’ दरमहा तो ७१ हजार पाऊंड (७३ लाख रुपयांपेक्षाही जास्त) कमावतो. ब्रिटनमध्ये ही पद्धत आता जणू रूढ होत आहे. ज्या महिलांना लग्न करायचं नाही, पण मूल हवं आहे, त्या तंत्रज्ञानापेक्षा नैसर्गिकरीत्या आई होण्याला जास्त पसंती देत आहेत. अनेक ठिकाणी ‘कायदेशीर व्यवहार’ म्हणून हा मार्ग आता मोठ्या प्रमाणावर प्रचलित होतो आहे.
एलीही यासंदर्भात म्हणते, “आमच्यातही हा केवळ एका रात्रीचा ‘व्यवहार’ होता, पण कशी माहीत नाही, मी त्याच्या प्रेमात पडले आहे. स्पर्म डोनरही त्याच्या व्यवसायाशी प्रामाणिक आहे. पण, तोदेखील माझ्या प्रेमात पडलाय, हे विशेष! तो १५० मुलांचा ‘बाप’ असला तरी मला त्या गोष्टीशी कर्तव्य नाही! माझं प्रेम मी कसं नाकारू?”
सुदृढ मूल जन्माला घालण्यासाठी..
सरकारी माहितीनुसार, इंग्लंडमध्ये दरवर्षी या प्रकारे हजारो महिला माता होताहेत आणि ते प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अर्थात ब्रिटनच केवळ त्याला अपवाद नाही. अनेक देशांमध्ये ही पद्धत आता प्रचलित होत आहे. काही ठिकाणी त्यासाठी कायदेशीर करारही करून घेतले जातात. दोघांपैकी कोणीही नंतर कायदेशीर मार्गांचा अवलंब करू नये किंवा ब्लॅकमेल करू नये याचीही काळजी घेतली जात आहे. तंत्रज्ञानाला कोणाचीच ना नाही, पण अनेक महिलांना हा मार्ग अधिक खात्रीशीर आणि अधिक स्वस्त वाटतो. सुदृढ मूल जन्माला घालण्यासाठी आम्हाला हा मार्ग अधिक प्रशस्त वाटतो, असं अनेक महिला बोलून दाखवतात.