Lokmat Sakhi >Health >Pregnancy > सहा महिन्यानंतर बाळाला वरचं खाणं सुरु करताना आईबाबा कुठं चुकतात? बाळ खातंच नाही काय करणार?

सहा महिन्यानंतर बाळाला वरचं खाणं सुरु करताना आईबाबा कुठं चुकतात? बाळ खातंच नाही काय करणार?

६ जून हा ‘काॅम्प्लीमेंटरी फिडींग डे’, बाळांना द्यायचा पूरक आहार आणि योग्य शास्त्रीय माहिती याची सांगड घालायला हवी.  complementary feeding day 2024

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2024 08:00 AM2024-06-06T08:00:00+5:302024-06-06T08:00:01+5:30

६ जून हा ‘काॅम्प्लीमेंटरी फिडींग डे’, बाळांना द्यायचा पूरक आहार आणि योग्य शास्त्रीय माहिती याची सांगड घालायला हवी.  complementary feeding day 2024

 complementary feeding day 2024 : Complementary Feeding - Bridging the knowledge and practice gap : Call For Action, kids and food. | सहा महिन्यानंतर बाळाला वरचं खाणं सुरु करताना आईबाबा कुठं चुकतात? बाळ खातंच नाही काय करणार?

सहा महिन्यानंतर बाळाला वरचं खाणं सुरु करताना आईबाबा कुठं चुकतात? बाळ खातंच नाही काय करणार?

Highlightsपुरक आहार सुरु करणे अनिवार्य असते व पुरक आहार कसा द्यायचा, याचे ज्ञान आई तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना असावे लागते. 

डाॅ. संजय जानवळे (एम,डी. बालरोगतज्ज्ञ)

सहा महिन्यापर्यंत बाळाच्या वाढीसाठी फक्त आईचे दूध पुरेसे असते. पण त्यानंतर मात्र बाळाची कॅलरी व इतर पोषकतत्वांची गरज वाढते आणि ती गरज भागवण्यासाठी स्तनपानाबरोबरच वरचा आहार सुरु करावा लागतो. त्याचबरोबर सहा महिन्यानंतर बाळाची वरचा आहार घेण्याच्या क्षमतेचा विकास झालेला असतो. आईच्या दूधाबरोबर वरचा आहार देण्याच्या या प्रक्रियेलाच ‘काॅम्प्लीमेंटरी फिडींग’ असे म्हणतात. ६ जून हा ‘काॅम्प्लीमेंटरी फिडींग डे’ आहे, त्यानिमित्त आपण बाळाच्या पुरक आहाराविषयी जाणून घेऊया..

पुरक आहार का महत्त्वाचा?

१. जर या वयात बाळाला वरचा आहार नीट दिला नाही तर त्याचा अनिष्ट परिणाम बाळाच्या वाढीवर होत असतो. बाळाची वाढ व विकास नीट होत नाही. म्हणून स्तनपानासोबत काॅम्प्लीमेंटरी फिडींग म्हणजेच पुरक आहार सुरु करणे अनिवार्य असते व पुरक आहार कसा द्यायचा, याचे ज्ञान आई तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना असावे लागते. 
२. पुरक आहाराबाबतचे हे ज्ञान वैद्यकशास्त्रात उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेले असते. अशाप्रकारे बाळाला पुरक आहार दिला तर बाळ हळूहळू खाऊ लागते व त्याची वाढ होते. पण वास्तवात ही माहिती व बाळाला खाऊ घालण्याच्या पद्धती यांच्यात मोठी तफावत असते व त्यामुळे पुरक आहार देण्याचा हेतू साध्य होत नाही. 
३. सातव्या महिन्यात बाळाला पुरक आहार सुरु केला जातो. पहिले दोन-तीन दिवस तो द्यायचा कसाबसा प्रयत्न होतो. लगेच ‘आमचे बाळ काहीही करा, खातच नाही’, असा निष्कर्ष काढला जातो आणि बाळाचे हे खाऊ घालणे बंद केले जाते. नुसतेच बंद केले जात नाही तर वेगवेगळे प्रयोग करणे सुरु होते. 
४. बहुतांश बाळाला गाईंचे, म्हशीचे दूध किंवा बाजारात उपलब्ध कृत्रिम पावडरचे दूध पाजण्यात येते. त्यामुळे बाळ कसे खायचे हे शिकत नाही व त्याची वाढ खुंटते, ते कुपोषित होते. हे टाळण्यासाठी माहिती व खाऊ घालण्याच्या पद्धती यांच्यात अंतर नसावे. हे अंतर कमी करण्यासाठी कृती योजनांची गरज आहे. यंदाच्या ‘काॅम्प्लीमेंटरी फिडींग डे’ची थीम हीच आहे. Complementary Feeding - Bridging the knowledge and practice gap : Call For Action.” अशी आहे.

 

आईबाबांनी काय करावं?

१. सहा महिन्यानंतरही त्याला स्तनपान चालू ठेवा आणि पुरक आहार सुरु करा. हा पुरक आहार बाळाला दिवसातुन कमीत कमी चार-पाच वेळा द्या. बाळ जर स्तनपान करत नसेल अथवा आईला दूध कमी येत असेल तर दिवसातुन पाच-सहा वेळा त्याला पुरक आहार द्या.
२. बाळाला गाईंचे, म्हशीचे दूध किंवा कृत्रिम पावडरचे दूध पाजणे बंद करा.
३. मुलींना मुलांच्या तुलनेत कमी आहार दिला जात असल्याचे दिसून येते, त्यांच्या आहाराकडे नीट लक्ष द्या. तुम्ही कामासाठी बाहेर जात असाल तर बालकाला खाऊ घालणाऱ्याला कसे खाऊ घालायचे ते नीट शिकवा.
४. ‘खाणे’, ही प्रक्रियाच मुळात जटील असते. खाऊ घालताना संयम राखा अन् प्रयत्न सातत्य चालू ठेवा. तरच मूल कसे खायचे, हे निश्चितपणे शिकेल. म्हणजेच ‘काॅम्प्लीमेटंरी फीडींग’ सुरु तेल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात बाळाला कसे खायचे ते शिकवा. त्यासाठी संयम राखत खाऊ घालणे चालू ठेवा.
५. तो जो शिकला, त्याची दुसऱ्या तीन महिन्यात त्याला ‘सवय’ लावा. पुन्हा संयम ठेवा व मेहनत करा. खात नाही, उलट्या करता, तोंडात घास ठेवतो वगैरे कुठलेच निष्कर्ष काढू नका. अशाप्रकारे सहा महिन्याच्या तुमच्या अविरत प्रयत्नांनी मुल कसे खायचे हे शिकते व पुरेसे प्रशिक्षितही होते. 
६. मूल कधी खाईल, कधी खाणार नाही, तुम्ही मात्र खाऊ घालणे नियमितपणे चालू ठेवा. आपण जे खातो तेच बाळाला खाण्यायोग्य करुन खाऊ घालणे उत्तम! ७. जेव्हा तुम्ही चमच्याने बाळाला भरविता तेव्हा, चमच्याने तो आहार जिभेच्या अगदी मधोमध ठेवावा म्हणजे ते अन्न बाहेर टाकले जाणार नाही. बाळाचे अन्न तयार करताना स्वच्छतेचे सर्व नियम पाळा.

काळजी काय घ्यायची?

१. बाळाला हवे असेल तितक्या वेळा स्तनपान द्या. पुरक आहार नेहमी वाटी व चमच्याने द्यावा. वरणभाताने खाऊ घालणे सुरु करा. हळूहळू त्यात पोळी बारीक कुस्करून टाका. पुन्हा मिक्सर मध्ये पेस्ट करा व खाऊ घाला. 
२. आता त्याच वरणभातात साधारणपणे आठव्या महिन्यापासून फळं, पालेभाज्या घालायचा सुरु करा. गोड पिकलेल्या व पिवळ्या, केशरी रंगाच्या केळी, पपई, चिकू, सफरचंद, आंबा या फळांचा तसेच उकडलेली बटाटे, टमाटे,गाजर, बीट इत्यादी समावेश करा. मग वरणभातात तूप किंवा तेल टाका. बाळाच्या आहारात डाळभाताच्या खिचडीचा समावेश करा.
३. लहान बाळाला भरविताना आईने प्रथम त्याला मांडीवर घ्यावे, स्वत:चे हात स्वच्छ धुवावेत व स्वत: काळजीपुर्वक बाळाला खाऊ घालावे. बाळाला द्यावयाचे काही घरगुती पदार्थ आहेत. त्यात वरणभात आणि खिचडी, तूप किंवा तेल यासोबत सूजी, रवा यांचाही समावेश असतो. काही भागात राजगिरा, शिंगाडा ह्याचे पदार्थ दिले जातात.
४. शास्त्रीय माहितीच्या आधारावरच बाळाला काॅम्प्लीमेंटरी फिडींग सुरु करा. ‘मी माझ्या बाळाला हेच देत होते, तुम्हीही तेच द्या’, अशा अनाहूत सल्ल्यांकडे दुर्लक्ष करा. तुमचे बालरोगतज्ज्ञ तुम्हाला काॅम्प्लीमेटंरी फिडींग कशी द्यायची, याची सविस्तर माहिती देतील. गावपातळीवर हेच काम वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक/ सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्त्या करतील. बालसंगोपनावरच्या पुस्तकातून अथवा इंटरनेटवर पुरक आहार काय, कसा, किती याची सखोल माहिती तुम्हाला मिळेल.

dr.sanjayjanwale@gmail.com
संपर्क : ९८२२८२४१३५

Web Title:  complementary feeding day 2024 : Complementary Feeding - Bridging the knowledge and practice gap : Call For Action, kids and food.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.