कोवीड-१९ ही महामारी सुरु झाल्यापासून आपल्या आरोग्यव्यवस्थेवर खूप ताण आहे. इतर पेशंट्सच्या संख्येत कोरोना झालेल्या आणि लक्षणं दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या पेशंट्सची भर पडली आहे. मात्र त्यातही गरोदर जोडप्यांवर सगळ्यात जास्त ताण आहे. त्यांना गरोदरपणाच्या एरवीच्या ताणासकट महामारीच्या काळात बाळ सुखरूप जन्माला घालण्याचंही टेन्शन आहे. गरोदरपणातील अनेक तपासण्या आणि चाचण्यांना त्याचा फटका बसला आहे. दवाखान्यात नियमित तपासणीसाठी जायचे तरी अनेकींना अजूनही धास्ती वाटतेच आहे. तर न घाबरता याकाळात काय काळजी घ्यायची?
कोराेनाकाळ आणि गरोदरपणात घ्यायची काळजी
मृत्युदर कमीत कमी ठेवण्यासाठी आईसह नवजात बाळांचं आरोग्य सांभाळणारी आरोग्य यंत्रणा अत्यंत महत्वाची असते. तुम्ही जेव्हा गरोदरपणातील तपासण्यांसाठी आणि बाळंतपणासाठी दवाखान्यात जाल तेव्हा मास्क वापरा आणि शारीरिक अंतर पाळा. बहुतेक सगळ्या वैद्यकीय आस्थापना आणि इस्पितळांनी लोक भेटायला येण्यावर बंदी घातलेली आहे. आईला झालेला संसर्ग बाळाला जन्माच्या आधी होण्याची शक्यता खूपच कमी असते. मात्र जन्माला आल्यानंतर त्यांना संसर्ग होऊ शकतो. तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्कात राहून इस्पितळाच्या लेटेस्ट पॉलिसी समजून घेतल्या पाहिजेत.
गरोदरमातांनी काय विशेष काळजी घ्यावी?
गरोदर महिलांना संसर्गाचा धोका इतरांपेक्षा जास्त नसला तरी त्यांना श्वसनाचा संसर्ग होण्याची शक्यता मात्र जास्त असते. झालेला संसर्ग प्लॅसेंटामार्फत बाळापर्यंत पोचतो का हे माहिती नसल्याने तुम्हाला व बाळाला संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. सर्व गरोदर महिलांनी शक्यतो घरी आणि सुरक्षित राहून पुढील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
१. सकस अन्न घ्या आणि श्वसनाचे व्यायाम करा.
२. घाबरून जाऊ नका.
३. घरातील बाहेर पडणाऱ्या सदस्यांपासून घरातल्या घरातही शारीरिक अंतर पाळा.
४. बाहेरील वस्तू किंवा पृष्ठभागाला स्पर्श केल्यावर तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवा
५. घरी आणलेल्या सर्व वस्तू सॅनिटाईझ करून घ्या.
६. हात वारंवार धुवा/सॅनिटाईझ करा.
७. अस्वच्छ हाताने चेहेऱ्याला स्पर्श करणं टाळा.
डॉक्टरांकडे जाताना..
तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने कमी वेळा तपासणीसाठी जा. १२, २०, २८ आणि ३६व्या आठवड्यात तपासणी असू शकते.
ताप, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर लक्षणं कमी झाल्यानंतर ७ दिवसांपर्यंत तपासणीसाठी जाऊ नका.
घरातल्या कोणाला कोव्हीड-१९ ची बाधा झाल्याची शंका असेल तर त्यापुढील १४ दिवस तपासणीसाठी जाऊ नका.
तपासणीसाठी प्रत्यक्ष केंद्रावर न जाता अनेक शंका फोनवर सोडवता येऊ शकतात.
तुमच्या लोह आणि जीवनसत्त्वांच्या गोळ्या न विसरता घ्या आणि भरपूर पाणी व इतर द्रवपदार्थ घ्या.
अनावश्यक सोनोग्राफी व इतर तपासण्या टाळा
तुम्हाला स्वतःला कोवीड- १९ झालेला असेल तरी घाबरून जाऊ नका. योग्य ते उपचार घ्या.
गरोदर रुग्णांना एक्स रे आणि सीटी स्कॅन सारख्या तपासण्या सांगितल्या जाऊ शकतात. अशा वेळी त्यामुळे गर्भाला इजा पोचणार नाही याची काळजी घ्या.
थोडक्यात सांगायचं तर स्वच्छता पाळणे, पुरेसा पोषक आहार आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगिकारली तर तुम्हाला कमीत कमी वेळा तपासणीसाठी जायला लागेल. तुम्ही जितकी काळजी घ्याल तितकी आई व बाळाला नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी विशेष आभार
डॉ. मीना सामंत (MBBS, MD, DNB, MRCOG)