Join us   

गरोदरपणात कोरोनाची लस घेण्याचे टाळताय, भीती वाटतेय? जाणून घ्या 'या' महत्वाच्या गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 2:48 PM

कोरोनाची लस घेतल्यावर अनेकांना होणाऱ्या वेगवेगळ्या त्रासाबद्दल ऐकून आता तुम्हालाच लस घेण्याची भीती वाटू लागली आहे का ? म्हणूनच गरोदरपणात लस घेण्याचे टाळताय का ? असे असेल तर मग तुम्ही 'या' काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती करून घ्यायलाच हवी.

ठळक मुद्दे ज्या गर्भवती महिलांना गरोदरपणात मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास होत असेल, त्या महिलांनी त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन कोरोनाची लस आवर्जून घ्यायलाच हवी.गर्भारपणात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची गरज असते. त्यामुळे ही लस प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्तच ठरेल, असे स्त्रीरोग तज्ज्ञांचे मत आहे. 

गरोदर महिला तसेच स्तनदा म्हणजेच ब्रेस्ट फिडींग करणाऱ्या मातांनी कोरोना लस घ्यावी की नाही, याबाबत  अनेक उलटसुलट चर्चा मागच्या काही महिन्यांमध्ये रंगल्या होत्या. स्त्रीरोग डॉक्टरांच्या संघटनेनेही यावर प्रतिक्रिया दिली होती. पण तरीही गरोदर महिलांच्या लसीकरणाबाबत  निर्णय होऊ शकत  नव्हता. आता  मात्र गरोदर महिलांच्या लसीकरणाला केंद्र शासनानेच हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे आता जर लसीकरणाबाबत मनात कोणती भीती असेल, तर ती दूर करा आणि तुमच्या  डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात  लवकर लसीकरण करून घ्या. 

 

'हा' त्रास असणाऱ्या गर्भवतींनी लस घ्यायलाच हवी गरोदरपणात महिलांना अनेक शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते. बीपी, मधुमेह असे त्रासही अनेक जणींना गर्भवती असतानाच सुरू होतात. हे आजार फक्त गर्भारपणापुरतेच असले ,तरी ते त्या स्त्रीसाठी आणि  होणाऱ्या बाळासाठी घातक ठरू शकतात. म्हणून ज्या गर्भवती महिलांना गरोदरपणात मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास होत असेल, त्या महिलांनी त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन लस आवर्जून घ्यायलाच हवी. यामुळे जर गर्भावस्थेत संसर्ग झालाच तर तो गंभीर स्वरूपाचा असणार नाही. 

 

लस घेतल्यानंतर ही काळजी घ्या लस घेतल्यानंतर दोन- तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारचे शारिरीक त्रास जाणवू शकताता. कुणाला ताप येतो,  कुणाचे डोेके दुखते, तर कुणाला खूपच जास्त अंगदुखी होते. हा त्रास कमी करण्यासाठी लस घेतल्यावर दोन  दिवस पुर्णपणे आराम करावा. भरपूर पाणी प्यावं आणि आहारातील फळांचे प्रमाण  वाढवावे. याशिवाय  आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषधीही तुम्ही घेऊ शकता. 

 

अमेरिकेत हजारो गर्भवतींचे लसीकरण अमेरिकेत मागच्या काही महिन्यांपासून गर्भवतींचे लसीकरण जोमात सुरू झाले आहे. या लसीकरणामुळे शरीरात योग्य प्रमाणात ॲण्टीबॉडी तयार होतात आणि त्यामुळेच गर्भवती महिला आणि गर्भ दोन्हीही सुरक्षित राहू शकतात, असे तेथील डॉक्टरांचे मत आहे. 

 

स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणतात..... प्राण्यांवर झालेलं संशोधन आणि शास्त्रीय माहितीनुसार कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा या लसींचा गर्भवती महिलेवर तसेच जन्माला येणाऱ्या बाळावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. झाला तर लसीचा फायदाच होईल. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता गर्भवतींनी स्वत:हून लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. गर्भारपणात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची गरज असते. त्यामुळे ही लस प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्तच ठरेल, असे स्त्रीरोग तज्ज्ञांचे मत आहे. 

 

टॅग्स : आरोग्यगर्भवती महिलाकोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्स