Join us   

Fact Check : मासिक पाळीच्या काळातही कोरोना लस घेणं पूर्ण सुरक्षित ! सावधान, व्हायरल अफवांना बळी पडू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 2:10 PM

आपल्या मासिक पाळीचा, त्याआधीचे पाच किंवा नंतरचे पाच किंवा ते चार दिवस यांचा आणि प्रतिकार शक्ती कमी होण्याचा काही संबंध नाही. मासिक पाळीच्या काळातही लस घेणं पूर्ण सुरक्षित आहे.

ठळक मुद्दे आपल्याकडे मासिक पाळीच्या संदर्भात ज्या अंधश्रध्दा आहे, त्यातूनच या पोस्ट व्हायरल होत आहेत की मासिक पाळीत लस घेऊ नये.

मासिक पाळीच्या काळात कोरोना लस टोचून घेणं अत्यंत सुरक्षित आहे, त्यासंदर्भात सध्या समाजमाध्यमातून ‘व्हायरल’ होत असलेल्या गोष्टी तद्दन अशास्त्रीय आणि दिशाभूल करणाऱ्या, भीती पसरवणाऱ्या आहेत. त्यावर विश्वास ठेवणं महागात पडू शकतं. तसं करु नका, समाजमाध्यमात वाट्टेल ते व्हायरल झालं म्हणून ते खातरजमा न करता पुढे ढकलू नका. अनावश्यक वेळ घालवून लस न घेणं महागात पडू शकतं. त्यामुळे हे लक्षात घ्या की, आपल्या मासिक पाळीचा, त्याआधीचे पाच किंवा नंतरचे पाच किंवा ते चार दिवस यांचा आणि प्रतिकार शक्ती कमी होण्याचा काही संबंध नाही. मासिक पाळीच्या काळातही लस घेणं पूर्ण सुरक्षित आहे.

सध्या समाजमाध्यमात महिलांना ‘सावध’ करण्याचा आव आणत एक पोस्ट फिरते आहे, ज्यात असं स्पष्ट म्हंटलेलं आहे की, मासिक पाळीच्या काळात महिलांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर लस घेऊ नये. मात्र ही पोस्ट धादांत चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे असा स्पष्ट निर्वाळा स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ देतात. यासंदर्भात ‘लोकमत’ने स्त्री रोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. गौरी करंदीकर आणि डॉ. शिल्पा चिटणीस जोशी यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्राचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याशीही संपर्क केला. त्यातले हे ठळक निष्कर्ष..

मासिक पाळी आणि प्रतिकारशक्ती यांचा काही संबंध असतो का?

अजिबात नाही. मासिक पाळीत प्रतिकार शक्ती कमी होते याचा काहीही संबंध नाही. मासिक पाळी सुरु असताना किंवा त्याआधी आणि नंतरही लस घेणं हे पूर्ण सुरक्षित आहे. त्याचा मासिक पाळीशी काहीही संबंध नाही.

लस कुणी घ्यावी?

कुणाही १८ वर्षे पूर्ण असलेल्या महिलेनं कोरोना लस घ्यावी. लस पूर्ण सुरक्षित असून, तिचा मासिक पाळीत घेण्या न घेण्याशी काही संबंध नाही.

काही गंभीर ॲलर्जी, आजार असतील तर लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  ज्यांना सर्दी-खोकला, कोवीड सदृश लक्षणं आहेत, त्यांनीही आधी डॉक्टरांना भेटून, मग त्यांच्या सल्याप्रमाणे लस घ्यावी

गरोदर महिलांनी लस घ्यावी का?

१. डॉ. शिल्पा चिटणीस जोशी सांगतात, जगभरात अलीकडेच झालेले अभ्यास, स्त्री रोग तज्ज्ञांच्या संघटना असं सांगतात, की गरोदर महिलांनीही लस घ्यायला काहीच हरकत नाही.  २. डॉ. गौरी करंदीकर सांगतात, गरोदर महिलांनी लस घ्यावी का? तर यांसदर्भातील अलीकडचे अभ्यास सांगतात की, लस घ्यावी. मात्र गरोदर महिलांनी हा निर्णय स्वत:च्या स्वत: न घेता आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ते म्हणतील त्याप्रमाणे करावे. ३. हाय रिस्क प्रेगनन्सी, रक्तात गाठी होण्याचं प्रमाण, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बऱ्या झालेल्या महिला, मधूमेह, रक्तदाब असलेल्या महिला यांनीही डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार लस घ्यावी. या महिलांनी लस घेण्याचा निर्णय त्यांचे डॉक्टर प्रत्येकीची तब्येत पाहून घेऊ शकतात. 

स्तनदा मातांनी कोवीड लस घ्यावी का?

स्तनपान करत असलेल्या, अगदी नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलांनीही लस घ्यायला हरकत नाही.  बाळाला आईच्या दुधातून ॲण्टीबॉडीज जातात, त्यामुळे लस घेणं स्तनदा मातेसाठीही सुरक्षित आहे.  त्यासाठी आवश्यक वाटल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

 

महाराष्ट्र राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात, अंधश्रद्धांना बळी पडू नका.

आपल्याकडे मासिक पाळीच्या संदर्भात ज्या अंधश्रध्दा आहे, त्यातूनच या पोस्ट व्हायरल होत आहेत की मासिक पाळीत लस घेऊ नये. मात्र लस घेणं, मासिक पाळी, प्रतिकार शक्ती यांच्या परस्पर संबंधांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे चुकीच्या माहितीला बळी पडू नये. महिलांनी लस घ्यावी, मासिक पाळीच्या काळातही घ्यायला काहीच हरकत नाही.

 

टॅग्स : कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या