Join us   

गर्भवती आईला कोरोना झाला तर पोटातल्या बाळाला संसर्ग होतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2022 7:17 PM

कोविड 19 बाधित आईमुळे गर्भातल्या बाळाला संसर्ग होतो का? कोविड 19 बाधित आईनं बाळाला स्तनपान करावं का? याबाबत सामान्य लोकांमधे अनेक संभ्रम आहेत, शंका आणि भितीही आहे. याबाबत डाॅक्टर, संशोधक काय म्हणतात हे महत्त्वाचं.

ठळक मुद्दे अनेक संशोधनं कोविड 19 बाधित आईने स्तनपान केल्यानं बाळाला संसर्ग होतो असं ठोसपणे सांगत नाहीत.संशोधन आणि अभ्यासातून आईच्या स्तनातून स्त्रवणाऱ्या दुधात विषाणू आढळला हे जसं निश्चित झालं नाही, तसंच आईच्या दुधात संरक्षणात्मक ॲण्टिबाॅडीज ( प्रतिपिंडं) आढळले असंही नाही. कोविड 19 बाधित मातेने जन्म दिलेल्या नवजात बाळाची जन्मल्यानंतर साधारणत: 24 तासात कोविड 19 साठीची तपासणी व्हायला हवी.

कोविड 19 हा विषाणू  सातत्यानं विकसित होत असल्यानं या विषाणुबद्दल निश्चित काही सांगणं अवघड झालं आहे. कोविड 19 चा संसर्ग गरोदर आईपासून गर्भातल्या बाळाला होऊ शकतो असं अभ्यास सांगत आहे.

आईकडून गर्भातल्या बाळाला कोविड 19 संसर्गाचा धोका आहे का?

यावर उपलब्ध असलेल्या अल्पसंशोधनामुळे गरोदर आईकडून गर्भातल्या बाळाला संसर्ग होतो का ( व्हर्टिकल ट्रान्समिशन) याबाबत सविस्तर सांगता येत नाही.  पण तरीही  आता जी काही संशोधन याबाबत उपलब्ध आहे ती हेच सांगतात, की कोविड19 हा विषाणू आईच्या दुधात  किंवा गर्भाशयातील द्रवात आढळून आलेला नाही.  तरीही, काही नुकत्याच  झालेल्या नियंत्रित अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात, की कोविड 19 पाॅझिटिव्ह मातांपासून झालेली बाळं संक्रमित झाली आहेत. 

Image: Google

नवजात बाळ याबाबतीत अतिशय असुरक्षित आहेत, त्यांना कोविड 19 चा संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणूनच डाॅक्टर कोविड 19 संसर्गित मातांनी जन्म दिलेली बाळं कोविड 19 संसर्गापासून सुरक्षित राहावी यासाठी या बाळांना आईपासून काही  दिवस दूर ठेवण्याचा सल्ला देतात.  ज्या मातांना सर्वसामान्य फ्ल्यू झाला असेल त्यांना काळजी घेण्यास सांगितलं जातं.

Image: Google

गरोदर मातांना कोविड 19 चा संसर्ग झाल्याची लक्षणं

खरंतर विषाणूजन्य आजारांमधील आणि सर्वसामान्य फ्ल्यू मधील  लक्षणं जवळपास सारखीच असतात. त्यामुळे आपल्याला कोविड 19 चा संसर्ग झाला आहे की नाही याची तपासणी करुन खात्री करुन घेणं आवश्यक आहे.  पण खालील लक्षणं आपल्यामधे आहेत का हे गरोदर मातांनी तपासून पाहावं. 1.   ताप येणं 2. खोकला होणं 3. श्वास घेण्यास त्रास होणं 4. घसा खवखवणं 5. थंडी वाजणं 6. स्नायुदुखी 7. चव आणि वास न येणं 8. डोकेदुखी 9. थंडी वाजून हुडहुडी भरणं

यापैकी एकापेक्षा जास्त लक्षणं पुरेसा आराम आणि पातळ आहार घेतल्यास कमी होतात. पण डाॅक्टरांना संपर्क केल्यास ते याबाबतीत योग्य सल्ला देतात. 

Image: Google

कोविड 19 बाधित आई बाळाला स्तनपान करु शकते का?

यावर झालेली  अनेक संशोधनं कोविड 19 बाधित आईने स्तनपान केल्यानं बाळाला संसर्ग होतो असं ठोसपणे सांगत नाहीत.   याचं कारणच मुळात  या विषाणुसंबंधित सतत घडामोडी सुरु आहेत, शोध सुरु आहेत.  'द अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन' (AAP) आणि यासंबंधित इतर वैज्ञानिक संस्था मातेनंं बाळाला अंगावरचं दूध पाजावं हा उत्तम उपाय या ठाम मताच्या आहेत. आईच्या स्तनातून स्त्रवणाऱ्या दुधात विषाणू आढळला हे जसं निश्चित झालं नाही, तसंच आईच्या  दुधात संरक्षणात्मक ॲण्टिबाॅडीज ( प्रतिपिंडं) आढळले असंही नाही. अभ्यासातील निष्कर्षातील ही एकूणच अनिश्चितता बघता अजून तरी बाधित मातेने स्तनपान करण्याला मनाई केलेली नाही.

Image: Google

स्तनपान करणाऱ्या मातांनी अशी घ्यावी काळजी..

1. स्तनपान करण्यापूर्वी आईने आधी मास्क घालावा आणि हात स्वच्छ धुवावेत. 

2. जर बाधित झालेल्या आईला आपल्या नवजात बाळाच्या जवळ जाण्याची इच्छा नसेल तर अशा परिस्थितीत आई हात स्वच्छ करण्याच्या बाबतीतले सर्व नियम पाळून आणि  सर्व काळजी घेऊन स्तनातील दूध ब्रेस्ट पंपद्वारे काढून इतरांच्याद्वारे आपल्या बाळाला पाजू शकते. 

3. एनआयसीयू मधील बाळांच्या माता संसर्गाच्या कोणत्याही टप्प्यातील असल्या तरी स्तनातील दूध ब्रेस्ट पंपद्वारे काढून बाळाला पाजू शकतात.फक्त बाधित मातेने एनआयसीयू मधे जाण्यास मनाई आहे. 

4. नवजात बाळाची जन्मल्यानंतर साधारणत: 24 तासात कोविड 19 साठीची तपासणी व्हायला हवी. आणि जन्मानंतरच्या 48 तासात आणखी एकदा तपासणी व्हायला हवी. कारण अनेक नवजात बालकांमधे 24 तासात कोविड19 साठी केलेली तपासणी निगेटिव्ह आली आणि नंतर केलेली तपासणी पाॅझिटिव्ह आल्याचं आढळून आलं आहे.   तरीही, डाॅक्टरांना बाधित मातेद्वारे स्तनपान केल्यानं बाळाला कोविड 19 चा संसर्ग होण्याची शक्यता अगदीच कमी वाटते.  

तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी विशेष आभार: डाॅ. वैशाली चव्हाण ( एमडी. डीजीओ. डीएफपी. डीएनबी. एफआयसीओजी)

 

 

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीगर्भवती महिलाकोरोना वायरस बातम्या