गरोदरपणात महिलेच्या शरीरात अनेक बदल होतात. स्तनाग्रे गडद होणं हा त्यापैकीच एक. (darkening of the nipples.) तुमच्या सतत बदलणाऱ्या रुपाकडे बघून तुम्हाला धक्का बसू शकतो. मात्र तुम्हाला दिसणाऱ्या बदलांपैकी बहुतेक सगळे बदल होणं हे गरोदरपणात सर्वसामान्य असतं. गरोदरपणात शरीरात होणाऱ्या बदलांची काळजी करण्याची गरज नसते. ही गडद झालेली स्तनाग्रे बाळंतपणानंतर हळूहळू पुन्हा फिक्या रंगाची होतात.
(Image : Google)
स्तनाग्रे गडद होण्यामागची कारणं
गरोदरपणाच्या काळात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन ही दोन प्राथमिक हार्मोन्स विपुल प्रमाणात शरीरात स्रवतात. या हार्मोन्समुळे तुमचे स्तन दूध तयार करण्यासाठी तयार होतात. दुधाच्या नलिका वाढतात तसे स्तन आकाराने मोठे होतात. या हार्मोनल क्रियेमुळे तुमच्या स्तनाग्रांमध्ये जास्त पिगमेंटेशन होऊ शकतं. त्याहीपेक्षा एकूणच गरोदरपणाच्या काळात खूप हार्मोनल बंदल होत असतात. त्यामुळे त्वचेचा रंग गडद करणारं मेलॅनिन जास्त प्रमाणात स्रवतं. या मेलॅनिनमुळे केवळ स्तनाग्रे गडद होतात असं नाही, तर चेहेरा, मान आणि कोपर ते मनगटाच्या मधील हाताच्या भागावर गडद पॅच उमटू शकतात. बहुतेक वेळा बाळंतपणानंतर काही आठवड्यात हे बदल हळूहळू नाहीसे होतात. मात्र काही दुर्मिळ केसेसमध्ये त्यामुळे कायमस्वरूपी खूण राहू शकते.त्वचा आणि स्तनाग्रे गडद होण्यासाठी गरोदरपणात वैद्यकीय उपचारांची गरज नसते. मात्र या खुणा बाळंतपणानंतर एक वर्षानंतरदेखील गेल्या नाहीत तर डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. तुम्ही जर बाळाला स्तनपान केलं, तर हे डाग पुसट होण्याची प्रक्रिया हळूहळू होईल, जे नैसर्गिक आहे. स्तनपानाशी संबंधित इतर काहीही तब्येतीच्या तक्रारी नसतांना केवळ त्वचेवरच्या डागांमुळे स्तनपान टाळणं योग्य नव्हे. तुमच्या बाळासाठी स्तनपान करणं हे सर्वोत्तम आणि सगळ्यात नैसर्गिक अन्न आहे.
(Image : Google)
स्तनाग्रे आणि त्वचा काळवंडणं थांबवण्याचे मार्ग
तुम्ही जरी गरोदरपणात त्वचा काळवंडणं थांबवू शकत नसलात, तरी त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. गरोदरपणात मेलॅनिन जास्त तयार होत असल्याने सूर्यप्रकाशात जाणं शक्य तेवढं टाळावं. सकाळी लवकर सूर्यप्रकाशात जाणं हे जास्त चांगलं असतं कारण केवळ त्यातूनच ड जीवनसत्त्वाची निर्मिती होऊ शकते. विशेषतः गरोदरपणाच्या काळात तुम्हाला पुरेसं ड जीवनसत्व तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. त्याशिवाय पुरेसं पाणी पिणं आणि डॉक्टरच्या सल्ल्याने सनस्क्रीन किंवा इतर मलम लावून त्वचेची काळजी घेणं महत्वाचं असतं.
महत्त्वाचे गरोदरपणाच्या काळात स्तनाग्रे गडद होणं हे सर्वसामान्य आहे. काळजी करू नका आणि तुमच्या शरीरात होणारे बदल खुलेपणाने स्वीकारा.
विशेष आभार- तज्ज्ञ मार्गदर्शन डॉ. डिम्पल चुडगर (M.D, D.N.B, F.C.P.S, D.G.O)