Join us   

'लग्नाला 11 वर्षे झाली तरी मूल नाही? इतकं छळलं लोकांनी..' देबिना बनर्जी सांगतेय आई होण्याचं प्रेशर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 2:15 PM

अभिनेत्री देबिना बॅनर्जीच्या मूल झाल्याच्या आनंदाला आहे वेदनेची किनार..  देबिना म्हणते मूल होत नसल्याचं सोशल प्रेशर होतं न झेपणारं!

ठळक मुद्दे मूल होत नव्हतं याची वैयक्तिक पातळीवरची चिंता अजून मूल झालं नाही या सोशल प्रेशरमुळे वाढली असं देबिना म्हणते. सोशल प्रेशरचा उपचारावरही परिणाम झाल्याचं देबिना सांगते.

टीव्ही आणि रिॲलिटी शो स्टार देबिना बॅनर्जी हिने नुकताच आपला 35 वा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस नुकत्याच झालेल्या मुलीमुळे खूप स्पेशल असल्याचं देबिना म्हणते. या वाढदिवसाला प्रियजनांच्या शुभेच्छा तर मिळाल्याच पण लग्नानंतर 11 वर्षांनी मूल झाल्यानं देवाचा मोठा आशिवार्द मिळाल्याने देबिना खुषीत आहे. 11 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मूल झाल्याचा आनंद व्यक्त करताना देबिना या आनंदाला असलेल्या  वेदनेच्या आणि दुखाच्या किनारीबद्दलही बोलते.  

देबिना म्हणते आपल्याला मूल हवं होतं, पण होत नव्हतं.  ते का होत नव्हतं यामुळे गुरुमित आणि आपण चिंतेत होतो. पण या चिंतेत भर घालत होता तो आजूबाजूचा समाज. लग्नाला एवढी वर्ष झाली आता मूल होवू द्यायला हवं,  अजून मूल झालं नाही अशा टीका टिपण्या,विचारणा आजूबाजूच्या लोकांकडून सतत होत होत्या. लोकांच्या या भोचकगिरीमुळे आपल्याला खूप त्रास झाल्याचं देबिना म्हणते. मूल होत नव्हतं या वैयक्तिक चिंतेसोबतच मूल व्हायला हवं हे सोशल प्रेशरनं आपल्यावरचा ताण अधिक वाढल्याचं देबिना सांगते. लोकांच्या खाजगी बाबतीतल्या हस्तक्षेपामुळे, प्रतिक्रियांमुळे मनावर दडपण यायचं, उदास वाटायचं, याचा उपचारांवरही परिणाम व्हायचा. 

Image: Google

लग्नानंतर इतक्या वर्षांनीही मूल होत नसेल तर काहीतरी अडचण असेल हे लोकं समजून का घेत नाही. प्रश्न विचारुन हैराण का करतात? का दबाव आणता? मूल होत नसल्याचं सोशल प्रेशर काय असतं ते आपण प्रत्यक्ष अनुभवल्याने हे ज्यांच्या वाट्याला येतं त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते आणि अशा प्रकारे सोशल प्रेशर निर्माण करणाऱ्यांचा राग येतो असं देबिना म्हणते.

Image: Google

लोकं काय म्हणतात, काय विचारतात याकडे कितीही दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी होत नाही. ताण हा येतोच . हा ताण डोक्यावर असताना आपण मूल होण्याचे प्रयत्न आणि आशा सोडली नव्हती. दवाखाने, डाॅक्टर्स बदलले. आयव्हीएफद्वारेही प्रयत्न केले. तेव्हा आपल्यातली समस्या पुढे आल्याचं देबिना सांगते. एंडोमेट्रियाॅसिसमुळे मूल होण्यात अडचण येत होती. एंडोमेट्रियाॅसिसहा गर्भाशयाशी निगडित आजार आहे. गर्भाशयातल्या आतल्या बाजूला स्तर निर्माण करणाऱ्या एंडोमेट्रियल ऊतींच्या संख्येत   असामान्य वाढ होते. ही वाढ गर्भाशयाच्या बाहेरही पसरते. या समस्येचा मुख्य अडथळा मूल होण्यास होतो.)  

एंडोमेट्रियाॅसिस या अडचणीवर काम सुरु झाल्यावर मूल झालं पण तोपर्यंत एका बाजूला उपचार सुरु होते आणि दुसऱ्या बाजूला सोशल प्रेशरचा सामनाही सुरु होता. आता मूल झालं, आनंदी आनंद आहे. पण मूल होणं, न होणं या गोष्टीला वैद्यकीय बाजू आहे, भावभावना आणि संवेदनांचा हा नाजूक विषय आहे. याबाबतीत आई बाबा बनू पाहाणाऱ्यांच्या मनावर समाजाचा दबाव नसावा ही देबिनानं व्यक्त केलेली इच्छा समाज म्हणून सगळ्यांनीच समजून घेण्यासारखी आहे.    

टॅग्स : प्रेग्नंसीसामाजिकटिव्ही कलाकार