Join us   

'चान्स' घ्यायचं ठरवताय? गर्भधारणेसह उत्तम तब्येतीसाठी पोषक आहारात हव्याच ६ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2022 1:41 PM

गर्भधारणेची शक्यता वाढविण्यासाठी योग्य आहार गरजेचाच...

ठळक मुद्दे गर्भधारणेसाठी बीजांड आणि स्पर्म दोन्हीही पुरेसे सशक्त असायला हवे इतर गोष्टींबरोबरच आहार आणि जीवनशेलीकडे लक्ष दिल्यास गर्भधारणा होणे सोपे

गर्भधारणा न राहण्याचे प्रमाण गेल्या काही काळापासून वाढत आहे. यामागे वेगवेगळी कारणे असली तरी गर्भधारणेचे नियोजन केल्यानंतर अनेक जण वेगवेगळया पातळीवर काही ना काही उपाय करतात. पण जीवनशैली आणि आहार याबाबत मात्र आपण पुरेशी काळजी घेत नाहीत. गर्भधारणा राहण्यासाठी आईने आहारात कोणत्या गोष्टी खायला हव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात गर्भधारणेसाठी कोणते पदार्थ उपयुक्त ठरतात तर कोणते घातक ठरतात याबाबत सांगण्यात आले. पाहूयात कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास गर्भधारणेची शक्यता वाढू शकते...

(Image : Google)

१. फोलेट आणि व्हिटॅमिन के असलेले पदार्थ 

गर्भधारणेसाठी फोलेट हे अतिशय महत्त्वाचे जीवनसत्त्व असते कारण यामुळे न्यूरल ट्यूबमध्ये असणारे दोष दूर होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असताना तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने फोलिक अॅसिड सप्लिमेंट घेऊ शकता. पालेभाज्यांचा आहारात नियमित समावेश असायला हवा असे आपण नेहमी म्हणतो. पण तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर आहारात पालेभाज्या असायलाच हव्यात. त्यामुळे तुम्हाला कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन के, फोलेट हे आवश्यक घटक मिळतात. या भाज्यांमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन बीमुळे तुमच्या बीजाची ताकद वाढते आणि गर्भधारणा होण्यास त्याची मदत होते. 

२. व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ

इतर घटकांप्रमाणेच व्हिटॅमिन सी हेही गर्भधारणा होण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. संत्री, मोसंबी, किवी, स्ट्रॉबेरी, पेरू, डाळींब यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळेच आपण एरवीही भरपूर फळे खायला हवीत असे म्हणतो. पण गर्भधारणा व्हायची असेल तर या फळांमध्ये असणारे सी व्हिटॅमिन प्रोजेस्टेरॉन या हार्मोनच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. गर्भधारणेसाठी हे हार्मोन सर्वात महत्त्वाचा रोल निभावत असल्याने त्याची निर्मिती आवश्यक असते. तसेच गर्भधारणा झाल्यास ती सुदृढ होण्यासाठीही व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरते. उत्तम स्पर्मसाठीही व्हिटॅमिन सी अतिशय उपयुक्त असते. 

३. व्हिटॅमिन बी १२ 

प्राणीज पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी १२ असते हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे दुध, दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. यामध्ये दुधाबरोबरच दही, ताक, बटर, पनीर, चीज यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. त्यामुळे तुमच्या गर्भधारणेची शक्यता वाढण्यास निश्चितच मदत होते. तुम्ही मांसाहार करत असाल तर त्याही पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास फायदा होतो. 

४. व्हिटॅमिन डी ३ आणि सेलेनियम  

व्हिटॅमिन डी चा सर्वोत्तम सोर्स म्हणजे ऊन. याशिवाय अंड्यातूनही आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी ३ आणि व्हिटॅमिन बी मिळते. काही प्रकारच्या माशांमधूनही हे घटक मिळतात. व्हिटॅमिन बी मुळे स्त्रीबीज सक्षम होते तर डी ३ मुळे गर्भाशयासाठी आणि स्पर्मसाठी अतिशय फायदेशीर असते. पुरुषांसाठीही सेलेनियम हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. अंड्यामुळे सेलेनियम मिळत असल्याने गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या जोडप्यांनी आहारात अंड्याचा समावेश करायला हवा. 

५. फॅटी अॅसिड 

जवस हा फॅटी अॅसिडसाठी अतिशय उत्तम पदार्थ आहे. जवसात मोठ्या प्रमाणात ओमगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड असतात. यामुळे हार्मोन्सचे संतुलन राखणे सोपे जाते. फॅटी अॅसिडमुळे शरीराचे अनावश्यक गोष्टींपासून रक्षण होण्यासही मदत होते. त्यामुळे जवसाचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. 

(Image : Google)

६. अँटीऑक्सिडंटस 

शरीरातून अनावश्यक घटक बाहेर पडायचे असल्यास शरीराला अँटीऑक्सिडंटसची आवश्यकता असते. यामध्ये सर्व प्रकारची फळे, सुकामेवा, भाज्या यांचा समावेश होत असल्याने या गोष्टींचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. एकूणच तुम्ही बाळाचे नियोजन करत असाल तर तुम्ही संतुलित आणि योग्य आहार घेणे फायद्याचे ठरते.   

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीआहार योजनाहेल्थ टिप्स