स्तनपान ही बाळासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. प्रत्येक महिलेने बाळंतपणानंतर स्तनपान करायलाच हवं असा आग्रही सल्ला डॉक्टर देतात. स्तनपान हे जितकं बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं तितकंच आईसाठीदेखील. पण स्तनपान थांबवल्यानंतर महिलांना स्तन पूर्वीच्या तुलनेत ढीले पडलेले, आकार बदललेले वाटतात. तसेच दोन स्तनातल्या अंतरातही फरक वाटतो. त्याचा दोष त्या स्तनपानाला देतात. पण स्तनपानामुळे स्तनांचा आकार बिघडत नाही तर चुकीच्या पध्दतीने स्तनपान केल्यानं, स्तनपान करण्याच्या कालावधीत जीवनशैलीत दोष असल्यानं स्तनांचा आकार बिघडतो असं तज्ज्ञ म्हणतात. असं होवू नये म्हणून तज्ज्ञांनी यासाठीचे सोपे उपाय सांगितले आहेत.
Image: Google
1. योग्य ब्रा वापरा- स्तनपान करताना अनेक महिला योग्य मापाची, चांगल्या गुणवत्तेची ब्रा वापरत नाही, अनेक महिला तर ब्राच वापरत नाही. पण तज्ज्ञ म्हणतात बाळंतपणानंतर स्तनांचा आकार बिघडू नये म्हणून योग्य मापाची नर्सिंग ब्रा घालणं आवश्यक आहे. अशी ब्रा जी घातल्यानंतर अस्वस्थही वाटणार नाही आणि स्तनांना आवश्यक तो आधारही मिळेल. यामुळे बाळंतपणानंतर , स्तनपानानंतर स्तनांचा आकार बिघडत नाही.
2. स्तनपान करताना योग्य स्थिती- बहुतांश महिला बाळाला दूध पाजताना खाली झुकून स्तनपान करतात. पण या चुकीच्या स्थितीत बसल्याने स्तनांवर नकारात्मक परिणाम होतात. स्तनपान करताना आईनं ताठ बसायला हवं. यासाठी बाळाला दूध पिणं सोपं जावं म्हणून मांडीवर नर्सिंग उशी घेऊन बसावं. भिंतीला पाठ टेकवून ताठ बसावं. या स्थितीत बसून स्तनपान केल्यानं स्तन ढीले पडत नाहीत.
Image: Google
3. थंड आणि गरम मसाज- स्तनपान करणार्या महिलांनी स्तनांना गरम पाण्यानं शेकावं तसेच स्तनांवा बर्फही फिरवावा. गरम पाण्यानं शेकल्यानं स्तनातील रक्तवाहिन्यांचा प्रवाह सुधारतो. तर बर्फाच्या थंड मसाजमुळे स्तनांची त्वचा घट्ट होते , स्तनांचा आकार व्यवस्थित राहातो. त्यामुळे कधी गरम पाण्यानं तर कधी बर्फानं स्तनांचा मसाज करावा. पण तज्ज्ञ म्हणतात अती प्रमाणात करु नये. बर्फानं इतकाही मसाज करु नये की तिथली त्वचा बधीर होईल.
4. मॉश्चरायझर लावा- स्तनांची त्वचा कोरडी पडू नये , मृदु आणि कोमल राहावेत यासाठी स्तनांना वेळोवेळी मॉश्चराइज करणं आवश्यक आहे. शिया बटर, विटामिन ई तेल, किंवा कोकोआ बटरने दिवसातून दोन वेळा स्तनांना हलका मसाज करत लावल्यास स्तन ढीले पडत नाहीत.
Image: Google
5. संतुलित आहार- स्तनपान करणार्या महिलांनी आपल्या आहारात फळं, भाज्या यांचं प्रमाण योग्य ठेवावं. कॉम्पलेक्स कार्ब्स, प्रथिनं, आरोग्यदायी फॅटस यातून मिळतात. त्वचा आणि स्तन यांना जोडून ठेवणार्या पेशींच्या पोषणासाठी त्यांना आवश्यक ते घटक संतुलित आहारातूनच मिळतात.ते जर मिळाले तर स्तन लोंबकळ्यासारखे वाटत नाही, सैल पडत नाही.
6. व्यायाम आवश्यक - गरोदर अवस्थेतही विशिष्ट व्यायाम करणं जसं आवश्यक असतं तसंच बाळंतपणानंतर विशिष्ट कालावधीनंतर महिलांनी व्यायाम करणं आवश्यक आहे. नियमित व्यायामामुळे शरीराची त्वचा सैल पडत नाही. घट्ट राहाते. शरीरावरील चरबी कमी होते. स्तनपानादरम्यानही महिलांनी नियमित व्यायाम केल्यास स्तनपानाचा काळ संपल्यानंतर स्तन योग्य आकारात राहातात. ते सैल पडत नाही. बाळंतपणानंतरचं वजन वेगानं घटवण्यासाठी व्यायामच आवश्यक असतो.