Lokmat Sakhi >Health >Pregnancy > गरोदरपणात डायबिटीस आहे? आहार काटेकोरपणे सांभाळाच; काय खाल, काय टाळाल?

गरोदरपणात डायबिटीस आहे? आहार काटेकोरपणे सांभाळाच; काय खाल, काय टाळाल?

गरोदरपणातला मधुमेह हा आहारा-व्यायामाने नियंत्रणात राहू शकतो; मात्र डॉक्टर सांगतात, तो सल्ला या काळात महत्त्वाचा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 01:59 PM2021-08-10T13:59:16+5:302021-08-10T14:12:56+5:30

गरोदरपणातला मधुमेह हा आहारा-व्यायामाने नियंत्रणात राहू शकतो; मात्र डॉक्टर सांगतात, तो सल्ला या काळात महत्त्वाचा.

Diet Rules - Don't afraid with diabetes in pregnancy.. If Follow right diet rules it will easily cure after delivery ! | गरोदरपणात डायबिटीस आहे? आहार काटेकोरपणे सांभाळाच; काय खाल, काय टाळाल?

गरोदरपणात डायबिटीस आहे? आहार काटेकोरपणे सांभाळाच; काय खाल, काय टाळाल?

Highlightsडाएट म्हणजे आईला उपाशी ठेवणं अभिप्रेत नाही. आवश्यक त्या कॅलरी आणि पोषक द्रव्ये मिळायलाच हवीत. थेट साखर खाणे आणि गोडाचे पदार्थ टाळायचे आहेत.आहाराबरोबर व्यायामही महत्त्वाचा आहे. व्यायामाने इन्शुलीनचे कार्य सुविहित होते.

- डॉ. शंतनू अभ्यंकर

‘गरोदरपणात उद्भवलेला मधुमेह’ (Gestational Diabetes). याविषयी आपण बोलतोय. जर डायबेटीस असेल तर निव्वळ आहार नीट पाळल्याने ८०% स्त्रियांची शुगर आटोक्यात राहते. मात्र ही आटोक्यात आहे ना, हे दिवसातून तीन-तीन, चार-चार वेळाही तपासावे लागते. ग्लुकोमीटर मिळतात. ते विकत घ्यावेत. वारंवार तपासणी अत्यावश्यक आहे; कारण शरीरातील साखर तिन्हीत्रिकाळ नियंत्रित असणे आवश्यक आहे. तशी ती नसेल, साखरेची पातळी हेलकावे खात असेल, तर ते वाईट आहे. नियमित तपासणीनुसार आहार, व्यायाम, इतकंच काय पण थोडं थोडं चीटिंग केलेलं चालेल का, हेही ठरवता येतं. साखर आटोक्यात ठेवायची ती नको ती गुंतागुंत उद्भवू नये म्हणून. आहारातील बदल, डाएट हा मुख्य मार्ग. पण, डाएट म्हणजे आईला उपाशी ठेवणं अभिप्रेत नाही. आवश्यक त्या कॅलरी आणि पोषक द्रव्ये मिळायलाच हवीत. चयापचयासाठी पुरेशी शर्कराही मिळायला हवी. फक्त कार्बोदकांचा प्रकार बदलायचा आहे. तारेवरची कसरतच आहे ही. शिवाय हा आहार त्या पेशंटच्या खाद्य संस्कृतीशी सुसंगत हवा. उगाच ब्रोकोली खा पण पास्ता खाल्लात तर पस्तावाल, असला सल्ला निरुपयोगी आहे.

छायाचित्र:- गुगल

काय घ्यायचा आहार?

१. थेट साखर खाणे आणि गोडाचे पदार्थ टाळायचे आहेत. केक, जेली, जॅम, मिठाई, कोला वगैरे अगदी बंद. साखरेऐवजी अन्नात वापरायला स्वीटनर्स मिळतात. ते चवीपुरते(च) वापरावेत. मासे, अंडी, दाणे, दुधाचे (बिन सायीचे) पदार्थ जरूर घ्यावेत. यावर बंधन नाही.

२. फळ अगदी एखादेच खावे. अर्धेच खाल्यास पूर्ण मार्क मिळतील. गोड नसलेल्या फळभाज्या, कंदमुळे (पालक, गाजर, मटार, टोमॅटो, कांदे, मश्रूम) ह्यावर बंधन नाही.

३. दोन वेळा भरपेट जेवण्यापेक्षा, दर थोड्यावेळाने काही खाणे आवश्यक आहे. तसंही गरोदरपणात थोड्या-थोड्या वेळाने भूक लागतेच.

४. सर्व प्रकारचे उपास पूर्णतः टाळावेत. दिवस दिवस उपाशी राहण्याचे उपास डायबेटीसला मानवत नाहीत. तसेच उपासाच्या पदार्थात भरपूर पिष्टमय पदार्थ असतात तेव्हा ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ हाही प्रकार टाळावा. कोणत्याही गर्भारशीने पाच तासांच्या वर उपास काढणे गैरच आहे.

५. आहाराबरोबर व्यायामही महत्त्वाचा आहे. व्यायामाने इन्शुलीनचे कार्य सुविहित होते. रोजचे घरकाम हे व्यायाम म्हणून सहसा पुरेसे नसते. पण, बऱ्याच सुखवस्तू बायकांची तशी ठाम श्रद्धा असते. ‘घरकाम म्हणजेच व्यायाम’ असं समीकरण सिद्ध व्हायचं तर मग चार घरची धुण्याभांड्याची कामे धरावी लागतील. त्यापेक्षा चालणे, पोहणे, एरोबिकस् हे बेस्ट आहे. किती जोरात श्रमायचं याचंही साधं गणित आहे. व्यायाम करताना न अडखळता बोलता यायला हवं. जर धाप लागल्याने बोलणे होत नसेल, तर तुम्ही नको इतक्या जोरात व्यायाम करताय असा अर्थ होतो. डायबेटीस बरोबर ब्लडप्रेशर वाढले असेल किंवा आणखी काही गुंतागुंत असेल तर व्यायाम न करणे योग्य.

६. आहार, व्यायाम वगैरे चालू ठेवून सुमारे आठवड्याभराने किती फरक पडला हे तपासले जाते. यासाठी दर थोड्यावेळाने (जेवणापूर्वी, नंतर वगैरे) रक्त शर्करा मोजली जाते. आहारावर भागलं नाही तर इन्शुलीन इंजेक्शनला पर्याय नाही.) इन्शुलीनच्या गोळ्या मिळत नाहीत. ते टोचूनच घ्यावे लागते.

छायाचित्र:- गुगल

७. इन्शुलीन सुरू केलं म्हणजे काही तरी भयंकर घडलं अशी भावना बाळगून स्वतःला दोष देत बसू नये. काहींमध्ये साखर नियंत्रणात राहत नसेल, व्यायाम अशक्य असेल तर इन्शुलीन हा उत्तम पर्याय आहे. ह्याने बाळाला काही इजा होत नाही. बाळाला इन्शुलीनची सवय वगैरे लागत नाही. इन्शुलीनचा निर्णय तुमचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासून घेतला जातो, म्हणूनच नियमित तपासणी आणि नोंद ठेवण्याला महत्त्व आहे. इन्शुलीन हे तात्पुरते घ्यावे लागते. प्रसूती होताच मधुमेह आणि इन्शुलीनची गरज संपते.

८. जसं जसं वजन वाढत जातं तसा तसा इन्शुलीनचा डोसही वाढूही शकतो. यात आश्चर्यही नाही आणि कमीपणा तर नाहीच नाही. इन्शुलीनचा डोस वाढत जाणे हे आजार बळावल्याचे अवलक्षण नसून बाळ बळावल्याचे सुलक्षण आहे. मग कधी एक, तर कधी दोन, तर कधी तीन वेळा इन्शुलीन सुरू करावं लागतं. हेतू हा की ग्लुकोज पातळी समतल राहावी.

९. बाळाला आवर्जून स्तनपान द्यावे. दूध तयार करायला बऱ्याच कॅलरी लागतात. यामुळे साखर नियंत्रित राहते, वजन घटते आणि डायबेटीस लवकर आटोपतो.

१०. प्रसूतीनंतर सहा आठवड्यांनी पुन्हा एकदा डायबेटीससाठी तपासून पाहणे गरजेचे आहे. आधी म्हटल्याप्रमाणे हा पाहुणा गेला आहे का याची खात्री करायला हवी. पाहुणा परतला आहे असा रिपोर्ट आला तर छानच. मात्र परतलेला हा गनीम पुन्हा हल्ला करू शकतो. तेंव्हा दर तीन वर्षांनी तपासणी करीत राहावे. आणि पाहुणा मुक्कामीच आहे असा रिपोर्ट आला तर आता रीतसर डायबेटीसची औषधे वगैरे सुरू करायला हवीत.

११. पुढच्या प्रेग्नंसीत पुन्हा डायबेटीस होऊ शकतो किंवा दोन प्रेग्नंसींच्या दरम्यान नकळत सुरू झालेला असू शकतो. तेव्हा दिवस राहण्याआधी शुगर तपासून पाहावी. जास्त असेल तर शुगर कंट्रोल करून मगच दिवस राहू द्यावेत. कारण सुरुवातीला, अवयव-जननकाळात, साखरेत घोळवलेलं बाळ सव्यंग निपजू शकतं. दिवस राहण्यापूर्वीची शुगर नॉर्मल असेल तर दिवस राहिल्यावर लवकरच पुन्हा तपासणी करावी.
भारतात डायबेटीस बराच वाढला आहे. बाळ सुदृढ आणि बाळंतीण सुखरूप राहायची असेल तर नेमकी तपासणी आणि नियमित उपचाराला पर्याय नाही.

(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)

faktbaykanbaddal@gmail.com

Web Title: Diet Rules - Don't afraid with diabetes in pregnancy.. If Follow right diet rules it will easily cure after delivery !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.