अभिनेत्री सोनम कपूरनं आपल्याला पीसीओएसचा त्रास असल्याचं सांगितलं होतं. आपल्या इन्स्टाग्राम अकाउण्टवरुन तिनं पीसीओएसचा त्रास आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न याबाबतचा प्रवासही सविस्तर सांगितला होता. आता नुकतीचं तिनं आपण पीसीओएसचा अडथळा पार करुन गरोदर असल्याची बातमीही सांगितली आहे. यानिमित्तानं पीसीओएस आणि गरोदरपण याविषयावर चर्चा होते आहे.
Image: Google
पीसीओएस असताना गरोदर होणं हे खरंच इतकं अवघड असतं का ? या प्रश्नाचं उत्तर देताना तज्ज्ञ म्हणतात, की पीसीओएस असताना गरोदर होणं हे अवघड आहे मात्र अशक्य नाही. पीसीओएस आणि गरोदरपण यातला संबंध जाणून घेताना पीसीओएस ही समस्या नेमकी काय आहे हे समजून घेणं आवश्यक असल्याचं डाॅ. नंदिता पलशेटकर सांगतात.
Image: Google
पीसीओएस म्हणजे ?
साध्या सरळ भाषेत पीसीओएस म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. संप्रेरकातील असंतुलन. पीसीओएस या समस्येमुळे स्त्रीबीज तयार होत नाहीत. पाळी नियमित येत नाही. चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या फोड येतात. चेहऱ्यावरील केस वाढतात. हायपोॲण्ड्रोइजम अर्थात पुरुषी हार्मोन वाढण्याचा आजार असंही पीसीओएसला म्हटलं जातं. सोनोग्राफी तपासणीद्वारे पीसीओएसचा नेमका पॅटर्न काय हे लक्षात येऊन त्यावर औषधोपचार केले जातात. पीसीओएस म्हणजे अमूक एक लक्षण असं नाही. प्रत्येकीच्या बाबतीत सर्वच लक्षणं एकत्रित आढळतात असंही नाही. यात कोणाला पाळी अनियमित असण्याचा त्रास असतो. कोणाला फक्त वजन वाढीची समस्या जाणवते. तर काहींना चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या , केस वाढण्याची समस्या जाणवते. पीसीओएस कमी प्रमाणात असल्यास तो लवकर नियंत्रित करता येतो पण समस्येचं स्वरुप गंभीर असल्यास दीर्घ औषधोपचारांची गरज भासते. पीसीओएसकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मधुमेहासारख्या अवघड समस्या, गरोदरपणात अडचणी असे त्रास उद्भवू शकतात.
Image: Google
पीसीओएस का आणि कोणाला होतो?
14 ते 15 वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलींमध्ये पीसीओएसची लक्षणं आढळतात. भारतीय वंशाच्या स्त्रियांमध्ये पीसीओएसची जनुकं असतात.जोपर्यंत वजन नियंत्रित असतं, खाणं पिणं योग्य असतं तोपर्य्ंत पीसीओएस डोकं वर काढत नाही. पण जीवनशैली बदलली, चुकीचा आहार घेतला गेला तर पीसीओएसची समस्या निर्माण होते. आहारात प्रथिनं आणि फायबरचं प्रमाण कमी ( डाळी, भाज्या) आणि कर्बोदकं ( भात, पोळी) , तळलेले पदार्थ, जंक फूड याचं प्रमाण जास्त यामुळे पीसीओएसची समस्या निर्माण होते. पीसीओएस या समस्येत अनुवांशिकता असते. त्यामुळे आईला, आजीला पीसीओएस असल्यास आपल्यातही ही समस्या निर्माण होवू शकते हे लक्षात घेऊन किशोर वयापासूनच मुलींनी योग्य आहार आणि व्यायाम यांची पथ्यं पाळणं महत्वाचं असतं.
Image: Google
पीसीओएस आणि गरोदरपण
पीसीओएस असलेल्या 30-5- टक्के स्त्रियांना मूल होण्यात अडचण येत नाही. पण ज्यांची पाळी नियमित येत नाही, ज्या खूप बारीक असतात त्यांना मूल होण्यास समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्यावर औषधोपचार करताना बीजांडं तयार होण्यासाठी औषधं द्यावी लागतात. काहींच्या बाबतीत आययुआय ( इंट्रा युट्रेन इन्सरएशन) ही उपचारपध्दती अवलंबवावी लागते तर काही महिलांना आयव्हीएफची गरज भासते. पीसीओएसची समस्या आहे म्हणून आई होता येत नाही याचं प्रमाण मात्र कमी आहे.
Image: Google
पीसीओएस कधीच बरा होत नाही?
पीसीओएस ही समस्या आयुष्यभर साथसोबत करते हे खरंच. पण ही समस्या कधी नियंत्रणात येत नाही हे मात्र चुकीचं. जीवनशैलीत योग्य बदल करुन, रोजच्या दिनक्रमात व्यायामाचा समावेश करुन, चुकीची आहारपध्दती सोडून पीसीओएस नियंत्रणात आणता येतो. पीसीओएसकडे दुर्लक्ष केल्यास त्यातून गंभीर आजाराचा धोका उद्भवतो. पाळी नियमित येणं ही अतिशय महत्वाची बाब आहे. ती जर वेळेत येत नसेल तर त्याकडे लक्ष देऊन वेळीच औषधोपचार घेणं महत्वाचं असतं. वेळीच औषधोपचार घेतल्यास ,पाळी नियमित येण्यासाठी प्रयत्न केल्यास पीसीओएस नियंत्रणात राहातो.
Image: Google
पीसीओएस आणि मानसिक आजार
पीसीओएस आणि वजन वाढणं हे एक द्रृष्टचक्र आहे. ते भेदणं अतिशय आवश्यक असतं. पीसीओएसनं वजन वाढतं आणि वजन वाढल्यानं पीसीओसची स्मस्या वाढते. पीसीओएसवर उपचार करताना केवळ वजन कमी करुन चालत नाही तर मुलीला/ महिलेला समुपदेशनाची देखील गरज असते. कारण पीसीओएसमुळे मानसिक ताणतणाव, नैराश्याचा सामनाही करावा लागतो. वजन वाढ, चेहरा खराब होणं यामुळे रुग्णात न्यूनगंड तयार होवून मानसिक आजार निर्माण होतात.
मानसिक आजार, ताणतणाव याचा पीसीओएसवर परिणाम होतो आणि पीसीओएसचा पुन्हा वजनावर परिणाम होतो. त्यामुळेच पीसीओएस असणाऱ्या रुग्णांशी संवाद साधून वजन कमी करण्यासोबतच त्यांचं समुपदेशन करुन त्यांना हा केवळ हार्मोनल इम्बॅलन्समुळे निर्माण होणारा आजार आहे हे सांगावं लागतं, तो नियंत्रित करण्यासाठी जीवनशैली आणि आहारात काय काय बदल करणं आवश्यक आहे याचं मार्गदर्शन करणं आवश्यक असतं. पीसीओएसची समस्या असताना मानसिक आरोग्य सांभाळणं ही महत्वाची बाब आहे, ज्याकडे सध्या दुर्लक्ष होत असल्याचं डाॅ. नंदिनी पलशेटकर सांगतात.