कधी लग्नाआधीच किंवा कधी लग्न झाल्यावर गर्भ राहणे (pregnancy) ही सामान्य गोष्ट आहे. पण हा राहिलेला गर्भ आपल्याला नको (Unwanted Pregnancy) असेल तर गर्भनिरोधक गोळ्या (Contraceptive pills) घेणे हा सर्वात सोपा उपाय वाटतो. अनेकांना नको असलेला गर्भ पाडण्यासाठी या गोळ्या घेणे ही सोपी पद्धत वाटत असली तरी आरोग्यासाठी मात्र ते अतिशय घातक असते. मात्र महिलांकडून कधी मनाने तर कधी जवळच्या मैत्रीणीने, नातेवाईकांनी दिलेल्या सल्ल्याने सर्रास या गोळ्या घेतल्या जातात. या गोळ्यांमुळे होणारे दुष्परिणामही अनेकदा आपण ऐकून असतो. पण त्या वेळेला डोळ्यासमोर दुसरा उपाय दिसत नसल्याने आपण या गोळ्या घेतो. इतकेच नाही तर या गोळ्या घेणे हा तुलनेने स्वस्त पर्याय असल्याने अनेक जणी त्याचा वापर करतात. पण या गोळ्यांचे भविष्यात शरीरावर अतिशय घातक परिणाम होतात, ज्याची या गोळ्या घेताना आपल्याला जाणीव नसते.
या औषधांबाबत तज्ज्ञांकडून योग्य आणि पुरेशी माहिती घेऊन मगच त्याचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेली ही औषधे नक्कीच फायदेशीर ठरु शकतात. याबाबत प्रसिद्ध लॅपरोस्कोपी सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व उपचारतज्ज्ञ डॉ. अमोदिता अहुजा सांगतात, आपल्या देशात आता लग्नाशिवायही शारीरिक संबंध ठेवणे ही अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. माझ्याकडे अशा अनेक मुली आणि महिला येतात आणि सांगतात की आम्ही काही दिवसांपूर्वी संबंध ठेवले, त्यानंतर गोळ्या घेतल्या, आता काय करु? अशावेळी आम्हालाही नेमके काय आणि कसे उपचार करायचे समजत नाही, त्यामुळे गर्भनिरोधक औषधे घेताना चुकूनही डॉक्टरांचा सल्ला न घेता ही औषधे घेणे धोक्याचे ठरु शकते.
गर्भनिरोधक गोळ्यांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
१. अनियमित पाळी
गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे शरीरातील हार्मोनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात. त्यामुळे पुढे बराच काळ पाळीमध्ये अनियमितता येते किंवा पाळी नेहमीपेक्षा उशीराने येते. तर काही वेळा एकदा पाळी सुरु झाली की पुढे बराच काळ रक्तस्त्राव होत राहतो आणि त्यामुळे अॅनिमिया होण्याची शक्यता उद्भवते.
२. एक्टोपिक प्रेग्नन्सी
गर्भाशयाच्या बाहेर ट्यूबमध्ये होणाऱ्या गर्भधारणेला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. अशी गर्भधारणा झाली की शस्त्रिक्रिया हा एकमेव उपाय असतो. या परिस्थितीत महिलेचा रक्तदाब वाढणे, गर्भाशयाच्या पिशवीला धोका उद्भवणे असे बरेच त्रास होऊ शकतात. त्यामुळे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना या परिस्थितीत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक फटका बसतो.
३. इतर साइड इफेक्टस
गंभीर साइड इफेक्टसबरोबरच गर्भनिरोधक गोळ्यांचे काही लहान साइड इफेक्टसही असतात. यामध्ये मळमळ आणि उलट्या होतात. ओटीपोटात अस्वस्थ होणे, स्तन सैल होणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या घेणे हा सोपा उपाय वाटत असला तरीही तो घेताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.