Join us   

गरोदरपणात पोषक आहारासह १ गोष्ट खा रोज - नियमित; बाळ आणि आईचीही तब्येत राहील ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 2:03 PM

गर्भवतीच्या आहारात असायलाच हवी अशी सुकामेव्यातील एक महत्त्वाची गोष्ट, तब्येतीसाठी एक से एक फायदे...

ठळक मुद्दे गर्भवती महिलेच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असून तिच्या पोषणाची योग्य ती काळजी घ्यायला हवीसुकामेवा खाताना त्यात बेदाणे आवर्जून खायला हवेत, बेदाणे खाण्याचे फायदेच फायदे

गर्भधारणा म्हणजे महिलेच्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा. या काळात आपला आहार चांगला असणे अतिशय आवश्यक असते. बाळाचे चांगले पोषण होण्यासाठी आणि स्त्रीची तब्येत ठणठणीत असणे आवश्यक असते. या काळात शरीरात होणाऱ्या बदलांशी जुळवून घ्यायचे असेल तर आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गर्भधारणा झालेल्या स्त्रीने भाज्या, फळे, डाळी, दूध, सुकामेवा असे पदार्थ खायला हवे. तसेच वेळच्या वेळी जेवणे, भूक लागेल तेव्हा जंक फूड न खाता पौष्टीक पदार्थ खाणे आवश्यक असते हे लक्षात घ्यायला हवे. 

(Image : Google)

इतर आहाराबरोबरच या काळात एक गोष्ट गर्भवती स्त्रियांनी आवर्जून खायला हवी ती म्हणजे बेदाणे. आपण सुकामेवा म्हटले की काजू, बदाम, पिस्ते किंवा सुके अंजीर काळे मनुके खातो. पण बेदाणे खातोच असे नाही. दुधासोबत, रात्री पाण्यात भिजवून किंवा थेटही आपण बेदाण्यांचे सेवन करु शकतो. यामध्ये काळे मनुके आणि बेदाणे दोन्हीही आरोग्यासाठी चांगले असतात. मात्र या काळात बेदाणे खाणे अतिशय फायदेशीर असते. पाहूयात बेदाणे खाण्याचे फायदे...

१. लोह 

दररोज ५ ते १० बेदाणे खाल्ले तर शरीरात लोहाची मात्रा चांगली राहण्यास मदत होते. गर्भधारणेत स्त्रीला आणि पोटात असलेल्या बाळाला दोघांनाही लोहाची आवश्यकता असल्याने लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी मनुके हा उत्तम उपाय ठरतो. 

२.  कॅल्शियम 

बेदाण्यांमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते. बाळाची हाडे मजबूत होण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. गर्भधारणेच्या काळात गर्भवती महिलेच्या शरीरातही कॅल्शियमची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. ९ महिने गर्भाचा मणक्यावर आणि शरीरावर भार येत असल्याने हाडे मजबूत असावीत यासाठी बेदाणे खाणे उपयुक्त ठरते. 

(Image : Google)

३. ऊर्जा मिळण्यास फायदेशीर 

बेदाण्यांमध्ये नैसर्गिक साखर, मायक्रोन्यूट्रीयंटस, बायोअॅक्टीव्ह कंपाऊंडस असतात. तसेच बेदाणे पचायला हलके असल्याने ते सहज पचतात आणि शरीराला त्वरीत ऊर्जा मिळण्यास मदत होते. याशिवाय बेदाण्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे फॉस्फरस आणि पोटॅशियमही असते. त्यामुळे अचानक भूक लागली आणि खायला करायला वेळ असेल तर पटकन बेदाणे तोंडात घातले तर उपयुक्त ठरते. 

४. अपचनापासून आराम 

गर्भधारणेच्या काळात सुरुवातीला मळमळ, उलट्या अशी लक्षणे दिसून येतात. तसेच अनेकींना गॅसेस, बद्धकोष्ठता हे त्रासही उद्भवतात. मात्र नियमीतपणे बेदाणे खाल्ल्यास त्याचा पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी आपल्या आहारात बेदाण्यांचा आवर्जून समावेश करायला हवा.    

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सप्रेग्नंसीआहार योजना