प्रेग्नन्सीची बातमी कळताच होणाऱ्या आई- बाबांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला अत्यानंद होतो, अंगात जणू नवा उत्साह संचारतो. पण त्यासोबतच एक चिंताही असतेच.. गरोदरपण, बाळंतपण या सगळ्या काळात होणाऱ्या आईची तब्येत सांभाळणे हा सगळ्या कुटूंबापुढचा प्रश्न. म्हणूनच तर उर्मिला निंबाळकरची ही पोस्ट नक्की बघा.. डॉक्टरांच्या सल्ल्याने या काळात तुम्ही औषधं (health tips during pregnancy) तर घेणारच पण त्यासोबतच हा सुकामेवाही गर्भारपणात किंवा नंतर बाळंतपणात नक्की खा.. यामुळे आई आणि बाळ दोघांचीही तब्येत उत्तम राहील.
१. भिजवलेले बदाम
गरोदरपणात बऱ्याचदा पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे अशा काळात भिजवलेले बदाम खाणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. भिजलेले बदाम खाल्ल्यामुळे फायटिक अॅसिड कमी होतं आणि फॉस्फरस रिलीज होण्यास मदत मिळते. त्यामुळे हाडं मजबूत होण्यास फायदा होतो.
२. सुके अंजीर
शरीरातील रक्ताची पातळी उत्तम राखण्यासाठी अंजीर खाणे फायद्याचे ठरते. अंजीरामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ते पाचक ठरतात. गरोदरपणा आणि बाळंतपण याकाळात अनेक जणींना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यासाठी अंजीर खाणे फायद्याचं ठरतं.
३. भिजवलेले काळे मणुके
काळे मणूके पचनासोबततच शरीरातील रक्ताची पातळी वाढविणे, ॲनिमियाचा त्रास कमी करणे, बद्धकोष्ठता कमी करणे यासाठी गुणकारी ठरतात. गर्भारपणात अनेक जणींना अशक्तपणा येतो. हा अशक्तपणा काळे मणूके नियमितपणे खाल्ल्यास कमी होऊ शकतो.
४. खजूर
रक्ताची पातळी वाढविण्यासाठी खजूर खाणे अतिशय उपयुक्त ठरते. गर्भवती महिलांना अशक्तपणा येतो. हा त्रास कमी करण्यासाठी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूर खाल्ल्यामुळे झोपदेखील चांगली येते. बऱ्याचदा अनेक गर्भवती महिलांना रात्री झोप येत नाही. त्यांच्यासाठी खजूर खाणे हा उत्तम उपाय होऊ शकतो.
५. अक्रोड
यामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. जे गर्भाच्या मेंदूच्या विकासातही उपयुक्त ठरतं. यासोबतच अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. शरीराला उर्जा देण्याचं आणि ते टिकवून ठेवण्याचं काम अक्रोड करतात.