Join us   

गरोदरपणात हातांना, पायांना किंवा पोटाला खूप खाज येते? त्यावर उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 5:33 PM

गरोदरपणात पोटाला, हातापायाला खाज येऊ शकते, पण खाज खूप वाढली तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका..

ठळक मुद्दे गरोदरपणात खाज येणं सर्वसामान्य आहे. सामान्यतः त्याला सध्या उपायांनी फरक पडतो. मात्र धोका आणि गुंतागुंत टाळण्यासाठी खाज येण्यामागचं नेमकं कारण समजणं महत्वाचं आहे.

गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातला असा काळ असतो ज्यात ती शरीराच्या सर्व भागातील बदलांचा अनुभव घेते. असाच एक बदल म्हणजे खाज येणारी त्वचा. गरोदरपणात त्वचेला, त्यातही पोटाच्या त्वचेला खाज येणं हे सर्वसामान्य आहे. काही वेळा हात आणि पावलांनाही खाज येऊ शकते मात्र त्याची अधिक तपासणी करावी लागते. या खाज येण्याची तीव्रता व्यक्तिपरत्वे बदलते. काही वेळा ही खाज इतकी तीव्र असते की त्यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते.

गरोदरपणातील खाज येण्याची कारणं

अनेक कारणांनी खाज येऊ शकते. ही कारणं खालीलप्रमाणे असू शकतात,

 

हार्मोन्समध्ये होणारे बदल 

गरोदरपणात हार्मोन्सची पातळी खालीवर होत राहणं अपरिहार्य असतं. गरोदरपणात तुमच्या शरीरात निर्माण होणाऱ्या आणि टिकून राहणाऱ्या हार्मोन्सच्या लोंढ्यामुळे त्वचा संवेदनशील होऊन खाज सुटू शकते. शिवाय, या हार्मोन्सच्या कृतींमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कार्यान्वित होऊन त्यामुळेही खाज सुटू शकते. पोट ताणलं जाणं वेगाने वाढणाऱ्या भ्रूणामुळे पोटाभोवतीची त्वचा ताणली जाते. या अचानक ताणलं जाण्यामुळे खाज येऊ शकते. संवेदनशील नसा हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे  नसा संवेदनशील होतात. नसा संवेदनशील झाल्या की लहान शारीरिक बदलदेखील जाणवतो.

कोलेस्टेटीस

गरोदरपणात जेव्हा बाइल स्रावाला अडथळा येतो तेव्हा शरीरात तो स्राव साठून राहायला सुरुवात होते. हा वाढीव बाइल स्राव यकृतातील एन्झाइम्समध्ये बदल घडवतो आणि त्यामुळे खाज येऊ शकते. मात्र ही खाज इतरवेळी येणाऱ्या खाजेपेक्षा वेगळी असते. कोलेस्टेटीस हे एक प्रकारे यकृताला झालेलं नुकसान असतं ज्यामुळे गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात गर्भालादेखील धोका पोचू शकतो. बाइल स्राव किती साचला आहे यावर खाज येण्याची तीव्रता अवलंबून असते. यामुळे बाळ वेळेआधी जन्माला येण्याचा धोका असू शकतो. त्वचेची अवस्था : खाज येण्याबरोबर जर चट्टे देखील असतील तर त्याचा संबंध गरोदरपणातील त्वचेच्या विकारांशी असू शकतो.

खाज येण्यावरचे उपाय 

सामान्यतः कोलेस्टेटीस वगळता इतर खाज ही सहज बरी करता येऊ शकते. त्यासाठी काही युक्त्या..

1. त्वचा मऊ राहण्यासाठी पुरेसं मॉइश्चरायझर वापरा. त्वचा कोरडी होऊन फुटू नये यासाठी पुरेसं पाणी / द्रवपदार्थ प्या. 2. हातांना आणि पावलांना मसाज केल्याने खाज कमी होऊ शकते. तुमच्या जोडीदाराच्या किंवा इतर काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने रोज असा मसाज घेण्याचा प्रयत्न करा. 3. हातावर आणि पावलांवर दिवसातून अनेक वेळा बर्फाची पिशवी ठेवा. त्याने खाज कमी होते. 4. कॅलॅमाइन लोशनसारख्या सहज मिळणाऱ्या क्रीम्समुळे काही प्रमाणात उपयोग होतो. 5. या साध्या उपायांमुळे खाज बारी होत नसेल तर अधिकृत वैद्यकीय सल्लागाराकडून / डॉक्टरकडून सल्ला घ्या. गरोदरपणात डॉक्टरला न विचारता कोणतीही औषधं घेऊ नका. 6. कोलेस्टेटिसला वैद्यकीय उपचार करावे लागतात. तुम्हाला जर कोलेस्टेटीसमुले खाज येत असेल तर तुमचे डॉक्टर तुमची बाइलची आणि यकृतातील एन्झाईम्सची पातळी मोजतील आणि इतर आवश्यक त्या तपासण्या करतील.

7. कोलेस्टेटीस असल्यास बाळ लौकर जन्माला येणं आणि आहे तसं गरोदरपण चालू राहणं यातील धोक्यांचा अंदाज बांधणं महत्वाचं ठरतं. त्याप्रमाणे तुमचे डॉक्टर्स तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय सुचवतील. 8. गरोदरपणात खाज येणं सर्वसामान्य आहे. सामान्यतः त्याला सध्या उपायांनी फरक पडतो. मात्र धोका आणि गुंतागुंत टाळण्यासाठी खाज येण्यामागचं नेमकं कारण समजणं महत्वाचं आहे.

 तज्ज्ञ सल्ल्यासाठी विशेष आभार : डॉ. सीता राममूर्ती MBBS.DGO.MD.FRCOG.FICOG)

टॅग्स : प्रेग्नंसीगर्भवती महिला