गरोदरावस्थेत शारीरिक स्वास्थ्य आणि आरोग्य सांभाळणं अतिशय गरजेचं असतं. जर आईचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं असेल तर होणाऱ्या बाळाचंही चांगलंच असेल. यासाठी बाळंतपणापर्यंत नियमित काही व्यायाम रोज करणं गरजेचं आहे. अर्थात हे व्यायाम करत असताना अति व्यायाम होणार नाहीत, शरीरावर अवाजवी ताण येणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच असे व्यायाम केले पाहिजेत जेणेकरून कुठलाही धोका आईला किंवा बाळाला निर्माण होत नाही.
गरोदरावस्थेत व्यायाम करताना...
१) हलके फुलके व्यायाम करावेत.
२) तुमची दमणूक होईल असे व्यायाम करू नयेत
३) बाळंतपणाच्या शेवटच्या काही आठवड्यात व्यायाम पूर्णपणे थांबवायला हवेत.
४) ज्या व्यायामात श्वास लागतो , धाप लागते असे व्यायाम करु .
५) एरवी तुम्ही नियमित व्यायाम करणारे नसाल तर अचानक गरोदरावस्थेत व्यायाम सुरु केले तर ताण येऊ शकतो. दमायला होऊ शकतं.
६) सुरुवातीला आठवड्यातून तीन वेळा १५ मिनिटांचा व्यायाम करावा. शरीराला जरा सवय झाली की हळूहळू आठवड्यातून पाच वेळा ३० मिनिटं व्यायाम करावा.
७) कुठलाही व्यायाम करण्याआधी वॉर्मअप करणं गरजेच्ं आहे.आणि व्यायाम करून झाल्यावर शरीरावर आलेला ताण घालवण्यासाठी शवासनासारखे आरामदायक व्यायाम करावेत.
८) व्यायाम करत असताना मधून मधून घोट घोट पाणी पित राहावं. म्हणजे शरीर हायड्रेट राहातं.
९) गरज वाटल्यास व्यायाम करण्यासाठी व्यावसायिक ट्रेनरची मदत घ्यावी. जेणेकरून व्यायाम करायला ते तुम्हाला मदतही करू शकतील आणि कुठले व्यायाम केले पाहिजेत हे सुचवू शकतील.
१०) याशिवाय, चालणे, पोहणे, हलका एरोबीक्स यासारखे व्यायामही करता येतात.
गरोदरावस्थेत हे व्यायाम टाळावेत..
१) घोडेस्वारी, जिम्नॅस्टिक्स, स्कीईंग, स्केटिंग यासारखे व्यायाम करू नयेत. कारण यात पडून इजा होण्याची दाट शक्यता असते.
२) समुद्र सपाटीपासून खूप उंच ठिकाणी व्यायाम करू नये. यामुळे अल्टीट्युड सिकनेस होऊ शकतो.
३) कराटे, ज्युडो, मार्शल आर्टस्, किक बॉक्सिंग यासारखे खेळ खेळू नयेत. यातही इजा होण्याची दाट शक्यता असते.
४) टेनिस, फुटबॉल, रग्बी सारखे खेळ टाळावेत.
५) स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडींग करू नये.
गरोदरावस्थेत कोणत्या टप्प्यावर व्यायाम टाळावेत?
१) जर गरोदरावस्थेत बीपी, दृदयरोग यांचं निदान झालं असेल तर व्यायाम करू नये.
२) गर्भाशय मुख कमजोर असेल तर..
३) रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होत असेल तर…
४) गर्भपाताची शक्यता किंवा तसा इतिहास असेल तर..
५) प्लॅसेंटा किंवा वार खूप खाली असेल तर..
६) वेळेच्या आधी बाळंतपणाचा इतिहास असेल तर..
७) जुळं असेल तर…
८) प्रेग्नन्सीमध्ये काही स्त्रियांना अतिताणाचा त्रास सुरु होतो. तसा त्रास होत असेल तर…
कुठल्या प्रकारचे व्यायाम करावेत?
१) जसजसं बाळाचं वजन वाढायला लागतं अनेक स्त्रियांमध्ये पाठदुखीचा त्रास सुरु होतो. पाठदुखी कमी व्हावी यासाठीचे व्यायाम करता येतात.
२) पेल्विक व्यायामांमुळे पेल्विक स्नायू बळकट होतात.
३) गरोदरावस्थेत व्यायाम केल्यामुळे ताण तर जातोच पण पोट साफ राहतं आणि क्षमता वाढते. याचा बाळंतपणात नक्कीच उपयोग होतो.
विशेष आभार: डॉ. रश्मी धिल्लोन पै
M.D., F.R.C.O.G (UK), D.N.B, F.C.P.S, D.G.O., F.I.C.O.G