कोविडची तिसरी लाट रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणं हा एक महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे असं तज्ज्ञ वारंवार सांगत असूनही देशभरात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लस तुटवडा असा एक प्रश्न आहे तर काही जिल्ह्यातून लोक लस घ्यायला संकोच करताहेत, घाबरत आहेत अशा बातम्या येत आहेत. अपूर्ण, चुकीची माहिती. नोंदणीकरणाबाबत गैरसमज तसंच लसीकरणामुळे नपुंसकत्व येतं, मूल होत नाही अशा अफवा आणि विशिष्ट समुदायाशी संबंधित वेगवेगळ्या कारणामुळे अनेक लोक लस घेण्याचं टाळत आहेत. लस घेण्याबद्दल मनातली भीती दूर करण्याची गरज आहे म्हणून काही गैरसमज आणि त्या तुलनेत वास्तव काय आहे ते पुढे मांडलं आहे.
(छायाचित्रं -गुगल)
गैरसमज लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन पूर्व नोंदणी, नियोजित वेळेचं पूर्व आरक्षण आवश्यक आहे वास्तव नाही. लसीकरणाची पूर्व नोंदणी सक्तीची नाही. १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती जवळच्या लसीकरण केंद्रावर गेल्यावर लसीकरण करणारे जागेवर नोंदणी करतात आणि लस उपलब्ध असल्यास तेव्हाच लस पण देतात.
गैरसमज ग्रामीण भागात कोविड लसीकरणाच्या सोयी आणि नोंदणीकरणाचे मार्ग मर्यादित आहेत. वास्तव ग्रामीण भागात नोंदणीकरणाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. कोविन ॲपच्या माध्यमातून नोंदणी. आरोग्य कर्मचारी किंवा आशा जवळच्या केंद्रावर प्रत्यक्ष नोंदणी करून लस देतात किंवा १०७५ या हेल्पलाईनच्या माध्यमातून नोंदणी करण्यास मदत केली जाते.
गैरसमज लसीकरणात शहरी आणि ग्रामीण, किंवा डिजिटल तफावत असून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लसीकरण कमी होत आहे. वास्तव १०३ लाख कोविड केंद्रांपैकी ६१,८४२ कोविड लसीकरण केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य केंद्र म्हणजे ५९.७ टक्के केंद्र ग्रामीण भागात आहेत. या केंद्रात जागेवर नोंदणी करून लस दिली जात आहे. आणि कोविनवर उपलब्ध असलेल्या ६९ ९९५ केंद्रांपैकी ४९८८३ म्हणजे ७१ टक्के लसीकरण केंद्र ग्रामीण भागात आहेत.
गैरसमज आदिवासी भागात लसीकरणाचं प्रमाण कमी आहे. वास्तव कोविनवर ३ जूनपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार आदिवासी जिल्ह्यात एक लाख लोकसंख्येच्या सरासरी लसीकरणाचं प्रमाण राष्ट्रीय सरासरी प्रमाणापेक्षा जास्त आहे. आदिवासी भागातील १७६ जिल्ह्यांपैकी १२८ जिल्ह्याची कामगिरी राष्ट्रीय लसीकरणाच्या व्याप्तीहून जास्त आहे. आदिवासी भागात राष्ट्रीय सरासरीहून जास्त केंद्रांवर जागेवर नोंदणी होत आहे.
(छायाचित्रं -गुगल)
गैरसमज लसीकरण झाल्यानंतर त्याचे तीव्र परिणाम किंवा लसीकरणाच्या परिणामाला बळी पडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढतंय अश्या बातम्या येताहेत. वास्तव या बातम्या अपूर्ण आणि मर्यादित माहितीवर आधारित आहेत. लसीकरणानंतर झालेला प्रत्येक मृत्युचं कारण लस असू शकत नाही. लसीकरणाच्या विपरीत परिणामाचा अभ्यास करणाऱ्या समितीने मृत्यूचा तपास करून तो मृत्यु लसीकरणामुळे झाला आहे सांगितल्या शिवाय तो लासिकरणामुळेच झालेला आहे असे आपोआप गृहीत धरता येत नाही.
गैरसमज जानेवारी ते जून महिन्या दरम्यान लसीकरणानंतर झालेल्या मृत्युंपैकी ४८८ मृत्यू हे कोविड लसीकरण पश्चात झालेल्या समस्यांमुळे झाले आहेत. वास्तव संपूर्ण देशभरात दिलेल्या २३. ५ कोटी लसीच्या मात्रेनंतर मृत्युमुखी पडलेल्या लोकांचं प्रमाण ०.०००२% आहे. कोविड संसर्ग झाल्यानंतर मृत्यु होणाऱ्यांची संख्या १ टक्का आहे. हे मृत्यू लसीकरणाने रोखता येतील. त्यामुळे कोविड १९ मुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणापेक्षा लसीकरणामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण नगण्य आहे.
- (‘कोविड सुसंगत वर्तन उत्तेजन आणि लस संकोच निर्मुलन’ डीएलए फाउंडेशन आणि युनिसेफचा संयुक्त उपक्रम)