प्रसूतीनंतर थकवा येणं ही सामान्य बाब मानली जाते . गरोदरपणात शरीरात होणारे बदल, नंतर प्रसूती , झोप, काम या अनेक गोष्टींचा परिणाम म्हणून प्रसूतीनंतर महिलांना थकवा येतो. पण अनेकजणींच्या बाबतीत हा थकवा खूप काळापर्यंत राहातो. या थकव्यावर उपाय करणं किंवा शोधणं हे आई आणि बाळ दोघांसाठीही महत्त्वाचं आहे. आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त थकवा का जाणवतो हे शोधून त्यावर उपाय करता येतात.
प्रसूतीनंतर थकवा का येतो?
* प्रसूतीनंतर काही महिलांमधे हायपरअँक्टिव्ह थायरॉइड ग्रंथी वाढते. त्याचा परिणाम म्हणून थकवा येतो. त्यामुळे थायरॉइडसंबंधी समस्या असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. शिवाय प्रसूतीनंतर एक आरोग्यदायी जीवनशैली आणि समतोल आहार प्रसूतीनंतरचा थकवा घालवण्यासाठी आवश्यक आहे. * प्रसूतीदरम्यान जास्त वेदना जास्त काळ झाल्या असतील तर त्याचा परिणाम म्हणूनही खूप थकवा येतो. सिझेरियन झालेल्या महिलांनाही प्रसूतीनंतर खूप थकवा येतो. * बाळ अंगावर पितं. त्यामुळे आईच्या शरीरातील सर्व पोषक तत्त्वं बाळाच्या शरीरात जातात. आपल्या शरीरातील पोषक तत्त्वांची गरज जर महिला पूर्ण करु शकल्या नाही तर त्यांना प्रसूतीनंतर दीर्घ काळ थकवा जाणवतो. * प्रसूतीदरम्यान जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला असल्यास शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. या अँनेमिक स्थितीमुळेही महिलांना कमालीचा थकवा जाणवतो. * प्रसूतीनंतर अनेक महिलांना नैराश्य येतं. जास्त जाणवणारा थकवा हे या नैराश्याचं लक्षण असू शकतं. त्यामुळे आहार आणि इतर बाबी योग्य असल्या तर येणार्या थकव्याचा संबंध नैराश्याशी असू शकतो. त्यामुळे आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. * दर दोन तीन तासांनी आईला बाळाला दूध पाजावं लागतं. बाळाच्या दुधाचं हे वेळापत्रक पाळताना आईच्या झोपेवर परिणाम होतोच. अपुरी झोपही थकवा आणि अशक्तपणाचं कारण असतं.
थकवा कमी करण्यासाठी
प्रसूतीनंतर थकवा आणि अशक्तपणा या दोन गोष्टी हातात हात घालून येतात. हा त्रास प्रत्येक बाळांतिणीलाच होतो असा विचार करुन त्याकडे दुर्लक्ष करणं, त्यावर काहीच उपाय न करणं, मार्ग न शोधणं हे त्या स्त्रीच्या आरोग्यासाठी अतिशय वाईट असतं. त्यामुळे हातातल्या गोष्टी करुन पाहायला हव्यात. त्या करुनही जर थकवा आणि अशक्तपणा कमी होत नसेल तर मग डॉक्टरांना गाठायला हवं. 1 बाळ झाल्यावर आईचं पूर्ण लक्ष बाळात असतं. पण हे लक्ष देताना तिला घरातल्या इतर जबाबदार्याही पार पाडाव्या लागतात. यात बाईची अशक्य धावपळ होते. त्यामुळे घरातले सर्व कामं, बाळाशी संबंधित सर्व काम आपणच करायला हवीत हा अट्टाहास सोडून घरातल्या इतरांची मदत घ्यायला हवी. घरकामासंबंधित जबाबदार्या घरातल्या सदस्यांमधे वाटून द्यायला हव्यात. शिवाय बाळ मधेच उठल्यानंतर त्याला परत झोपवणं, बाळाचे लंगोट बदलणं या जबाबदार्या नवरा किंवा आणखी कोणाला वाटल्यास बाईवरचा ताण हलका होतो आणि तिला पुरेसा आराम मिळतो. आराम मिळाला तरी बाईमधे उत्साह, ताकद आणि उर्जा येते.
2 प्रसूतीनंतर आरोग्य जर चांगलं राखायच असेल तर पुरेशी झोप होणं आवश्यक आहे. अपुर्या झोपेमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास उद्भवतात. रात्री सलग झोपणं किंवा दिवसा अडथळा न येता आराम करणं हे बाळामुळे शक्य नसतं. अशा वेळेस आपलं बाळ कधी झोपतं, किती झोपतं हे बघून आपली आवश्यक कामं आणि आराम याचा ताळमेळ बसवावा. बाळ झोपतं त्यादरम्यान जर बाईनं जास्तीत जास्त विश्रांती घेतली तरी तिचा थकवा कमी होतो.
3 प्रसूतीनंतरच्या फिटनेसकडेही बाईनं लक्ष पुरवायला हवं. त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. शरीर आणि मनाचा थकवा दूर करण्यासाठी योगसाधनेतील आसनं करणं, स्वत:च्या आवडीच्या गोष्टी करणं आवश्यक आहे. तसेच मन प्रसन्न ठेवण्यासाठी आणि शरीरात ताकद येण्यासाठी नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे.
4 शरीरातील ऊर्जा शरीरातील आद्रतेवर अवलंबून असते. आणि ही आद्रता टिकवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. पुरेसं पाणी जर पिलं जात नसेल तर थकवा येतो.
5 गरोदरपणात खाण्यापिण्याची जितकी काळजी बाई घेते तितकी प्रसूती पश्चात घेत नाही किंवा घेऊ शकत नाही. पण बाळांतपणात शरीराची झालेली झीज भरुन काढण्यासाठे, शरीरात पोषक तत्त्वं जाण्यासाठी जीवनसत्त्वं, खनिजं आणि इतर आवश्यक पोषणमूल्ययुक्त आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. आहारात दूध, फळं, सर्व प्रकारच्या पालेभाज्या,फळभाज्या, डाळी, उसळी असणं आवश्यक असतं. आहाराचा नियम जर पाळला जात नसेल तर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
हे पदार्थ अशक्तपणा दूर करतात
1. बदाम,शेंगदाणे, काजू यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यांच्या चांगले फॅटस असतात तसेच प्रथिनांचं प्रमाणही भरपूर असत्तं. प्रसूतीनंतर हे पदार्थ आहारात असायलाच हवेत. शेंगदाणे आणि बदाम यामुळे मेंदू, स्नायू आणि हाडांचं पोषण होतं. यात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्यानं हे खाणं आवश्यक आहे. रोज संध्याकाळी चहाऐवजी एक मूठ सुकामेवा खाल्ल्यास त्याचा उपयोग ताकद वाढण्यात होतो.
2 प्रसूतीनंतर खूपच अशक्तपणा जाणवत असेल तर रोज सफरचंद खायला हवं. सफरचंद बाराही महिने मिळतात. सफरचंद खाल्ल्यानं लगेच ऊर्जा मिळते शिवाय त्यात भरपूर प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस असतात. यामुळे प्रसूतीनंतर इतर आजारांना तोंड द्यावं लागत नाही. सफरचंद खाल्ल्यानं रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
3 अशक्तपणा आणि थक्वा दूर करण्यासाठी मशरुम खायला हवेत. मशरुमच्या सेवनानं शरीरात ऊर्जा निर्माण होते. मशरुममधे प्रथिनं, तंतूमय घटक, फोलेट, ब जीवनसत्त्वं, , राईबोलेविन, नियासिन, हे घटक असतात. शरीराची झीज भरुन काढण्यासाठी हे घटक अवस्यक असतात. मशरुममुळे अँड्रेनलिन हे संप्रेरकं स्त्रवतं. या संप्रेरकामुळेही शरीराचा थकवा दूर होवून उत्साह येतो. मशरुम हे भाजीच्या, सलाडच्या किंवा सॅण्डविचमधे टाकून खाता येतं.
4 केळं खाल्यानं त्वरित ऊर्जा मिळते. केळ्यात जीवनसत्त्वं, कॅल्शिअम, लोह, अँण्टिऑक्सिडण्ट आणि बुरशीविरोधी घटक असतात. या गुणांमुळे शरीरातील थकवा लवकर कमी होतो. अशक्तपणा जातो. शरीरात ताकद येते.
5 बटाट्याचा आरोग्यदायी पर्याय म्हणजे रताळी. शरीरातील सर्व क्रिया उत्तम राखण्यास रताळी मदत करतात. रताळ्यात तंतूमय घटक मोट्या प्रमाणात असतो. यातील पोटॅशिअम शरीरातील इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण संतुलित ठेवतात. रताळी खाल्ल्यानं उच्च रक्तदाब कमी होतो. रताळ्याच्या सेवनानं शरीराला आराम मिळतो. तणाव , थकवा आणि अशक्तपणा घालवण्यासाठी रताळी खायलाच हवी.
6 घेवड्याच्या शेंगा प्रसूतीनंतर खाणं खूप आवश्यक मानलं जातं. कारण यात तंतूमय घटक, काबरेहायड्रेट आणि प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील थकव्याला दूर करतात्. घेवड्यात तंतूमय घटक जास्त असल्यानं तो रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतो. प्रसूतीनंतर साखरेची पातळी सतत वर खाली येते. त्यातून थकवा आणि अशकतपणा जाणवतो. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास म्हणूनच घेवडा आवश्यक बाब आहे.