गरोदरपणाचा काळ बाईसाठी खूपच सुंदर असतो. तिच्या पोटात बाळ वाढतंय असं कळलं की नवरा, घरचे सगळेच तिच्या अवतीभवती राहून तिची काळजी घ्यायला लागतात. पहिले तीन महिने हा गरोदर अवस्थेचा पहिलावहिला टप्पा असतो. या काळात स्त्रीच्या शरीरात बरेच बदल घडतात.
काय घडतं पहिल्या तीन महिन्यात?
गरोदर अवस्थेच्या `एकूण 40 आठवड्याचा भाग हा तीन तिमाहींमध्ये विभागून बघितला जातो. प्रत्येक टप्पा शरीरातील बदलांच्या दृष्टीनं वेगळा असतो. बीजांडं व शुक्राणूंचा संयोग होऊन पहिल्या बारा आठवड्यात त्यानं जीव धरणं म्हणजे फर्टिलायझेशन हा पहिला टप्पा. या तीन महिन्यात स्त्रीच्या शरीरात काही बदल घडून येतात. या बदलांचा अनुभव तिनं याआधी कधीच घेतलेला नसतो. त्यादृष्टीनं गरोदरपणाचे पहिले तीन महिने खूप महत्त्वाचे असतात.
पहिल्या तिमाहीत घडणारे मुख्य बदल शरीरात घडणार्या बदलांचा त्रास सगळ्याच स्त्रियांना जाणवतो असं नाही. काहीजणींचा हा काळ खूपच छान, निरोगीपणानं व्यतीत होतो. काहींना मात्र या बदलाचा ताप सहन करावा लागतो. हे बदल असे :
1. स्तन दुखणं, हुळहुळणं : हार्मोनल बदलांचा हा ही एक परिणाम असतो. या काळात स्तनामध्ये दूग्धनलिकाही तयार होत असतात. त्याकारणानं स्तनाचा आकार बदलतो, वाढतो आणि पूर्वीच्या ब्रा बदलाव्या लागतात.
2. मलावरोध : पहिल्या तीन महिन्यात प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन शरीरात वाढल्याचा परिणाम आतड्यांचं आकुंचन पावण्यात होतो. शिवाय या काळात शरीराला लोह हवं म्हणून दिलेलं असतं. त्याचाही परिणाम म्हणून बध्दकोष्ठता होते. ही सर्वसामान्यपणे जाणवणारी अडचण असल्यामुळे या काळात स्त्रीला खाण्यात फायबर आणि विविध तर्हेची सरबतं, पेयं पिण्याचा सल्ला दिला जातो.
3. थकायला होणं : गर्भात वाढणार्या जिवाला सांभाळयचं म्हणून शरीराला पूर्वीपेक्षा जास्त कामाला लावलेलं असतं. तो ताण येतोच. म्हणूनच कुठलेही अधिकचे श्रम या काळात करू नये आणि मधेमधे विश्रांती घ्यावी हे योग्य. 4. सतत लघवीला लागणं : जसजशी बाळाची वाढ होते तसतसा गर्भाशयाचा आकारही वाढू लागतो. त्याचा मुत्राशयावर साहजिकच दाब येतो. त्यातून सतत लघवीला जाण्याची भावना होते. मात्र कितीही वेळा जावं लागलं तरी कंटाळा न करता द्रव पदार्थांचं एकूण आहारातलं प्रमाण जास्त असलं पाहिजे हे ध्यानात घेणं गरजेचं.
पहिल्या तिमाहीत बाळाची वाढ या काळात बाळाला अवयव फुटू लागतात. शरीरयंत्रणेचा विकास व्हायला लागतो. दहाव्या आठवड्यापर्यंत बाळाचे हात पाय सावकाशीनं वाढायला लागतात. नखं तर पाच ते आठ आठवड्यांच्या दरम्यान फुटलेली असतात. आठ आठवड्यांनी बाळाच्या आतड्यांची निर्मिती झालेली असते. शरीरात होणार्या बदलांना सामोरं जाण्यासाठी व्यवस्थित पोषक आहार व भरपूर पाणी, सरबतं पिणं खूप गरजेचं आहे. नव्या जिवाच्या वाढीचं काम नव्यानं शरीरात चालू असतं, त्यामुळं जरूरीपेक्षा जास्त श्रम न करता विश्रांती घेऊन आपल्या शरीरात होणारे बदल पाहावेत, निराखावेत अन नोंदवावेत. ते खूप छान असतात.