गरोदरपणातील युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन / मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग. अनेकींना गरोदपणात वारंवार लघवीला जावे लागते. पण ते म्हणजे इन्फेक्शन नव्हे. मात्र अनेकींना गरोदपणात युरिन इन्फेक्शन होते. ज्यावेळी मूत्रमार्गातील किडनी, गर्भाशय, मूत्रपिशवी किंवा मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग होतो त्यावेळी त्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) म्हणतात. गरोदरपणात हा आजार कॉमन आहे. त्याचं कारण असं की, गरोदरपणाच्या काळात मूत्रमार्गात होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळे महिलांना इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. गर्भाशयाचा आकार वाढतो त्यामुळे मूत्राशयावर त्याचा जास्त दाब येतो. त्यामुळे मूत्राशयातील सर्व मूत्र बाहेर टाकणं कठीण होतं. या राहून गेलेल्या मूत्रामुळे संसर्ग होऊ शकतो.
लक्षणं कोणती?
घाईने लघवी करण्याची भावना होणे किंवा वारंवार लघवी होणे. लघवी करतांना वेदना किंवा आग होणे. ओटीपोटात वेदना किंवा क्रॅम्प्स येणे. गढूळ दिसणारी दुर्गंधीयुक्त लघवी. लघवी करतांना घाईची भावना होणे. लघवीत रक्त किंवा म्युकस असणे. शारीरिक संबंधांच्या वेळी वेदना. झोपेतून लघवी करण्यासाठी उठणे. जास्त किंवा कमी लघवी होणे. मूत्राशयाच्या भागात वेदना, दाब किंवा हुळहुळेपणा. जंतुसंसर्ग किडनी पर्यंत गेला जर पाठदुखी, थंडी वाजून येणं, ताप, उलटीची भावना आणि उलट्या होऊ शकतात. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरकडे गेलं पाहिजे.
निदान व उपचार
लघवीतील जंतुसंसर्ग तपासण्यासाठी लघवीची तपासणी केली जाते. कोणत्या प्रकारचे जंतू आहेत हे शोधण्यासाठी युरीन कल्चर ही तपासणी केली जाऊ शकते. यूटीआय सामान्यपणे अँटिबायोटिक्सने बरे होते. तुम्हाला आणि बाळाला सुरक्षित असणारी औषधं डॉक्टर २ते ७ दिवस घ्यायला सांगतात. सामान्यतः हे संसर्ग मूत्राशय आणि मूत्रमार्गापुरतेच मर्यादित असतात. मात्र त्यावर वेळेवर उपचार केले नाहीत, तर त्याने काही वेळा किडनीला संसर्ग होऊ शकतो. तसं झालं तर अपुऱ्या दिवसांचं आणि कमी वजनाचं बाळ जन्माला येण्याचा धोका असतो.
यूटीआय टाळण्यासाठी काय करायचं?
दिवसाकाठी किमान ८ ग्लास द्रवपदार्थ प्या. लघवीची भावना झाल्या झाल्या लघवी करा व लघवी पूर्ण करा. लघवी केल्यानंतर तो भाग कोरडा करा व स्वच्छ ठेवा. शारीरिक संबंधांच्या आधी आणि नंतर मूत्राशय रिकामं करा. सार्वजनिक शौचालय वापरताना टॉयलेट सीट सॅनिटायझरने निर्जंतुक करून घ्या. पौगंडावस्थेपासून मासिक पाळीची स्वच्छता राखा. मूत्रमार्गात जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी दर सहा तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदला. शारीरिक संबंधांच्या वेळी ल्युब्रिकंटची गरज भासल्यास वॉटर बेस्ड प्रॉडक्ट वापरा. खाज येणारे साबण किंवा सुवासिक पदार्थ टाळा. सुटी अंतर्वस्त्र वापरा आणि ती रोज बदला. टब मध्ये आंघोळ करण्यापेक्षा शॉवर घ्या. फार घट्ट पँट्स घालू नका. तुमच्या आहारातून प्रक्रिया केलेले पदार्थ, फळांचे रस, कॅफेन, मद्य आणि साखर वजा करा. यूटीआय साठी उपचार घेत असतांना शारीरिक संबंध ठेऊ नका.
निष्कर्ष
गरोदरपणाच्या काळात युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स कॉमन असतात. प्रत्येक वेळी यूटीआयची लक्षणं दिसतातच असं नाही. मात्र गरोदरपणात लक्षणं न दिसणाऱ्या युटीआयमुळेही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक गरोदर महिलेची गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात यूटीआयसाठी तपासणी केली गेली पाहिजे. वेळेवर उपचार घेतल्यास आईला किंवा बाळाला त्यापासून कुठलाही धोका उद्भवत नाही.
तज्ज्ञ मार्गदर्शन: डॉ. संपथकुमारी (MD, DGO, FICOG, FC Diab., FIME)