डॉ. अंबिका जोशी याडकीकर
गरोदर असताना आम्ही काय काय आणि किती किती कामे करायचो, किंवा अगदी डिलीव्हरीसाठी दवाखान्यात जातानाही कोणती कोणती कामे करून गेलो होतो, याच्या गोष्टी मागच्या पिढ्यांनी आपल्याला अगदी रंगवून सांगितलेल्या असतात. आपल्या आईच्या पिढीने किंवा आजीच्या पिढीने जी काही कामे त्यांच्या गरोदरपणात केलेली असतात, ती कामे आपण आता गरोदर असताना करण्याचा विचारही करू शकत नाही. आपल्याच वयाच्या असताना आपल्या आई- आजी कसं काय एवढं सगळं करायच्या, असा प्रश्नही आपल्याला पडतो आणि तेव्हाचं गरोदरपण आणि आताचं गरोदरपण यात केवढा मोठा फरक पडलाय हे जाणवतं.
गरोदरपणात प्रत्येक काम करताना आधी स्वत:ची सुरक्षा जपली पाहिजे, हे अगदी १०० टक्के खरं आहे. पण याचा अर्थ आपण गरोदरपणात कामच करू नये, असा नाही. आजकाल बऱ्याच मुलींचा याबाबत गैरसमज होतो. गरोदरपण आणि आजारपण यांच्यामधली रेषा आता फार पुसट होत आहे. त्यामुळे आपण गरोदर आहोत, आजारी नव्हे हे सगळ्यात आधी आपल्या मनाला समजवा. गरोदरपणात फिट राहण्यासाठी व्यायामाच्या स्वरूपात शारिरीक हालचाल होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुळात गरोदरपणात व्यायाम करायचा की नाही करायचा, याच बाबतीत मोठा गोंधळ दिसून येतो. व्यायाम केला तर गर्भपात होऊ शकतो किंवा बाळाला काही होऊ शकतं, अशी भीती अनेकींच्या मनात असते. पण हा गैरसमज मनातून पुर्णपणे काढून टाका. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गर्भारपणात योग्य व्यायाम केला तर त्यामुळे शरीराला निश्चितच फायदा होतो.
गर्भारपणात व्यायाम का करावा ?
१. गरोदर असताना रिलॅक्सिन नावाचा हार्मोन तयार होत असतो. यामुळे आपले सारे शरीर शिथिलतेकडे झुकते आणि येणाऱ्या बाळाच्या तयारीसाठी सज्ज होऊ लागते. त्यामुळे शरीराची लवचिकता कायम राखण्यासाठी गरोदरपणातही व्यायाम करावा.
२. तिसऱ्या महिन्यानंतर बाळ जसेजसे मोठे होते, तसा तसा आपल्या आतड्यांवर ताण येऊ लागतो. त्यामुळे पचन शक्तीशी संबंधित काही त्रास उद्भवू शकतात. पचन व्यवस्थित न झाल्यास आराेग्यविषयक इतर समस्यांना आपसूकच निमंत्रण मिळते. त्यामुळे पचन संस्थेशी संबंधित काही व्यायाम गरोदरपणात केलेच पाहिजे.
३. गर्भारपणात पोटाचा आकार वाढत गेल्यामुळे पोटाचे स्नायू ताणले जातात. यामुळे पाठीचे स्नायू आणि मणक्यावर ताण येऊ लागतो. त्यामुळे पाठ, कंबर आणि मणक्याचा त्रास उद्भवू नये, यासाठी पाठ आणि मणक्याचा व्यायाम करणेही अतिशय आवश्यक आहे.
मानसिक आरोग्यावरही होतो सकारात्मक परिणाम
व्यायाम केल्यामुळे केवळ शरीराचा व्यायाम होतो असे नाही. तर आपल्या मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ लागतो. शरीराचा थकवा आणि मनाची मरगळ दूर होऊ लागते. यामुळे आपसूकच फ्रेश आणि ताजेतवाणे वाटू लागते. बाळाच्या उत्तम वाढीसाठी आईने निरोगी, आनंदी आणि सकारात्मक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
(लेखिका डॉ. अंबिका जोशी याडकीकर औरंगाबाद येथे फिजिओथेरपिस्ट आहेत.)