गरोदरपणात वजन वाढण्याकडे बायकांचं लक्ष असतं. कारण वजन वाढलं म्हणजे पोटातल्या बाळाचं वजन वाढतं असं समजलं जातं. आणि एकदा प्रसूती झाली की आपल्या मूळ अवस्थेत येण्याची बायकांची तीव्र इच्छा असते. पण हे इतकं सोपं नसतं हा अनुभव सामान्य स्त्रीपासून आई झालेल्या सेलिब्रेटीपर्यंत सर्वांना येतो. गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात आणि मानसिक अवस्थेत खूप बदल होतात. या प्रत्येक बदलांचा सामना करत ती स्वत:ची आणि पोटातल्या बाळाची काळजी घेत असते. बाई गरोदर असतांना मोठ्या प्रमाणावर होणार्या हार्मोनल बदलांमुळे तिला शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं. गरोदरणात बाईचं सामान्यत: 5 ते 20 किलो वजन वाढतं. या वाढलेल्या वजनाचं बायकांना जास्त टेन्शन येत नाही. पण प्रसूती झाल्यानंतरही वजन वाढतच राहातं तेव्हा मात्र तो बायकांच्या चिंतेचा विषय ठरतो. स्त्रीच्या शरीरात हार्मोनल बदल हे केवळ गरोदरपणातच घडतात असं नाही तर प्रसूतीनंतरही स्त्रीच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्याचाच परिणाम म्हणजे प्रसूतीनंतरही अनेक महिलांना वजन वाढण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. प्रसूतीनंतर एक ते दीड वर्ष स्तनपान करण्यासाठी पोषक आहारावर जास्त भर दिला जातो हे ही एक प्रसूतीनंतरच्या वजन वाढीचं कारण आहे. पण या वाढत्या वजनाची चिंता करत बसण्यापेक्षा या काळात काही घरगुती उपाय केल्यास, आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
दालचिनी आणि लवंग
दालचिनी आणि लवंग या दोन घटकांचं एकत्र सेवन प्रसूतीनंतर पोटावरची चरबी आणि वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतं. दालचिनीचे तीन तुकडे आणि दोन ते तीन लवंगा दोन ग्लास पाण्यात उकळून घ्याव्यात. जेव्हा पाणी एक ग्लास होईल तेव्ह ते गाळून घ्यावं. थोडं ते गार होवू द्यावं. हे पाणी कोमट असतांनाच प्यावं. हा उपाय एक महिना रोज केल्यास प्रसूतीनंतर पोटावरची चरबी कमी होते.
छायाचित्र- गुगल
बदाम आणि मनुके
प्रसूतीनंतर पोटावरची चरबी कमी होण्याऐवजी वाढतच असेल तर त्यासाठी बदाम आणि मनुके यांचाही उपयोग होतो. जर प्रसूती नॉर्मल झालेली असेल तर हा उपाय करावा असं तज्ज्ञ सांगतात. नॉर्मल प्रसूतीनंतर वजन वाढू नये म्हणून बीया असलेले 10 मनुके घ्यावेत. त्यातल्या बिया काढून टाकाव्यात. या मनुक्यांमधे 10 बदाम टाकून ते वाटून घ्यावं. हे मिश्रण रोज तयार करुन ते एक ग्लास गरम दुधासोबत घ्यावं. यामुळे प्रसूतीनंतर आलेला थकवाही कमी होतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
दूध आणि जायफळ
वजन वाढण्याच्या समस्येत दुधात जायफळ टाकून पिल्यास त्याचाही वजन कमी होण्यास फायदा होतो. जायफळामुळे वजन कमी होण्यासोबतच पोटावरची जास्तीची चरबीही कमी होते. एक जायफळची पावडर करुन ती एक ग्लास दुधातून घ्यावी. हे दूध रोज रात्री झोपण्याआधी घ्यावं. या उपायानेही वजन कमी होतं.
छायाचित्र- गुगल
ओव्याचं पाणी
प्रसूतीनंतर वाढणारं वजन कमी करण्यासाठी ओव्याचं पाणी खूप फायदेशीर असतं. एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा घालून ते पाणी उकळावं. उकळल्यानंतर ते पाणी गाळून घ्यावं. हे पाणी रोज पिल्यास पोटावरची चरबी कमी होते. हे सर्व उपाय प्रसूतीनंतर वजन कमी करण्यास, पोटावरची चरबी घालवण्यास उपयोगी आहेत. वर्षानुवर्ष हे उपाय केले जातात. पण तरीही आपण हे उपाय स्वत:साठे करतो तेव्हा एकदा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.