गर्भवती स्त्रियांनी गर्भारपणाच्या काळात नोकरी किंवा व्यवसाय करणे हे आता काही फार अवघड राहिलेले नाही. पण समाज त्यांना या काळात कसे स्वीकारतो हा प्रश्न अनेकदा समोर येतो. नवीन लग्न झालेल्या महिलांना नोकरीवर न घेणे, लहान मूल असणाऱ्या महिलेला नोकरीवर घेताना विचार करणे अशा गोष्टी आपल्याकडे आजही दिसून येतात. मात्र मूल होणे ही स्त्री साठी आणि एकूणच तिच्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असून ती महिलांच्या करिअरमध्ये आड येता कामा नये.
तब्येत चांगली असेल तर नवव्या महिन्यापर्यंत काम करणाऱ्या महिला आपल्या आजुबाजूला आपण नेहमी पाहतो. मग ते बसून करायचे काम असो किंवा अगदी नर्स म्हणून रुग्णांची सेवा करणे असो. सगळ्यात क्षेत्रातील स्त्रिया स्वत:ला खंबीर ठेवत आपले कर्तव्य बजावत राहतात. अभिनय क्षेत्रातही छोट्या पडद्यावरील आणि मोठ्या पडद्यावरील अभिनेत्रींना वैयक्तिक आयुष्य असतेच. त्यामुळे लग्न, मूल होणे हे टप्पे त्यांच्याही आयुष्यात येतात. या सगळ्या टप्प्यांवर आपल्याला आलेले अनुभव नुकतेच प्रसिद्ध कॉमेडिअन भारती सिंह आणि चित्रपट निर्माती फराह खान यांनी सांगितले.
भारती काही दिवसांतच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. नुकतेच तिने मॅटर्निटी शूटचे फोटोही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले होते. गर्भवती असतानाही भारती रिअॅलिटी शोचे अंकरींग करत होती. यावेळी तिने आपल्याला सेटवर येणाऱ्या अनुभवांविषयी खुलेपणाने सांगितले. ती म्हणते, “अवघडलेपण हे आपल्या शरीरात नसतंच मुळी ते आपल्या डोक्यात असतं. लोक त्यांच्या वागण्याबोलण्यातून ते आपल्याला दाखवून देतात. आपल्याला सेटवर असं बस, तसं कर, तू ठिक आहेस का असं सतत विचारलं जायचं. यामुळे आपण कोणीतरी वेगळे आहोत याची जाणीव कारण नसताना करुन दिली जाते.” भारती ही भारतातील पहिली प्रेग्नंट होस्ट असल्याचा तिला अभिमान वाटतो.
तर गर्भधारणेमध्ये काम करताना आलेल्या आपल्या अनुभवांबाबत फराहही अतिशय मोकळेपणाने बोलते. २००८ मध्ये फराहने तिळ्यांना जन्म दिला. आपण कामात असलो की आपण जास्त अॅक्टीव्ह आणि सकारात्मक असतो असे मी मानत असल्याने मी शेवटपर्यंत सेटवर काम करत होते. या अनुभवाबद्दल ती म्हणते, मला सेटवर सतत सगळे सूचना द्यायचे “इथे वायर आहे, तिथे पायरी आहे. तेव्हा तिथे वायर आहे, पायरी आहे हे मला दिसतंय मी प्रेग्नंट आहे, आंधळी नाही.”