Lokmat Sakhi >Health >Pregnancy > झाला HIV चा लोप, संपला संसर्गाचा कोप, गरोदरमातांपासून बाळांना होणारा संसर्ग कसा कमी झाला?

झाला HIV चा लोप, संपला संसर्गाचा कोप, गरोदरमातांपासून बाळांना होणारा संसर्ग कसा कमी झाला?

तीस पस्तीस वर्षांपूर्वी, एचआयव्ही बाधित जोडपे जर म्हणाले की, आम्हाला मूल हवंय, तर अंगावर काटा यायचा, पण मग हे कोडं कसं सुटलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 01:37 PM2021-04-13T13:37:53+5:302021-04-15T12:56:54+5:30

तीस पस्तीस वर्षांपूर्वी, एचआयव्ही बाधित जोडपे जर म्हणाले की, आम्हाला मूल हवंय, तर अंगावर काटा यायचा, पण मग हे कोडं कसं सुटलं?

HIV AIDS Undetectable, Untransmissible pregnancy & becoming a parent, story of a journey narikaa | झाला HIV चा लोप, संपला संसर्गाचा कोप, गरोदरमातांपासून बाळांना होणारा संसर्ग कसा कमी झाला?

झाला HIV चा लोप, संपला संसर्गाचा कोप, गरोदरमातांपासून बाळांना होणारा संसर्ग कसा कमी झाला?

Highlightsएचआयव्ही संसर्ग आणि आईबाबा होण्याची गोष्ट

- डॉ. शंतनु अभ्यंकर

ऐंशीच्या दशकात एचआयव्ही एखाद्या झंझावातासारखा भारतीय समाजव्यवस्थेवर कोसळला. आपण सोवळा समजत असलेला भारतीय समाज किती ओवळा आहे, हे लख्ख दिसून आलं. एचआयव्ही बाधितांना वाळीत टाकण्यापासून सुरुवात झाली. पदोपदी भेदभावाची वागणूक, लागट बोलणं, घृणा, निगरगट्ट आरोग्य व्यवस्थेकडून दुर्लक्ष, आरोग्याची हेळसांड अशा अनेक आघाड्यांवर रुग्णांना लढावं लागायचं. लैंगिक संबंधातून पसरणारा रोग म्हटल्यावर, त्यावर नीती-अनीतीची, पूर्व सुकृताची, पापपुण्याची पुटं चढायला कितीसा वेळ, तशी ती चढलीच. त्यातून अशा एखादीला दिवस गेले, तर वेगळीच प्रश्नचिन्हं ‘आ’ वासून उभी राहायची. बाळाला वारेतून, जनन-मार्गातून आणि दुधातूनही एचआयव्ही होण्याची शक्यता हा पहिला प्रश्न. तसं झालं, तर त्याच्या आजाराचे, उपचाराचे प्रश्न आणि पुढे ते जगले वाचले, तर अल्पायुषी पालकांमुळे त्याच्या भविष्याचे प्रश्न! या मुलांच्या अशा अवस्थेचे पापाचे माप कुणाच्या पदरात टाकणार? जन्मतः एचआयव्हीची लागण झालेली तान्ही बाळं म्हणजे एचआयव्हीचे सर्वात निरागस बळी.
आईकडून बाळाला लागण होते हे खरं, पण हे अर्धसत्य. आईला आजार असल्याशिवाय बाळाला तो होईलच कसा? प्रश्न रास्त आहे, पण तरीही ‘आईकडून बाळाला’ म्हणताना, आईविरुद्ध एक सूक्ष्म अढी दर्शविली जाते. आई गुन्हेगार आहे आणि बाप नाही, असं काहीतरी वाटू शकतं. मुळात आईला एचआयव्हीची लागण बहुदा बापाकडूनच झालेली असते. पण कुणाला ‘गुन्हेगार’ ठरवण्याचा अधिकार आरोग्य व्यवस्थेला नाही. हे सगळं लक्षात घेऊन ‘आईकडून बाळाला लागण’ हा शब्द समूह बदलला गेला. ‘पालकांकडून बालकाला लागण’ असा अधिक निर्विष, अधिक समन्यायी शब्दप्रयोग आता वापरला जातो.
जागतिक आरोग्य संघटना सांगते की, मुळात होऊ घातलेल्या पालकांनी एचआयव्हीच टाळला किंवा त्यांनी अवांच्छित गर्भधारणा टाळली, तरी बराच प्रश्न सुटायला मदत होते आणि नियमित औषधांनी उरलेला प्रश्न मार्गी लागतो.
पण हे आता...


काहीही औषध नव्हतं, तेव्हा जवळजवळ ४० टक्के बाळांना एचआयव्हीचा जन्मदत्त वारसा मिळायचा, असे जगभरची आकडेवारी सांगते. आपल्याकडे हे प्रमाण २५ टक्क्यांच्या आसपास होतं. औषधच नव्हतं. समाजात एचआयव्हीबद्दल प्रचंड तिरस्कार होता. अशी मुलं अत्यंत केविलवाण्या अवस्थेत जगायची. बरीचशी काही वर्षांतच मरायची. जी जगायची, त्यांचेही बरेचदा हाल व्हायचे. मुलं एचआयव्ही आणि तत्संबंधित आजारांनी ग्रासलेली असायची. त्यांच्याकडे बघणार कोण, परिस्थिती विलक्षण कठीण. मुळात अनाथपण वाईटच. त्यात ‘एचआयव्ही अनाथपणा’ आणखी वाईट. हा प्रश्न इतका जगड्व्याळ बनला की, खास ‘एचआयव्ही अनाथाश्रम’ही निघाले होते आणि आनंदाची गोष्ट अशी की, ते आता जवळपास निमाले आहेत!

पण हे आता...

तीस पस्तीस वर्षांपूर्वी, कोणी एचआयव्ही बाधित जोडपे आम्हाला मूल हवंय वगैरे चर्चा करू लागले की, अंगावर काटा यायचा. शरीरसंबंध ठेवताना निरोध वापरा, असा सज्जड सल्ला दिलेला असायचा. कारण कोणी एक जण एचआयव्ही बाधित असेल, तर जोडीदार बाधित होईल. अगदी दोघेही बाधित असले, तरी एचआयव्हीचे नवे-नवे स्ट्रेन्स दोघांतही निर्माण होत असतात आणि हे परस्परांना नवखे स्ट्रेन्स, परस्परांना बाधक ठरू शकतात. ‘नवे स्ट्रेन्स नवे गुणधर्म’ हे आता कोरोनामुळे सगळ्यांना माहीत आहे.


आता या ‘असल्या’ जोडप्याला मूल कसं व्हावं बरं? बिन-निरोध संबंध ठेवले, तर मूल होईलही, पण एचआयव्ही इकडून तिकडे जाईल त्याचं काय? यावर उपाय म्हणून अनेक प्रकारच्या युक्त्या योजल्या जायच्या. फक्त फलनकाल बघून त्या काळांत बिन-निरोध संबंध ठेवणे. एरवी निरोध वापरणे. वीर्यावर प्रक्रिया करून ते थेट गर्भपिशवीत सोडणे (आययूआय). काही जोडपी तर वीर्यदानाचा (बिन बाधित व्यक्तीचे वीर्य वापरणं) पर्यायही स्वीकारायची, पण एचआयव्हीवर औषध निघाली आणि हे सर्व प्रकार निकालात निघाले. आज औषधांमुळे एचआयव्ही बाधित, पण उपचाराधीन पेशंटना निरोध वापरायचीही गरज नाही, पण अजूनही डॉक्टर मंडळी, ‘निरोध वापरा’ असा सल्ला देतात. बहुतेक लाजेकाजेस्तव असावा! औषधं घ्या, विषाणूमुक्त व्हा, औषधं चालूच ठेवा आणि मग दिवस जाऊ देत, बाळ होऊ देत, पण पुढेही आयुष्यभर औषधं चालूच ठेवा, अशी आधुनिक मसलत आहे.
पण हे आता...
आता औषधे इतकी प्रभावी आहेत की, ती झटक्यात पेशंटमधील एचआयव्ही विषाणूंची संख्याच कमी करतात. मग अर्थातच आडातच नसेल, तर पोहऱ्यात कोठून येणार या न्यायानं, जोडीदाराला/बाळाला लागण होण्याची शक्यता जवळपास मावळते. विषाणूंची संख्या तपासणीत सापडणार नाही इतकी रोडावते, मग संसर्ग कुठून होणार? ‘झाला विषाणूचा लोप, संपला संसर्गाचा कोप (Undetectable=Untransmissible) हा या लढाईतील नवा एल्गार आहे, पण हे आता. पूर्वी औषधं नव्हती. तेव्हाची आव्हानं वेगळीच होती. त्या आणि नव्या आव्हानांबद्दल पुढील लेखी..

(पूर्वार्ध)
(लेखक स्त्री आरोग्य तज्ज्ञ आहेत.)

shantanusabhyankar@hotmail.com

Web Title: HIV AIDS Undetectable, Untransmissible pregnancy & becoming a parent, story of a journey narikaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.