Join us   

स्तनपान करणाऱ्या आईला बाळाचे बाबा काय मदत करु शकतात? बाळासाठी बाबाने काय करायला हवे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2024 7:18 PM

स्तनपान हे आईचंच काम, पण आईला ते करणं सोपं जावं म्हणून बाबानेही काही गोष्टी करायला हव्या. (Fathers in Promoting Exclusive Breastfeeding)

ठळक मुद्दे “स्तनपान संरक्षक बाबा” होण्यासाठी शुभेच्छा!

डॉ प्रिया प्रभू (देशपांडे), रोगप्रतिबंधक व साथरोग तज्ज्ञ

स्तनपान म्हटले की डोळ्यासमोर आई आणि बाळ येते, बाबाचा संबंधच काय? बाळाचे बाबा प्रत्यक्ष स्तनपानाचे कार्य करत नसले तरी स्तनपान यशस्वी होण्यासाठी बाळाचे बाबा खूप महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. तुम्ही बाळाचे बाबा असाल आणि आपल्या बाळाला जास्तीत जास्त कालावधीसाठी स्तनपान मिळावे असे तुम्हाला वाटत असेल तर याबाबत तुम्ही कोणकोणत्या प्रकारे बाळाला आणि आईला मदत करु शकता, ते पाहूया. बाळाला स्तनपान देणे हे एक खूप मोठे काम असते आणि याची जाणीव जेव्हा आईच्या कुटुंबीयांना आणि विशेषतः तिच्या पार्टनरला असते तेव्हा तिला होणाऱ्या कष्टांचा त्रास कमी होतो.  स्तनपानाच्या प्रवासात बाळाच्या जन्मापूर्वीपासून बाबांची सोबत महत्त्वाची ठरू शकते. 

बाबा काय काय करु शकतात?

१. स्तनपानाविषयी संपूर्ण माहिती घ्या.

स्तनपान हे एक कौशल्य आहे आणि हे आईला आणि बाळाला शिकावे लागते. अशावेळी आईसोबत तुम्ही देखील स्तनपानाबाबत संपूर्ण माहिती घेतली तर आईला हे कौशल्य शिकताना अडचणी सोडवणे सोपे जाईल. त्याचप्रमाणे स्तनातून दूध काढणे, पंप वापरणे, पंप स्वच्छ करणे, पंप निर्जंतुक करणे, काढलेले दूध साठवणे अशा स्तनपानसंबंधी इतर कृतींबाबतही माहिती घेऊ शकता. म्हणजे जर वेळ आली तर ही कामे तुम्ही करून आईला थोडीशी विश्रांती मिळू शकते. २. इतरांच्या नकारात्मक सल्ल्याविरुद्ध आईला आधार द्या. स्तनपानाच्या प्रवासामध्ये आईला विविध टप्प्यावर विविध लोकांकडून बऱ्याच नकारात्मक टिप्पणीला व टीकेला तसेच सल्ल्याला सामोरे जावे लागते आणि यामुळे तिचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. तिचा आत्मविश्वास कमी होऊ नये यासाठी जेव्हा असे नकारात्मक सल्ले मिळतील त्यावेळेला आईला तुमचा सपोर्ट मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे तिच्यासाठी तुम्ही चीअर लीडर होऊ शकता. ३. बाळाच्या इतर कामांची जबाबदारी घ्या बाळाला हाताळण्याबाबत भीती न बाळगता स्तनपानाव्यतिरिक्त बाळाची काळजी तुम्ही घेऊ शकता म्हणजे आईला अधिक विश्रांती मिळू शकेल. जसे बाळाचे डायपर बदलणे, स्तनपाननंतर बाळाची ढेकर काढणे, बाळाला झोपवणे, रात्री रडणाऱ्या बाळाला सांभाळणे, बाळाला त्रास होत असल्यास बाळाला ‘टमी टाईम’ देणे इ.

४. आई विश्रांती घेत असताना बाळाला सांभाळा आई विश्रांती घेत असेल तेव्हा बाळाला खेळवणे, गरज असल्यास बाळाला ‘अनावृत्त स्पर्श’ म्हणजे ‘स्किन टू स्किन’ देणे, बाळाला बाहेर फिरवून आणणे इ . अशा प्रकारची कामे करता येतात. आई पंप करत असेल तर काढलेले दूध बाळाला देण्याची जबाबदारी बाबा घेऊ शकता. ५. आई बाळाला पाजत असताना तिला आवश्यक ते सहकार्य करा आई बाळाला पाजत असताना तिला विविध गोष्टींची गरज लागू शकते. जसे तिला तहान लागल्यास पाणी, भूक लागल्यास काहीतरी खाण्यास देणे. बाळाला व्यवस्थित धरता यावे यासाठी उश्या देणे, तिच्या पाठीला उशांचा आधार देणे, तिला मोबाईल किंवा टीव्हीचा रिमोट जवळ हवा असेल तर तो देणे इ . जेणेकरून आई विना अडथळा बाळाला पाजू शकेल.

६. स्तनपानासाठी पोषक वातावरण  स्तनपान योग्य रीतीने व्हावे यासाठी कुटुंबातील इतरांचे सहकार्य मिळवणे, सुरुवातीच्या काळात भेटण्यासाठी खूप सारे पाहुणे येणार नाहीत याची काळजी घेणे किंवा घराबाहेर असताना बाळ रडत असेल आणि आईला पाजायचे असेल तर त्याबाबत आवश्यक सहकार्य करणे अशा बाबी करून तुम्ही स्तनपान संरक्षक होऊ शकता. ७. अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार स्तनपानाचा प्रवास हा खूप मोठा असतो आणि त्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या अडचणी जाणवू शकतात. अशावेळी या अडचणी सोडवण्याबाबत अधिक माहिती मिळवणे व आवश्यकता असल्यास स्तनपान तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवणे या बाबी तुम्ही करू शकता.

८. आईच्या मानसिक तणावात मदत बाळाच्या जन्मानंतर आई खूप साऱ्या तणावामध्ये असल्यामुळे बऱ्याचदा ती भावनिक दृष्ट्या नाजूक झालेली असते. कधी कधी तिची चिडचिड वगैरे होत असेल किंवा तिला काही अडचणी असतील तर याबाबत तिला तुमच्याशी बोलता येईल अशा संधी निर्माण करा व तुम्ही तिला समजून घ्या. ९. घरातील इतर कामांची जबाबदारी घ्या. घरातील इतर कामे करण्यामध्ये तुमचा वाटा असू दे. तसेच आई वेळेवर व व्यवस्थित खात आहे व पुरेसे पाणी पीत आहे यावरही लक्ष असू द्या. १०. इतर बाबांशी नेटवर्किंग करा स्तनपान विषयी माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी, शंका विचारण्यासाठी किंवा सपोर्ट मिळवण्यासाठी तुमच्यासारख्याच इतर बाबांसोबत नेटवर्किंग करा. बाळाचा बाबा होणे ही एक मोठी जबाबदारी आहे. मिळेल तेवढी मदत कमीच वाटत असते. “स्तनपान संरक्षक बाबा” होण्यासाठी शुभेच्छा!

(MBBS, MD (Preventive and Social Medicine) , IYCN (BPNI) सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज , जि - सांगली. drprdeshpande2@gmail.com https://askdrpriya.in/

टॅग्स : जागतिक स्तनपानआरोग्यप्रेग्नंसीपरिवारलहान मुलं