प्रेग्नन्सीच्या काळात एका स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक आणि मानसिक खूप मोठे बदल होत असतात. या दरम्यान स्त्रीच्या पोटाचा आकार वाढतो तसेच गर्भाशयाचा आकारही बाळाच्या वाढीबरोबर वाढतो, त्यामुळे पोटाची त्वचा ताणू लागते. प्रेग्नन्सीच्या काळात तर स्त्रियांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतोच त्याचबरोबर प्रेग्नन्सीनंतरही लहान - मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रेग्नन्सी नंतर पोटावरील स्किन काळी पडणे ही त्यांपैकीच एक मोठी व सगळ्या स्त्रियांना सतावणारी अशी एक समस्या आहे.
प्रेग्नंन्सीनंतर स्त्रियांच्या पोटावर स्ट्रेचमार्क्स दिसू लागतात, तसेच पोटाच्या भागावरील स्किन काळी पडणे अशा बारीक - सारीक समस्यांना समजून त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. पोटाची काळी पडलेली स्किन, पोटावरील स्ट्रेच मार्क्स या सगळ्यांमुळे काही महिलांना साडी किंवा शॉर्ट कपडे परिधान करता येत नाहीत. खरंतर प्रेग्नंन्सी नंतर हे पोटावरील काळे डाग ३ ते ४ महिने टिकत असले तरीही त्यांची योग्य ती काळजी घेतल्यास ते लवकर निघून जातात. जर आपल्यापैकी कोणाला या समस्येचा सामना करावा लागत असल्यास झटपट सोप्या घरगुती उपायांचा वापर करून प्रेग्नंन्सी नंतर पोटावरील स्किनचा काळेपणा दूर करु शकता(How Do Get Rid Of Dark Belly After Giving Birth).
प्रेग्नन्सीनंतर पोटावर आलेला काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत ?
१. बटाट्याचा रस :- प्रसूतीनंतर पोटावर आलेला काळेपणा दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसाचा उपाय खूप प्रभावी ठरु शकतो. पोटावरील काळे चट्टे घालविण्यासाठी किमान ३ ते ४ आठवडे लागतात. हा उपाय करण्यासाठी, एक कच्चा बटाटा घ्या आणि त्याचे दोन भाग करा. आता बटाट्याचा एक - एक भाग काळ्या पडलेल्या भागावर काही मिनिटे हलकेच घासून घ्या. अंघोळ करण्यापूर्वी हा उपाय केल्यास आपल्याला काही दिवसांतच फरक दिसेल. हा उपाय तुम्ही आठवड्यातून ३ ते ४ वेळा करू शकता. याशिवाय आपण कच्च्या बटाट्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून मग तो किस गाळणीमध्ये गाळून घ्यावा. हा बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याने पोटावरील काळ्या पडलेल्या स्किनवर लावून घ्यावा. १५ ते २० मिनिटे रस तसाच ठेवून संपूर्णपणे सुकू द्यावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्किन धुवून घ्यावी.
२. एलोवेरा जेलने मसाज करा :- एलोवेरा जेल स्किनला होणारी जळजळ आणि जखमा बरे करण्यास मदत करू शकते. एलोवेरा जेलमध्ये थोडे दूध आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवा. या तयार झालेल्या पेस्टने पोटाच्या काळ्या पडलेल्या भागाची अलगद हाताने मालिश सुरु करा. असे आठवड्यातून दोनदा केल्याने प्रेग्नन्सीनंतर पोटावर आलेला काळेपणा नाहीसा करण्यास मदत होते. जर आपल्या घरात कोरफडीचे रोपटे नसेल तर आपण बाजारांत रेडिमेड विकत मिळणाऱ्या एलोवेरा जेलचा देखील वापर करु शकतो. एलोवेरा जेलने मसाज केल्याने पोटाच्या स्किनमध्ये आर्द्रता तर जपली जातेच त्यासोबतच स्किनचा काळेपणा देखील दूर होण्यास मदत मिळते.
प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?
३. चंदन पावडरचा वापर करावा :- चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी चंदनाचा वापर वर्षानुवर्षे केला जातो. पण याच्या वापराने प्रेग्नन्सीनंतर पोटावर दिसणारे काळे डागही दूर होण्यास मदत होते. यासाठी चंदन पावडरमध्ये चिमूटभर आंबे हळद आणि थोडे दूध मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट पोटाच्या काळ्या पडलेल्या भागांवर लावा. मिश्रण कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा. हा उपाय नियमित केल्याने पोटावरील काळे डाग लगेच निघून जाण्यास उपयुक्त ठरते.
४. टोमॅटोचा वापर करा :- प्रेग्नन्सीनंतर पोटावर आलेला काळेपणा दूर करण्यासाठी टोमॅटोचा खूप उपयोग होतो. प्रेग्नंन्सीनंतर पोटावरील काळेपणामुळे त्रासलेल्या महिलांसाठी टोमॅटो हा सर्वात स्वस्त घरगुती उपाय आहे. टोमॅटो एक उत्तम नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. अँटिऑक्सिडंटने युक्त टोमॅटो काळ्या पडलेल्या स्किनची समस्या दूर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यासाठी टोमॅटो कापून पोटाच्या काळ्या भागावर काही मिनिटे चोळा. टोमॅटोच्या वापराने स्किनला नवजीवन देण्यासोबतच काही दिवसात पोटावरील काळेपणाही दूर होईल.