Join us   

मासिक पाळीनंतर ४ दिवसांनी शरीर संबंध झाल्यास गर्भधारणा होते, हे खरं की खोटं? डॉक्टर सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 1:07 PM

How To Calculate Ovulation Days After Menstrual Cycle Pregnancy : मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रंजना धानू सांगतात, गर्भधारणा आणि पाळीच्या दिवसांचं गणित..

लग्न झाल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणे ही जोडीदारांपैकी दोघांसाठी मानसिक, शारीरिक आणि भावनिक सुख देणारी गोष्ट असते. सततचे ताणतणाव, शारीरिक तक्रारी आणि इतर काही गोष्टींमुळे या संबंधांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र हे संबंध चांगले असतील तर आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही सुदृढ राहण्यास मदत होते. लग्न झाल्यावर शारीरिक संबंध ठेवताना ते सुरक्षित असतील याची काळजी बहुतांश जणांकडून घेतली जाते. पण काही वेळा मात्र ही काळजी घेतली गेली नाही तर गर्भधारणा राहण्याची शक्यता असते. पाळीनंतर ४ दिवसांनी शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते असा समज बऱ्याच जणांमध्ये असतो. यात काही तथ्य आहे का, की हा गैरसमज आहे (How To Calculate Ovulation Days After Menstrual Cycle Pregnancy) ?

सध्या करिअर, आर्थिक जुळवादुळव आणि इतरही काही कारणांनी गर्भधारणा लांबवण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा महिलांच्या आरोग्यावर आणि एकूण सामाजिक जीवनावरही बराच परीणाम होतो. हे जरी खरे असले तरी गर्भधारणा राहण्यासाठी सगळ्यात योग्य दिवस कोणते, गर्भधारणेबाबतचे नियोजन करताना काय लक्षात घ्यायला हवे याबाबत जोडप्यांना माहिती असतेच असे नाही. त्यामुळेच मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रंजना धानू याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देतात. त्या काय सांगतात ते समजून घेऊया.

(Image : Google)

१. गर्भाशयात अंड सुटण्याचा काळ म्हणजेच ओव्ह्युलेशनचा काळ हा १४ व्या दिवशी असतो. त्यामुळे त्याच्या आधी आणि नंतर साधारण ३ ते ४ दिवस शारीरिक संबंध आल्यास गर्भधारणा होऊ शकते. 

२. म्हणजेच पाळी संपल्यानंतर ११ तो १७ या दिवसांमध्पये गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. मात्र ९-१० आणि १८ व्या दिवशीही ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे पहिल्या १० दिवसांत किंवा १८ व्या दिवसानंतर गर्भधारणा होत नाही असे नाही. तर त्या काळातही गर्भधारणा होऊ शकते, मात्र त्याचे प्रमाण कमी असते. 

३. त्यामुळे गर्भधारणा होऊ नये असे वाटत असेल तर कंडोम, कॉपर टी किंवा गर्भनिरोधक गोळ्या यांसारखी गर्भनिरोधके वापरायला हवीत. अन्यथा नंतर होणारा त्रास हा वेदनादायी आणि खर्चिक असू शकतो. 

४. प्रत्येक गर्भधारणा ही नियोजितच असायला हवी, ती अपघाताने झालेली असू नये असे मतही डॉ. धानू यांनी व्यक्त केले. त्यामुळे जोडप्यांनी शारीरिक संबंध ठेवताना वरील गोष्टींचे भान ठेवायला हवे. 

 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सप्रेग्नंसीमासिक पाळी आणि आरोग्य