How to make coriander seeds ladu: बाळंतपणात डिंकाचे लाडू, आळिवाचे लाडू करण्याची पध्दत आहे. बाळंतपणात शरीराची झालेली झीज भरुन काढण्यासाठी , ताकद येण्यासाठी धण्याचे लाडू लाडू महत्त्वाचे असतात. तसेच गरोदरपणात धण्याचे लाडू खाण्याला महत्त्व आहे. गरोदर स्त्री आणि पोटातल्या बाळासाठी हे लाडू उपयुक्त असल्याचं आहार तज्ज्ञ सांगतात.
Image: Google
धण्याचे लाडू करताना यात धण्यांसोबतच खोबरं, साजूक तूप, सुकामेवा यांचा वापर केला जातो. लाडूतील खोबऱ्याच्या समावेशामुळे गरोदरपणात पोटाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले पचनास उपयुक्त फायबर मिळतात. धण्याच्या लाडूतून फायबरसोबतच सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम ही खनिजं मिळतात. धण्याचे लाडू खाल्ल्याने बाळंतपणात ॲनेमियाचा धोका टळतो. तसेच गरोदरअवस्थेत सकाळी होणाऱ्या उलट्या, मळमळ, पायांवरची सूज घालवण्यासाठी उपकारक गुणधर्म धण्याच्या लाडूत असतात. धण्याच्या लाडुंमध्ये साजूक तुपाचा वापर केल्यानं हे लाडू पचनास सुलभ जातात.
Image: Google
कसे करावेत धन्याचे लाडू?
धण्याचे लाडू करण्यासाठी 1 कप धणे, पाऊण कप साजूक तूप, 1 कप कणिक, पाऊण कप पिठीसाखर, अर्धा कप बदामाची पूड, अर्धा कप काजूची पूड किंवा बारीक केलेले काजू ही सामग्री लागते.
धण्याचे लाडू करण्यासाठी 1 कप धणे घ्यावेत. ते स्वच्छ निवडावेत. कढई गॅसवर ठेवून गरम करावी. मंद आचेवर धणे भाजावेत. वास सुटेपर्यंत धणे भाजावेत. धणे थंड होवू द्यावेत. धणे थंडं होईपर्यंत कढईत पाऊण कप साजूक तूप घालून ते गरम करावं. तुपात 1 कप कणिक खमंग भाजावी. कणिक भाजताना गॅस मंद असावा.
Image: Google
कणिक भाजली गेल्यावर ती थंडं होवू द्यावी. गार झालेले धणे मिक्सरमधून बारीक वाटावेत. भाजलेली कणिक कोमट झाल्यावर त्यात धणे पावडर आणि पाव किलो किसलेलं खोबरं घालावं. खोबरं थोडं भाजून घेऊन मग घालावं. पाव कप मिक्सरमधून बारीक केलेले बदाम घालावेत. थोडे काजू बारीक करुन घालावेत. सर्व नीट मिसळून घ्यावं. या सर्व मिश्रणासाठी पाऊण कप पिठी साखर घालून मिश्रण पुन्हा चांगलं मिसळून घ्यावं.
मिश्रणात पाव कप साजूक तूप वितळून मग मिश्रणात घालावं. मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळावेत. गरोदर स्त्रीने दिवसातून 1 किंवा 2 लाडू खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात.