लग्न करणं, त्यानंतर बाळ होणं हे अनेकांना आता काही प्रमाणात टिपिकल वाटते. असे असले तरी या नव्या जबाबदाऱ्या, नवी नाती आपल्याला घडवणारी आणि पूर्णत्वास नेणारी असतात याचा अनुभव घेतल्याशिवाय सजमत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे उशीरा होणारी लग्न, त्यानंतर बाळंतपण लांबवणे आणि इतरही आरोग्याच्या विविध तक्रारी यांमुळे बाळ होण्याची प्रक्रिया आता काहीशी उशीराने होत असल्याचे दिसते. अनेकदा मूल राहण्यात अडचणी आल्यानंतर मानसिक तणाव, सामाजिक तणाव आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम यांसारख्या समस्या सध्या अनेक तरुणींसमोर आहेत. लग्नानंतर काही काळात मूल झाले नाही की आजही आपल्याकडे असं का याबाबत दबक्या आवाजात विचारणा केली जाते. यामागे अनेक कारणे असतील तरी जोडीदारांपैकी दोघांसाठी हे सगळे काहीसे अवघड असते. सामान्य तरुणींप्रमाणेच अभिनेत्रीही या सगळ्याला अपवाद नाहीत.
प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव हिने मूल होण्याबाबतचे तिचे अनुभव नुकतेच शेअर केले. यामध्ये तिने या संपूर्ण ४ वर्षांच्या प्रवासात दिलेला लढा सांगितला आहे. २०१४ मध्ये अमृताने आरजे अनमोल याच्याशी गुपचूप लग्न केले. त्यानंतर थेट २०२२ मध्ये अमृताने आपला पतीसोबतचा पहिला फोटो शेअर केला होता. या दोघांना २०२० मध्ये मुलगा झाला. त्याचे नाव वीर असून या गर्भधारणेसाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्याचे तिने ‘कपल ऑफ थिंग्स’ या यु्टयूबवरील शोमध्ये सांगितले. खरंतर हे दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारसे बोलत नाहीत. मात्र मूल होण्यासाठी आपण बऱ्याच ट्रिटमेंट घेतल्याचे अमृताने यावेळी मोकळेपणाने सांगितले.
अमृता म्हणते, “मूल होण्यासाठी आम्ही ३ वर्षे डॉक्टरांकडे चकरा घालत होतो. सगळ्यात आधी आम्ही आययूआय ट्रीटमेंट घेतली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर आम्ही २ वेळा आयव्हीएफही ट्राय केले, पण त्यातूनही कोणते परिणाम दिसले नाहीत. मग आम्ही आयव्हीएफ न करण्याचे ठरवले. मग आम्ही काही काळ आयुर्वेदीक ट्रीटमेंटही घेतली. पण ती मला सूट न झाल्याने तीही सोडून दिली. यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सरोगसीचा पर्याय सुचवला. हो, नाही करत आम्ही सरोगसीसाठी तयारही झालो. सरोगेट मदरच्या पोटात वाढत असलेल्या आमच्या बाळाच्या हृदयाचे ठोकेही आम्ही ऐकले होते. मात्र एक दिवस अचानक हे मूल वाढू शकत नसल्याचे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आणि त्यानंतर अनमोल पूर्णपणे हताश झाला होता.”
या सगळ्या गोष्टींनंतर काही काळ आम्ही मूल होणे या गोष्टीवर विचार करणे सोडून दिले होते. आम्ही दोघे थायलंडला फिरायला गेलो होतो. तिथून आल्यावर एकाएकी अमृताला ती प्रेग्नंट असल्याचे समजले आणि २०१६ ते २०२० या ४ वर्षे मूलासाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांना अखेर यश आल्याने या दोघांच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला. अमृताचे रुग्णालयाबाहेर प्रेग्नंट असतानाचे काही फोटो मिडियासमोर आल्याने ही बातमी सगळीकडे पसरली. त्यानंतर १ वर्षाने अमृता आणि अनमोल यांना मुलगा झाला. त्यामुळे हा सगळा प्रवास अजिबात सोपा नव्हता असे अमृता सांगते.