गरोदर असताना ॲक्टिव्ह राहावं असं काजल अग्रवाल म्हणते. त्यासाठीच रोज व्यायाम करणं महत्त्वाचं. हे काजल फक्त सांगते असं नाही तर प्रत्यक्षात अमलातही आणते. ती रोज पिलाटे आणि बॅरे हे दोन व्यायाम प्रकार करते. रोजचा व्यायाम हा गरोदरपणात आणि बाळांतपणातल्या आईच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो असं सांगणाऱ्या काजलला ॲक्टिव्ह राहाण्यास आवडतं .
पण गरोदरपणात ॲक्टिव्ह असण्याला वेगळं परिमाण आहे. ज्यांच्या गरोदरपणात कोणतीही गुंतागुंत नाही त्यांनी रोज एरोबिक्स आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंगचे व्यायाम प्रकार करावेत. गरोदरपणात निरोगी राहाण्यासाठी रोजचा व्यायाम उपयुक्त ठरतो असं काजल म्हणते.
Image: Google
गरोदरपणात व्यायाम करताना मुख्य उद्देश या काळात आपली फिगर वगैरे जपणं हा नसून तर फिटनेस वाढवणं हा असावा. पिलाटे आणि बॅरे या व्यायाम प्रकारांमुळे गरोदरपणात, बाळंतपणापूर्वीचा आवश्यक फिटनेस राखला जाण्यास मदत होत आहे. गरोदरपणात मध्यम गतीचे व्यायाम प्रकार केल्यानं केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही चांगलं राहातं.
Image: Google
काजल म्हणते की गरोदरपणात आणि बाळंतपणात जे शारीरिक आणि मानसिक बदल होतात त्या बदलांसाठी मध्यम गतीचे एरोबिक्स, पिलाटे, बॅरे या व्यायामाचा फायदा होतो. बाळंतपणानंतर शरीराची लवकर झीज भरुन काढण्याची ताकद गरोदरपणात केलेल्या या व्यायाम प्रकारांनी मिळते. काजल गरोदरपणातल्या व्यायामाविषयी जे बोलते त्याला स्वत: फिटनेस तज्ज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे.
Image: Google
गरोदरपणात पिलाटे आणि बॅरे का महत्त्वाचे?
पिलाटे आणि बॅरे प्रकारचे व्यायाम केल्यानं गरोदरपणातल्या हालचाली सुलभ होण्यासाठी त्याची मदत होते. या व्यायामांमुळे ओटीपोटाचे स्नायू बळकट होतात. पिलाटे हा व्यायाम प्रकार गरोदरपणात केल्यास बाळंतपाच्या वेळी येणाऱ्या कळा सुसह्य होतात. कळांचा कालावधी कमी होतो.स्वत:च्या आणि बाळाच्या जीविताला धोका निर्माण न होता आई होण्याचं समाधान अनुभवता येतं असं तज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
बॅरे हा तर गरोदरपणात करावयाचा सगळ्यात सुरक्षित व्यायाम आहे असं फिटनेस तज्ज्ञ म्हणतात. फक्त ज्या पूर्वी कधीही व्यायाम करत नव्हत्या त्यांना जर गरोदरपणात मध्यम गतीचे एरोबिक्स, पिलाटे किंवा बॅरे हे व्यायाम करायचे असतील तर त्यांनी आधी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घेऊन व्यायाम करायला हवा असा सल्लाही फिटनेस तज्ज्ञ गरोदर महिलांना देतात.