बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमीच आपली लाईफस्टाईल आणि वैयक्तीक आयुष्यामुळे बरीच चर्चेत असते. सध्या आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्मामुळे ती प्रंचड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी करीना प्रेग्नंसी बुकमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. करीना आपल्या प्रेग्नंसी बायबल बुकच्या माध्यमातून रोज नवीन खुलासा करत आहे. करीना कपूरने तिच्या बुक लाँचिंग दरम्यान सांगितले की ती गरोदरपणात डिंकाचे लाडू खायची. होय, हेल्दी प्रेग्नंसीसाठी करीना नेहमी डिंकाचे लाडू खाणं पसंत करत होती.
डिंक लाडू अनेक गुणांनी परिपूर्ण आहेत. आयुर्वेदात औषध म्हणून याचा वापर केला जातो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे डिंकाचे अनेक फायदे असण्याव्यतिरिक्त त्यापासून बनवलेले लाडू देखील खाण्यास अतिशय चवदार असतात. या लाडवांना न्यूट्रिशन्सचे पावरहाऊसही म्हटले जाते.
फायदे
आयुर्वेदातही डिंकाबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी डिंकाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. भारतामध्ये डिंक मुख्यतः बाभळीच्या झाडापासून मिळवलं जातं. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्या दूर होतात.
त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डी कमी असणाऱ्या लोकांनी डिंकाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. हे त्वचेची काळजी घेण्यासाठी ओळखलं जातं. डिंक रात्रभर पाण्यामध्ये ठेवून त्याची पौष्टीक पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यामध्ये बदामाची पावडर आणि दूधही तुम्ही मिक्स करू शकता. दररोज सेवन केल्याने आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.
आयुर्वेदानुसार डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, तसेच सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. सांध्यांसाठी लुब्रिकेंट्स म्हणून काम करून डिंक सांधेदुखीपासूनही संरक्षण करते. प्रसुतीनंतर लिंकाचे लाडू खाल्ल्याने चांगल्या स्तनपानास मदत होते.
असे तयार करा पौष्टीक लाडू
साहित्य
किसलेले सुके खोबरे 1 1/2 वाट्या, खारीक पावडर 1 वाटी, खाण्याचा डिंक 1/2 वाटी, खसखस 2 टीस्पून, वेलची पूड 2 टीस्पून, जायफळ पावडर 1 टीस्पून, सुका मेवा 1/2 वाटी (बदाम,काजू,पिस्ते,मनुका,बेदाणे), गूळ 2 वाट्या, साजूक तूप 1 वाटी, डेसिकेटेड कोकोनट 2 चमचे
कृती
सर्वात आधी कोरड्या कढईमध्ये खसखस भाजून घ्या. त्यानंतर खोबर्याचा कीस भाजून घ्या. दोन्ही कोरड्या वस्तू भाजून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून घ्या.
कढईमध्ये तूप घ्या. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये डिंक तळून घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ते तळून घ्यावे. त्यानंतर खारकेची पूडही तूपात भाजून घ्यावी.
भाजलेली खसखस थोडी कूटून घ्यावी. त्यानंतर खोबरं आणि डिंक हाताने थोडं चुरून घ्यावे.
सर्व भाजलेले साहित्य, सुकामेवा, जायफळ आणि वेलची पूड एकत्र करावे.
दुसऱ्या एका भांड्यामध्ये गूळ घेऊन त्यामध्ये दोन चमचे पाणी मिक्स करावे. हे मिश्रण गॅसवर ठेवून सतत ढवळत राहा. गूळ वितळून वर आल्यानंतर गॅस बंद करा.
तयार पाकामध्ये कोरडं मिश्रण घालून व्यवस्थित एकत्र करावे. मिश्रण गरम असेपर्यंत त्याचे लाडू वळून घ्यावे. प्रत्येक लाडू वळल्यानंतर खोबऱ्याच्या किसामध्ये घोळावे आणि कडेला ठेवावे. तयार आहेत पौष्टीक डिंकाचे लाडू