Join us   

करिअरच्या शिखरावर असताना आई होणं ठरवलं तर...आलियाच्या मातृत्त्वाच्या निर्णयाविषयी करिना कपूरने स्पष्टच सांगितलं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2022 6:13 PM

Kareena Kapoor's Opinion About Alia's Pregnancy: करिना कपूरही यशाच्या शिखरावर असताना तिनं मातृत्त्वाचा निर्णय घेतला आणि दोन मुलं सांभाळूनही ती उत्तम काम करतेय, आलिया भटच्या संदर्भातही ती तेच म्हणाली..

ठळक मुद्दे आलियाच्या प्रेग्नन्सीच्या बातमीनंतर तिची नणंद करिना कपूरही जाहीरपणे काही गोष्टी बोलली.करिनानेही काही वर्षांपुर्वी करिअर ऐन जोमात असताना आई होण्याचा निर्णय घेतला. तैमूरच्या जन्मानंतर पुन्हा करिअर सुरू केलं.

आलिया भट आणि रणबीर कपूर (Alia Bhat and Ranbir Kapoor) यांचं लग्न झालं. माध्यमांसह सोशल मीडियातही त्यांचं लग्न (wedding) हा चर्चेचा विषय होता. देखणे व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले.  त्या चर्चा थांबत नाही तोच त्यांनी आपण आईबाबा होणार असल्याचं जाहीर केलं. गरोदर (Alia's pregnancy) असल्याची बातमी समाज माध्यमांद्वारे जाहीर केली. आधी तर अनेकांना तर ती अफवाच वाटली. पब्लिसिटी स्टंण्टही वाटला. मात्र ती गुड न्यूज खरी असल्याचं समजलं, आलिया भटने प्रसंगी माध्यमांना ठणकावत आपण गरोदर आहोत, आजारी नाही. काम करु शकते म्हणत आईपणाचा नवा टप्पा अभिमानानं स्वीकारल्याचं दिसलं. (What did Kareena spoke about Alia's pregnancy?)

खरंतर लग्नानंतर किती दिवसांनी बाळ होऊ द्यायचं, कधी चान्स घ्यायचा हा निर्णय सर्वस्वी नवरा आणि बायको या दोघांचाच असतो. पण तरीही आपल्याकडे कुणी कधी आई- बाबा व्हावं, याविषयी सल्ले देणारे अनेक असतात. नातेवाइकही सांगतच असतात आता कधी पेढे देणार, लवकर द्या.  आलिया आणि रणबीर संदर्भात मात्र उलटं झालं. लग्न होत नाही तर दोन महिन्यात काय लगेच पाळणा हलणार असल्याची बातमी म्हणून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. काय ती घाई म्हणत नाकं मुरडणारे आणि आता आलियाच्या करिअरचं कसं होणार म्हणत चिंता करणारेही कमी नव्हते.

आलिया बॉलीवूडची सध्याची टॉपची अभिनेत्री. त्यामुळेच तर ती लग्नानंतर दोन महिन्यांतच प्रेग्नंट राहिलेली पाहून अनेकांना धक्का बसला. असंच एखाद्या सामान्य घरातल्या सामान्य स्त्रीसोबत झालं असतं, तर तिला कधीच एवढ्या लवकर चान्स का घेतला, असा प्रश्न विचारला गेला नसता. पण आलियाच्या नावापुढे 'अभिनेत्री' हे बिरुद लागलेलं असल्याने तिच्या प्रेग्नन्सीबाबत मात्र अनेकांनी प्रश्न विचारला. कारण ती एवढ्या लवकर असा निर्णय घेईल, हे कुणाला अपेक्षितच नव्हतं. अर्थात आलिया आणि रणबीरने त्या साऱ्याकडे दुर्लक्षच केलं असणार. मात्र तरी त्यांना त्यासंदर्भात वारंवार प्रश्न केले जातातच. गरोदरपणात तू काम करणार का? असा आचरट प्रश्नही माध्यमांनी तिला विचारलाच. तिनं अर्थातच त्याला सम्यक उत्तर देत तब्येत उत्तम असेल तर काम करणारच असं ठामपणे सांगितलं.

आलियाच्या प्रेग्नन्सीच्या बातमीनंतर तिची नणंद करिना कपूरही जाहीरपणे काही गोष्टी बोलली. मीडडे वृत्तपत्राला मुलाखत देताना करिना म्हणाली की रणबीर आणि आलियाने घेतलेला हा सगळ्यात धाडसी आणि उत्तम निर्णय आहे. सध्या आलिया बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. ती माझ्या कुटूंबातली आहे, म्हणून मी हे बोलतेय असं नाही. पण ती एक चतु:रस्त्र अभिनेत्री आहे. बाळाला जन्म दिल्यानंतरही ती नक्कीच खूप चांगले चित्रपट करेल. प्रेग्नन्सीमुळे ती सध्या तिच्या आयुष्यातल्या एका सुंदर वळणावर आहे. आयुष्यातली ही सगळ्यात सुंदर गोष्ट अनुभवण्यासाठी  तयार आहे, आणि मला तिची हीच गोष्ट खूप आवडली, असं करिनाने सांगितलं.

 

करिनानेही काही वर्षांपुर्वी करिअर ऐन जोमात असताना आई होण्याचा निर्णय घेतला. तैमूरच्या जन्मानंतर पुन्हा करिअर सुरू केलं. त्यानंतर जेह या दुसऱ्या मुलासाठी ब्रेक घेऊन आता पुन्हा एकदा ती तिच्या करिअरची नव्याने आखणी करते आहे. अभिनेत्रीने लग्न केलं, मुलं जन्माला घातली म्हणजे संपलं तिचं करिअर असं मानण्याचा काळ सरला हे चित्र त्यातल्या त्यात चांगले म्हणावे.

 

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीकरिना कपूरआलिया भटरणबीर कपूर