लग्नाआधी किंवा लग्नानंतर अगदी फिगरमध्ये असणारे आपण मूल झाल्यावर मात्र एकाएकी जाड होतो. प्रेग्नन्सीमध्ये घेतलेला आहार, आराम, हार्मोन्समध्ये होणारे बदल यांचा तो परीणाम असतो. पण बाळाचे स्तनपान आणि इतर काळजी, आपली तब्येत हे सगळे सांभाळताना वाढत्या वजनाकडे फारसे लक्ष देऊ नये असे सांगितले जाते. बाळ मोठे होत जाते तशी आई म्हणून आपली दगदग वाढते आणि मग वाढलेले वजन नकळत कधी पूर्वपदावर येते ते कळत नाही. मात्र असे सगळ्यांच्याच बाबतीत होते असे नाही. तसेच अशाप्रकारच्या दगदगीमुळे वजन कमी होण्याचा फायदा नसतो. तर स्नायूंना पुरेसा ताण पडणे आवश्यक असते.
म्हणूनच वजन कमी होण्याबरोबरच स्नायू बळकट होण्यासाठी दिवसातील कोणतीही १५ मिनीटे आपण सहज करु शकतो असे सोपे व्यायामप्रकार आज आपण पाहणार आहोत. हे व्यायामप्रकार करताना मजा येत असल्याने त्यात व्यायामाचा फिल येत नाही. तसेच मुलं थोडी मोठी झाली असतील तर त्यांना घेऊनही हे व्यायामप्रकार करता येतात. त्यामुळे मुलांनाही मजा येते आणि मुलांसोबत अॅक्टीव्हीटी केल्याने त्यांनाही मजा येते. पाहूयात मूल झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमच्या फिगरमध्ये यायचं असेल तर कोणते व्यायाम करायला हवेत याविषयी...
१. जंपिंग जॅक
दोन्ही हात आणि पाय बाजूला घेऊन हळूवारपणे उड्या मारणे. हात आणि पाय एका वेळेला बाजूला जातील असे पाहावे म्हणजे चांगले सिंक्रोनायजेशनही होण्यास मदत होते.
२. ग्लूट ब्रिज
ग्लूट ब्रिज करण्यासाठी पाठीवर झोपा. दोन्ही पाय गुडघ्यांवर वाकवा आणि पाय जमिनीवर ठेवा. तळवे जमिनीकडे करुन हात शरीराच्या बाजूला ठेवा. आवश्यक असल्यास, मानेच्या खाली आणि डोक्याखाली एक लहान उशी ठेवा. आता हळू हळू हिप्स आणि लोअर बॅक वर घ्या. पण लक्षात ठेवा की पायाची बोटे, हात, खांदे जमिनीवरच ठेवा. या स्थितीत ५ ते १० सेकंद राहण्याचा आणि नंतर कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करा.
३. प्लँक
प्लॅक पाहायला सोपे असले तरी हा व्यायाम करणे अजिबात सोपे नाही. पोटाच्या स्नायूंबरोबरच पाय, पाठ, आणि घोटा यांसाठीही प्लँक अतिशय फायदेशीर असतात. अवयवांना मजबूती येण्यासाठी नियमितपणे प्लँक करणे उपयुक्त ठरते. प्लँक करताना १० सेकंदापासून सुरूवात करुन १ मिनिटापर्यंत वेळ वाढवता येते.
४. बर्ड -डॉग
सगळ्यात आधी दोन्ही तळहात आणि दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा. यानंतर उजवा हात आणि डावा पाय सोबतच वर उचला. उजवा हात समोरच्या दिशेने सरळ पुढे करा तर डावा पाय मागच्या दिशेने सरळ रेषेत मागे करा. मान सरळ ठेवा आणि नजर समोरच्या भिंतीवर स्थिर करा. ही स्थिती ५ ते १० सेकंद टिकवा. नंतर हात आणि पाय जागेवर ठेवून पुन्हा पहिली पोझिशन घ्या. हीच क्रिया डाव्या आणि उजव्या पायाने करा.
५. सिट अपस
हा व्यायाम कोर स्थिर करण्यासाठी, पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि स्नायूंना टोन करण्यासाठी केला जातो. सिट अपसचे वेगवेगळे प्रकार असून सुरुवातीला सोप्या प्रकारापासून सुरुवात करायला हवी. संख्या एकदम न वाढवता हळूहळू वाढवत नेल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
६. वॉल पुश अपस
भिंतीला हात टेकवून पाय भिंतीपासून काही अंतरावर ठेवून हाताने भिंतीवर जोर मारण्याच्या व्यायामाला वॉल पुश अपस म्हणतात. हा व्यायाम केल्याने छाती, खांदे, मान यांच्या स्नायूंना ताण पडतो आणि तेथील स्नायू बळकट होतात.
७. स्क्वाटस
हा दिसायला सोपा मात्र करायला अतिशय अवघड व्यायामप्रकार आहे. पाठ आणि कंबरेत सरळ राहून अर्धवट खाली बसण्याच्या या व्यायामाने कंबर, मांड्या, पाय, पोट या सगळ्याच स्नायूंना ताण पडण्यास मदत होते.