सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची फॅशन डिझायनर असलेली लेक मसाबा गुप्ता सध्या प्रेग्नेंट असल्याने फार चर्चेत आहे. सर्वसाधारणपणे आपल्या भारतात प्रेग्नन्ट असलेल्या स्त्रीला अनेक सल्ले दिले जातात. अमुक केलं तर बाळ छान दिसेल, तमुक केलं तर बाळ आणि तू हेल्दी राहाल. असे नको तितके सल्ले देऊन त्या प्रेग्नन्ट असलेल्या महिलेला भंडावून सोडले जाते. हे आपल्या सर्वसामान्यांच्याच घरात होते असे नाही तर सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर असलेली मसाबा गुप्ता हिला देखील याच मानसिकतेतून जावे लागले असल्याचे तिने नुकतेच शेअर केले आहे. मसाबा हिने नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये तिचा हा आगळावेगळा अनुभव नेटकऱ्यांसोबत शेअर केला आहे(Masaba Gupta Opens Up About Receiving Insensitive Pregnancy Advice: 'Eat Rasgullas, Drink Milk For Fair Baby').
मसाबा तिच्या प्रेग्नेंसी पीरियडचा खूप आनंद घेत आहे. फॅशन डिझायनर मसाबाने सांगितले की, 'लहानपणी माझ्या काळ्या रंगामुळे लोक मला ट्रोल करायचे आणि आता जेव्हा मी गरोदर आहे तेव्हा लोक मला रसगुल्ला खाण्यास सांगतात, जेणेकरून होणाऱ्या बाळाचा रंग माझ्यासारखा गडद होऊ नये.' मसाबाच्या मुलाखतीनंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की गरोदरपणात रसगुल्ला आणि दूध घेतल्याने गर्भातील बाळाचा रंग खरोखर गोरा होतो का? याविषयी अधिक माहिती देण्यासाठी गायनॅकोलॉजिस्ट डॉ.सीमा गुप्ता काय सांगतात ते पाहूयात(Pregnant Masaba Gupta Says Masseuse Asked Her To Eat Rasgulla, Drink Milk For 'Fair' Child).
१. मसाबाला कोणते सल्ले दिले जात आहेत ?
सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही पहिल्यांदाच आई होणार असल्याची गोड बातमी सगळ्यांना समजली. ही बातमी समजताच मसाबाचा रंग पाहून तिचे बाळ रंगाने काळे - सावळे होऊ नये म्हणून तिला रोज रसगुल्ले खाण्याचा आणि दूध पिण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु यावर मसाबाचा विश्वास नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. याचे उत्तर देताना मसाबा म्हणते, " असा सल्ला देणं हे केवळ नवीनच आई होणाऱ्या स्त्रीच्या मानसिकतेला हानी पोहोचवणारेच नाही आहे तर लोकांच्या जुनाट मानसिकतेचे प्रतिबिंब देखील आहे."
२. यावर गायनॅकोलॉजिस्ट डॉ.सीमा गुप्ता सांगतात...
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सीमा गुप्ता यांच्या मते, सगळेचजण गरोदर मातेला गर्भधारणेदरम्यान केसर, शहाळ्याचे पाणी आणि दूध यांसारखे पदार्थ खाण्या - पिण्याचा सल्ला देतात, जेणेकरून बाळाचा रंग काळा होऊ नये. पण वैद्यकीय शास्त्रात याचा काहीच पुरावा नाही. गरोदरपणात रसगुल्ला खाणे फायदेशीर आहे, परंतु केवळ मुलाचा रंग गोरा होण्यासाठी रसगुल्ला खावा असे म्हणणे चुकीचे आहे. गर्भात असलेल्या बाळाचा रंग गोरा की काळा हे त्याच्या पालकांच्या जीन्सवर अवलंबून असते. जर दोन्ही पालकांचा रंग गोरा असेल तर बाळ गोर असू शकते.
३. गरोदरपणात रसगुल्ला खावा की खाऊ नये ?
गरोदरपणात रसगुल्ला खाणे फायदेशीर आहे. खरंतर, या काळात गर्भवती महिलेला भरपूर प्रथिनांची गरज असते आणि रसगुल्ला हा प्रथिनयुक्त पनीर पासून बनवला जातो. गर्भवती महिला रसगुल्ला त्यांच्या आहारात समाविष्ट करु शकतात. फक्त रसगुल्ला खाताना तो योग्य प्रमाणात खावा. जास्त साखर खाल्ल्याने चरबी देखील वाढू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचा आहारात समावेश करावा. गरोदरपणात रसगुल्ला खायचा असेल तर आपण खाऊ शकतो, परंतु रसगुल्ला खाताना त्याच्यासोबत जो साखरेचा पाक असतो तो खाणे टाळावे. याशिवाय रसगुल्ल्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे तुमचे वजनही वेगाने वाढू शकते. त्यामुळे रसगुल्ला खाताना काळजीपूर्वक विचार करूनच खावा.