भावनांमध्ये सातत्याने बदल होणं याला म्हणतात मूड स्विंग्ज. भावनांमध्ये सातत्याने चढ उतार होत असतील, एका क्षणी आनंद, दुसऱ्या क्षणी चिडचिड होत असेल तर त्याला मूड स्विंग्ज म्हणतात. तुम्हाला जर गरोदरपणात मूड स्वीन्ग्सचा अनुभव होत असेल तर काळजी करू नका, तर ती सामान्य बाब आहे. अर्थात मूड स्विंग्जचा तुमच्या दैनंदिन जीवनावर, नातेसंबंधांवर परिणाम होत असेल, तुमच्या जगण्यावर नको इतका प्रभाव होत असेल तर याचा अर्थ हे मूड स्वीन्ग्स 'बायपोलार डिसऑर्डर'मुळेही असू शकतात. लक्षणं बघा आणि योग्य ते उपचार वेळीच घ्या.
मूड स्विंग्जची लक्षणं कोणती?
१) वारंवार अस्वस्थता येणं
२) झोपेच्या समस्या
३) खाण्याच्या बदलेल्या सवयी
४) एकाग्रता कमी होणं
५) छोट्या कालावधीसाठी स्मरणशक्ती जाणं.
मूड स्विंग्जचे परिणाम काय असतात?
१) प्रेग्नन्सीमध्ये कुठलीही स्त्री भावनिक उतार चढावातून जात असते. अनेक प्रकारचे भावनिक बदल स्त्रीमध्ये होतात. सर्वसाधारणपणे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला किंवा शेवटी हे बदल मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. शरीरात झालेल्या हार्मोनल बदलांचा आणि वाढलेल्या प्रोजेस्टेरॉनचा हा परिणाम असतो.
२) पहिल्या तीन महिन्यात बहुतेक स्त्रियांना होणाऱ्या बाळाच्या स्वास्थ्याची काळजी असते. सगळं व्यवस्थित पार पडेल ना ही भीती असते. दुसऱ्या तिमाहीत आपण एक चांगली आई होऊ ना, बाळाची नीट काळजी आपल्याला घेता येईल ना अशी भीती अनेक स्त्रियांच्या मनात असते आणि प्रत्यक्ष बाळंतपणाचा काळ अनेकींना प्रचंड भीतीदायक वाटू शकतो. कारण कुठलेही अडथळे न येता बाळाचा जन्म व्हावा हीच त्यांची इच्छा असते.
३) या सगळ्यातून अस्वस्थता निर्माण होते आणि पुढे जाऊन भीती. याचं अजून एक कारण म्हणजे प्रेग्नन्सीभोवती असलेली अनिश्चितता. आपलं बाळ पोटात नीट वाढलं पाहिजे, नीट बाळंतपण झालं पाहिजे, नंतर स्तनपान नीट जमलं पाहिजे आणि बाळाचं संगोपन योग्य पद्धतीनं झालं पाहिजे असं सगळंच एकाचवेळी तिच्या मनात असतं. या सगळ्याचा कळत नकळतपणे ताण येतो आणि अस्वस्थता वाढते.
४) अनेक स्त्रियांना हा ताण सहन झाला नाही की रडू येतं. सुरुवातीच्या काळात अनेक स्त्रिया रडतात.
५) शरीराचा आकार बदलत असतो. पोट मोठं होणं, वजन वाढणं या सगळ्यामुळे स्त्रिया वेगळ्या दिसायला लागतात. त्यातूनही काही जणींना अस्वस्थता येऊ शकते.
मूड स्विंग्जचं व्यवस्थापन कसं कराल?
१) मूड स्वीन्ग्स होतायेत याचाच सतत विचार करत बसू नका. मूड स्वीन्ग्स झाले तर होऊ द्या. काळजी करू नका. अशावेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. जे काही काम करता आहात त्यावर लक्ष केंद्रित करा म्हणजे प्रसंग हाताळणं सोपं जाईल.
२) प्रेग्नन्सीमध्ये मूड स्वीन्ग्स होतातच. हे अतिशय नॉर्मल आहे. त्यामुळे त्याकडे आपल्याला एखादा आजार झालाय का या नजरेनं बघू नका.
३) याकाळात थोडीशी निराशा येणंही अतिशय नॉर्मल आहे. उदास वाटायला लागलं तर थोडीशी झोप घ्या. रिलॅक्स व्हा. काही दिवसांसाठी दगदग करू नका. आणि पॉझिटिव्ह राहा.
४) तुम्हाच्या भावना व्यक्त करा. तुम्हाला जे काही वाटतंय ते जोडीदाराला, जवळच्या मित्रमैत्रिणींना, जवळच्या माणसांना सांगा. मनात ठेऊ नका. भावना व्यक्त केल्यामुळे ताण कमी होतो आणि ताण कमी झाला की मूड स्वीन्ग्स कमी होण्यास मदत मिळू शकते.
५) योग करा. ध्यानामुळे ताण कमी होतो. अस्वस्थता कमी व्हायला मदत मिळते. चांगले विचार मनात येतात आणि एकूण पॉझिटिव्ह वाटायला लागतं.
मूड स्वीन्ग्स हा प्रेग्नन्सीमधला महत्वाचा भाग आहे. ते येतातच. त्यामुळे गिल्टी वाटून घेऊ नका. ते सीमित कसे राहतील हे बघितलं पाहिजे. त्यासाठी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. चांगलं चुंगलं खा. व्यायाम करा. मूड स्वीन्ग्स आटोक्यात ठेवण्यासाठीच्या तुमच्या प्रयत्नांचा उपयोग होत नाहीये असं वाटलं तर लगेच डॉक्टरांची मदत घ्या. मानसोपचार तज्ज्ञांकडे किंवा मनोविकारतज्ज्ञांकडे मदत मागण्यात लाज बाळगू नका. त्यात काहीही वाईट नसतं. उलट वेळच्या वेळी मदत घेतली तर गोष्टी हाताबाहेर जात नाहीत. कारण नैराश्य किंवा इतर कुठल्याही मानसिक ताणाचा परिणाम जसा आईवर होतो तसाच तो बाळावरही होतो हे लक्षात ठेवलंच पाहिजे.
विशेष आभार - डॉ. पारुल टंक
DPM, MD, DNBE MRCPsy(UK)