Join us   

गरोदर महिलेला सकाळी उठल्या उठल्या खूप मळमळते, असे का? उपाय काय, कशाने वाटेल बरं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 4:57 PM

Morning Sickness Nausea and Vomiting In Pregnancy : नॉशिया म्हणजे काय आणि यावर उपाय काय करावेत याविषयी...

सकाळी उठल्या उठल्या एकदम मळमळणं, अगदी पाणीही नकोसं वाटणं आणि सतत उलटीसारखं वाटणं ही गरोदर असण्याची सुरवातीच्या काळातली महत्त्वाची लक्षणं. कधी एकदा हे दिवस संपतात आणि हा त्रास कमी होतो असं गरोदर महिलेला होऊन गेलेलं असतं. काहीच खाण्यापिण्याची इच्छा न होणे आणि पोटात सतत ढवळ्यासारखे होणे हे या काळात अतिशय सामान्य असते. हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे ही लक्षणे जाणवतात. नेहमी महिन्याभराने येणाऱ्या पाळीचं चक्र चुकलं की आपण गरोदर आहोत याचा अंदाज स्त्रीला येतो आणि मग पुढे साधारण चौदाव्या आठवड्यापर्यंत म्हणजेच पहिल्या तिमाहीपर्यंत हा मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू राहतो. एचसीजी नावाच्या प्रेग्नन्सी हार्मोनमुळं शरीरात प्रचंड बदल होतात. त्याचाच परिणाम म्हणजे ही मळमळ (Morning Sickness Nausea and Vomiting In Pregnancy) .

(Image : Google)

नॉशिया येतो म्हणजे काय?

गरोदर महिलांना पहिल्या तिमाहीत अन्नाचे वास, पोळी किंवा फोडणीचा वास अजिबात सहन होत नाही. कोणतेही उग्र वास घेतले की त्यांना मळमळल्यासारखे होते. याचे महत्त्वाचे काऱण म्हणजे या काळात पंचेंद्रिये जास्त अॅक्टीव्ह झालेली असतात. त्यामुळे नाकाला येणारे वास अधिक तीव्रतेने येतात. मात्र असे होत असले तरी योग्य तो आहार घेणे आणि शरीरातील पाण्याची पातळी चांगली ठेवणे अतिशय गरजेचे असते. त्यामुळे आहार आणि जीवनशैलीच्या बाबतीत योग्य ती काळजी जरुर घ्यायली हवी. हा नॉशिया खूप जास्त काळ आणि असह्य होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर औषधे घेतल्यास फायदा होतो. 

मॉर्निंग सिकनेस कसा हाताळावा?

- तीन मोठ्या जेवणांऐवजी दिवसातून अनेक लहान जेवण खा. जेवण वगळू नका.

- मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ टाळा. केळी, तांदूळ, कोरडा टोस्ट, साधा भाजलेला बटाटा, सफरचंद यासारखे सौम्य पदार्थ खा.

- जेवणादरम्यान पौष्टिक, प्रथिनेयुक्त स्नॅक्स खा, जसे की दही, सफरचंदाच्या तुकड्यावरचे पीनट बटर चीज किंवा नट्स.

(Image : Google)

- दिवसभर भरपूर द्रवपदार्थ, विशेषतः पाणी प्या. कॅफिनयुक्त पेये टाळा.

- घरापासून दूर असाल तेव्हा नेहमी स्नॅक्सची पिशवी सोबत ठेवा.

- किसलेले आले घालून चहा बनवा किंवा आले कँडी वापरून पहा.

- भरपूर अराम करा खोल्या हवेशीर ठेवा, पंखा चालू करा किंवा ताजी हवा मिळवण्यासाठी वेळोवेळी बाहेर जा.

- लिंबू, संत्री किंवा पुदीना यांसारखे ताजे, आनंददायी वास घ्या.

- जेवल्यानंतर झोपू नका.

- ताणतणाव टाळावेत.

- उलट्या झाल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा. उलटीमध्ये असणाऱ्या अॅसिडपासून यामुळे सुटका होते. 

- रात्रीची गाढ झोप पूर्ण झाल्यानंतर सकाळी जास्त वेळ पोट रिकामं न ठेवता ताबडतोब खाऊन घ्यावं. कधीकधी जास्त काळ पोट रिकामं राहीलं तरी मळमळ सुरू होते. मात्र रात्री लवकर झोपणं आणि झोपण्याआधी रात्रीचं जेवण सकस होणं महत्त्वाचं आहे.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सप्रेग्नंसीगर्भवती महिला