भारत आणि चीनसारख्या देशात वाढती लोकसंख्या हे चिंतेचं एक प्रमुख कारण आहे. पण काही देशांत घटत्या लोकसंख्येमुळे सरकारे हादरली आहेत आणि तिथली लोकसंख्या लवकरात लवकर कशी वाढेल या प्रयत्नात लागली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीत आता अमेरिकेची ही भर पडली आहे. कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला. अनेक आकस्मिक संकटांची मालिकाच उभी राहिली. अमेरिकेत सुरुवातीच्या काळात तर खूप मोठ्या प्रमाणात लोक कोरोनामुळे दगावले. तिथली अर्थव्यवस्था डबघाईला आली. त्यातून अमेरिका आता हळूहळू सावरते आहे, पण कोरोनानं एक नवंच संकट अमेरिकेपुढे उभं केलं आहे. या महामारीत अमेरिकेतील प्रजनन दर प्रचंड खाली आला आहे. अशा संकटकाळात आपल्याला आणि आपल्या होणाऱ्या बाळाला कोरोनाची झळ पोहोचू नये, यासाठी अनेक अमेरिकन तरुण महिलांनी ‘आई’ होणे नाकारताना तो निर्णय पुढे ढकलला आहे. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. अमेरिकेतील प्रजनन दर तब्बल ११२ वर्षांत पहिल्यांदाच निचांकी स्थितीत आला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी)च्या ताज्या अहवालानुसार अमेरिकेतील जन्मदरात १९७९ नंतर झालेली ही सर्वात मोठी घट आहे. सीडीसीचं म्हणणं आहे, कोरोनामुळे निर्माण झालेली प्रचंड घबराट, भविष्याची चिंता आणि जवळपास सर्वसामान्य व्यक्तींच्या उत्पन्नात झालेली घट ही घटत्या प्रजनन दराची प्रमुख कारणं आहेत. अशा परिस्थितीत मुलांना जन्माला घालून ‘अडचणींत’ वाढ करून घेण्याची कोणाचीही इच्छा नाही. परंतु घटत्या प्रजनन दरामुळे अमेरिका प्रशासन आणि विशेषज्ञ ही चिंतेत पडले आहेत. कोरोना काळात कुटुंब घरात कोंडली गेल्यामुळे विश्वभरात ‘बेबी बुम’ येऊ शकेल,अशी भाकीत सुरुवातीला वर्तवली गेली होती, पण प्रत्येकात मात्र वेगळीच वस्तुस्थिती समोर येताना दिसते. आधीच कमी असलेला जन्मदर आणखी कमी होणं हे अमेरिकेपुढील नवं संकट मानलं जात आहे. जोडप्यांनी मुलांना जन्म देणं बंद केलं तर अमेरिकेतील वृद्ध लोकांची संख्या झपाट्यानं वाढेल आणि त्या तुलनेत तरुणांची संख्या कमी होईल. त्यामुळे अमेरिकेत आता मुलांना जन्म देण्यासाठी प्रभावी प्रचार मोहीम आणि उपाय हाती घ्यावे लागतील असं तज्ज्ञांचं मत आहे.
सीडीसीच्या या अहवालानंतर अमेरिकेतील आर्थिक विशेषज्ञ मोठ्या प्रमाणात चिंतेत पडले आहेत. त्यांचं म्हणणं आहे, अमेरिकेची आणखी आर्थिक प्रगती करायची असेल, तर लोकसंख्येत वाढ होणंही अत्यंत आवश्यक आहे. म्हाताऱ्या होत जाणाऱ्या एका संपन्न समाजापेक्षा अमेरिकेला एक असं राष्ट्र बनवण्याची गरज आहे, ज्याची लोकसंख्या शंभर कोटीच्या आसपास असेल. मात्र या दृष्टीने प्रयत्न करताना इतरही अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागेल. कारण त्यामुळे काही अडचणीही येऊ शकतात. लोकसंख्या वाढवण्याआधी वाढत्या लोकसंख्येला पुरेसं अन्न कसं मिळेल याची तजवीज आधी करावी लागेल. कारण संपूर्ण जगातच ‘भूक’ ही एक सर्वांत मोठी समस्या म्हणून पुढे येते आहे. येणाऱ्या काळात भूकबळी आणि कुपोषणाची समस्या आणखी गंभीर होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जलवायू परिवर्तन ही अन्नपुरवठ्यातील सगळ्यात मोठी समस्या असेल, असं मानलं जात आहे. २०६० पर्यंत जगाची लोकसंख्या ९७० कोटीपर्यंत पोहोचेल. इतक्या लोकांसाठी अन्न उपलब्ध करणं मोठं जिकिरीचं असेल असं मानलं जात आहे. कारण या कोरोनाकाळात अमेरिकेला स्वत:ला खूप मोठ्या अन्न संकटातून जावं लागलं. कोरोनामुळे आत्ताच खाद्य असुरक्षा दुप्पट झाली आहे. ‘फुड बॅक्स’ वाढवण्यावर जोर दिला जात आहे, पण जगाला सर्वात मोठी चिंता सध्या सतावते आहे, ती म्हणजे येत्या तीस वर्षांत जगाची लोकसंख्या तब्बल दोनशे कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी आत्ताच काही उपाययोजना केली नाही, तर जगभरात भूकबळींची संख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल. येत्या काळात चांगल्या पीक उत्पादनाची अपेक्षा आहे, पण हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीच्या आकडेवारीवरुन असे दिसून येते आहे की, दुष्काळ, पूर, चक्रीवादळ आणि टोळधाडीच्या हल्ल्यांमुळे उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर घटते आहे. त्यासाठी कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता अपरिहार्य होणार आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की येत्या काळात लोकसंख्येबरोबरच ‘खाद्यान्न सुरक्षा’ हे जगापुढील एक महत्त्वाचं संकट असेल.
गेल्या वर्षी केवळ ३६ लाख मुलं..
वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स ॲण्ड इव्हॅल्युएशन’च्या मते अमेरिकेत १५ ते १९ वयोगटातील महिलांमधील जन्मदर वर्षभरात आठ टक्क्यांनी कमी झाला आहे. १९९१ पासून यात सातत्यानं घट होते आहे. त्याचबरोबर आशियाई- अमेरिकन महिलांमधील जन्मदर ही आठ टक्क्यांनी, लॅटिन-अमेरिकन वंशाच्या महिलांमधील जन्मदर तीन टक्क्यांनी, गौर वर्णीय महिलांमधील जन्मदर सहा टक्क्यांनी घटला आहे. २००७ मध्ये अमेरिकेत सुमारे ४३ लाख मुलं जन्माला आली होती, २०१९ मध्ये ही संख्या ३८ लाख तर गेल्या वर्षी केवळ ३६ लाख होती.