एकता कपूर लग्न न करताही एका मुलाची आई आहे, प्रियांका चोप्रानेही वयाच्या तिसाव्या वर्षीच एग फ्रिज करुन ठेवले होते. भविष्यात आपण लग्न करु की नाही माहित नाही, पण आई होण्याच्या आनंदापासून वंचित राहू नये यासाठी अभिनेत्रींनी हा पर्याय निवडला. महिलांना एकीकडे करिअर करायचंय पण दुसरीकडे लग्न न करता आईपणही अनुभवायचं आहे अशा द्विधा मनस्थितीत असलेल्यांसाठी हा एक अतिशय सेफ आणि चांगला पर्याय आहे. आज अनेक जणी हा पर्याय निवडतात आणि सिंगल मदरची जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडतात. यामध्ये स्त्रीच्या बीज कोशातील अंडी शीत अवस्थेत ठेवून नंतर त्यांचा वापर करून गर्भधारणा केली जाते (mother's day 2023 woman fighting for fertility rights).
बदलत्या काळाबरोबर आणि आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर सामाजिक बदल ही घडत गेले त्यातून एग फ्रीजिंगची संकल्पना पुढे येऊ लागली. भारतात याला मान्यता असली तरी चीनसारख्या इतर देशांमध्ये मात्र या गोष्टीसाठी महिलांना लढावे लागते आहे. एकटी महिला असली तरी तिला आई होण्याचा अधिकार असायला हवा, मात्र चीनमध्ये सध्या महिला या अधिकारासाठी लढा देत आहेत. चीनमध्ये लग्न न झालेल्या महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. यामध्ये त्यांना आई व्हावे असे वाटत असेल तर एग फ्रिजिंग पद्धतीने गर्भधारणा करणे हा चांगला पर्याय असू शकतो. मात्र सरकारने अद्याप या गोष्टीला परवानगी दिलेली नाही.
चीनमध्ये ३५ वर्षीय टेरेसा जू हिने २०१९ मध्ये बीजिंग प्रसूती आणि स्त्रीरोग रुग्णालयाविरुद्ध याविषयी दावा दाखल केला. टेरेसा हिला रुग्णालयाने अंडी गोठवण्याच्या प्रक्रियेला विरोध केला होत. त्यानंतर तब्बल ५ वर्षानंतर तिने दाखल केलेला दावा न्यायालयात चर्चेसाठी आला आहे. आता चीनमध्ये असलेल्या नियमांनुसार एग फ्रिजिंग म्हणजेच अंडी गोठवण्याची प्रक्रिया केवळ गर्भधारणेसाठी अडचण असलेल्या विवाहित महिलाच करु शकतात. लग्न न झालेल्या महिलांना हे करण्याचा अधिकार नाही. गेली काही वर्ष चीनचा जन्मदर कायम वाढता होता.
पण सहा दशकांमधील लोकसंख्येत पहिल्यांदा घट नोंदवल्यानंतर आता अविवाहित महिलांना अंडी गोठवण्याची आणि आयव्हिएफ उपचारांची सुविधा उपलब्ध असावी याबाबत चर्चा सुरू झाली आहे. चीनच्या काही प्रांतांमध्ये अविवाहीत महिला खाजगी दवाखान्यांमध्ये वाढत्या प्रमाणात आयव्हिएफचे उपचार घेत असून त्यांना मिळणाऱ्या बाळंतपणाच्या फायद्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. परदेशात जाऊन ही सगळी प्रक्रिया करणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर दृष्टीनेही अवघड आहे. पण हेच जर आपल्या देशात ही सुविधा उपलब्ध झाली तर ते अनेक महिलांसाठी सोयीचे होऊ शकते असे टेरेसा जू म्हणाल्या.