आई होणं ही एक अतिशय आनंदाची, नवा अनुभव देणारी गोष्ट. ठराविक वय झालं की आपल्या घरातले आणि आजुबाजूचेही लग्न करण्यासाठी आणि मग मुलाला जन्म देण्यासाठी मागे लागतात. आता हे वय काहीसे पुढे आले असले तरी साधारणपणे तिशीच्या आत आईपणाची जबाबदारी घ्यायला हवी. अगदीच अडचणी असतील तर फारतर पस्तीशीच्या आत तरी आई होणं ठिक आहे. आरोग्याच्या दृष्टीने, मानसिक-भावनिक आणि सामाजिक दृष्टीनेही हे वय योग्य आहे असं वारंवार सांगितलं जातं. हे जरी खरं असलं तरी आईपणाची जबाबदारी घेणं हा अतिशय वैयक्तिक प्रश्न आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तर गेल्या काही वर्षात अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही अतिशय सहजसाध्य झाल्या आहेत. अमेरिकेची सुपरमॉडेल नाओमी कॅंपबेल ३० किंवा ४० नाही तर तब्बल वयाच्या ५३ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे (Naomi Campbell Supermodel Give Birth to Baby Boy at the age of 53 Is it Safe or Risky).
इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बाळाचा फोटो शेअर करत नाओमीने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोमध्ये तिच्या २ वर्षाच्या मुलीचा हात, तिचा हात आणि बाळाचा हात अतिशय छान पद्धतीने दिसत आहे. आई होण्यासाठी कधीच उशीर होत नाही असंही तिनं आपल्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. २०२१ मध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर अवघ्या २ वर्षात ती दोन मुलांची आई झाली आहे. आपण गर्भवती असण्याची गोष्ट नाओमीने आपल्या चाहत्यांपासून लपवून ठेवली होती. त्यामुळे हा फोटो पाहून चाहते खूश तर झालेच पण आश्चर्यचकितही झाले. मात्र या वयात गर्भधारणा होण्याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह असतात. त्याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञांचे काय म्हणणे आहे पाहूया.
पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश फडणीस म्हणतात....
महिलेला नैसर्गिकरित्या पहिले मूल होण्याचे योग्य वय हे २३-२५ हे आहे. हे वय जसं पुढे जाते तशी शरीराची रचना बदलत जाते आणि मग गर्भधारणा अवघड होते. पण आता आहार, फिटनेस, गर्भधारणेबाबत असणारी माहिती ही जास्त असल्याने तितका त्रास होत नाही. मात्र पेल्विस म्हणजे कंबरेची हाडं वयाच्या पस्तीशीनंतर जुळायला लागतात त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता कमी होऊन सिझेरीयनची शक्यता वाढते. रक्तदाब, मधुमेह यांसारख्या समस्या वाढण्याची शक्यता या वयात जास्त असते. तसेच हे बीज स्वत:चे असेल तर वय वाढल्यानंतर बीजाची प्रत कमी होत जाते. त्यामुळे डाऊन सिंड्रोम किंवा इतर विविध प्रकारचे सिंड्रोम मूलात येण्याची शक्यता अधिक असते.
दुसऱ्यांदा गर्भधारणा असेल तर तितका त्रास होत नाही. अशाप्रकारे वयाच्या पन्नाशीत मूल होण्यात धोका असला तरी मूल होऊ नये असे अजिबातच नाही. फक्त त्या मुलाकडे पाहण्याची आपली आर्थिक, शारीरिक, मानसिक क्षमता टिकून राहायला हवी हा आणखी एक कौटुंबिक आणि सामाजिक मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा. भारतात अशाप्रकारे वयाच्या पन्नाशीत मूल होऊ देणे कायद्याने मान्य नसले तरी बहुतांश देशांमध्ये त्यासाठी बंधन नाही.