Join us   

नवरात्र स्पेशल आरोग्य उपासना : दोन जीवांची आहे, भरपूर खा! या सल्ल्यामध्ये किती तत्थ्य? किती असावा गरोदर महिलेचा आहार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2022 10:15 AM

Navratri Special Health Misconceptions about Pregnancy : इंटरनेटवर फक्त माहिती मिळते. त्या माहितीचा पेशंटच्या केसशी क्वचितच संबंध असतो. उगाच गरज नसलेली माहितीही डोक्याला तापदायक ठरू शकते.

ठळक मुद्दे सुकामेवा व इतर पौष्टिक पदार्थांचा अती मारा करू नये. एकूण गर्भवतीने जेवढी भूक असेल तेवढेच खावे. घरच्यांनी खाण्याचा अतिआग्रह करू नये. ज्या क्षणी गर्भधारणा होते त्या क्षणी बाळाचा रंग ठरलेला असतो, त्यात बाहेरच्या कोणत्याही गोष्टींनी कसलाही फरक पडत नाही.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी   

आपल्या समाजात गरोदर स्त्रियांना गैरसमजुतींमुळे खूप त्रासाला सामोरं जावं लागतं. या बाबतीत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करायची खूप गरज आहे. एक नेहमी बघायला मिळणारी गोष्ट म्हणजे गर्भवती मुलीला डिलिवरीबद्दल भीतीदायक गोष्टी सांगून घाबरवणे किंवा येता जाता उगाचच ‘अगं, काहीच पोट कसं दिसत नाहीये तुझं?’ किंवा ‘अगं, किती जास्त पोट दिसतंय? जुळी बिळी आहेत की काय? परत विचार बाई डॉक्टरांना!’,‘अगं, त्या अमकीचं ऐकलंस का? बाळ पोटातच गेलं म्हणे अचानक!’ हे असे डायलॉग गर्भवती मुलीसमोर बोलण्याची काय गरज आहे? आधीच घाबरलेली पहिलटकरीण तर या अशा संवादांनी अजूनच घाबरून जाते. तेव्हा गर्भवतीसमोर बोलताना सर्वांनीच जरा जपून बोललं तर बरं (Navratri Special Health Misconceptions about Pregnancy).

(Image : Google)

अजून एक गेल्या काही वर्षात लक्षात आलेली समस्या म्हणजे ‘इंटरनेट’. हल्ली प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर वाचणाऱ्या समाजातील वर्गाची वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. गर्भवती स्त्री सतत इंटरनेटवर गर्भारपणातील गुंतागुंतींबद्दल वाचत असते. याचा परिणाम म्हणून कारण नसताना मानसिक ताण वाढत जातो. इंटरनेटवर फक्त माहिती मिळते. त्या माहितीचा पेशंटच्या केसशी क्वचितच संबंध असतो. उगाच गरज नसलेली माहितीही डोक्याला तापदायक ठरू शकते. म्हणजे ‘भित्या पाठी ब्रह्मराक्षस’ह्या म्हणीचा प्रत्यय होतो. गर्भवतीच्या मागे असलेला अजून एक ब्रह्मराक्षस म्हणजे गर्भारपणाबद्दल गैरसमजुती. गर्भारपणाबद्दलच्या सर्वात जास्त असणाऱ्या गैरसमजुती आता बघूया.

१) गर्भवतीने कुशीवर झोपू नये.

गर्भवती स्त्रीला शांत झोप लागणे महत्वाचे आहे. कोणत्याही पोझिशनमध्ये झोपल्याने काहीही फरक पडत नाही. अर्थातच पोटावर झोपणे गर्भवतीला अशक्यच आहे. कुशीवर झोपताना आजूबाजूला उशा ठेऊन जास्त आरामदायकरित्या झोपता येते. गर्भाशयात बाळ गर्भजलात तरंगत असते त्यामुळे बाळावर कोणत्याही प्रकारचा दाब पडू शकत नाही.

२) गर्भवतीने दोन जणांसाठीचा आहार घ्यावा.

ही अतिशय चुकीची समजूत आहे. विशेषतः पहिल्या तीन महिन्यांमध्ये बऱ्याच वेळा गर्भवतीला उलटी, मळमळीचा त्रास होतो आणि नेहमीचे जेवणही जात नाही. अशावेळी तिला जे खावेसे वाटेल ते तिने खाल्ल्यास हरकत नाही. मात्र शीतपेये, अजिनोमोटो असलेले चायनीज पदार्थ, अती साखर, preservatives असलेले फळांचे रस, बाजारातील तयार आणि जंक फूड्स या गोष्टी टाळलेल्या बऱ्या.

तीन महिन्यांनंतर आपोआपच भूक वाढते पण अतिजास्त उष्मांक असलेले पदार्थ आहारात कमीच असावेत. आजकाल गर्भारपणातील मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले आहे. गर्भवतीचे वजन आधीच जास्त असेल अथवा गर्भारपणात अती वाढले तर हा मधुमेहाचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे हल्लीच्या काळात उलटपक्षी गर्भवतीच्या आहारावर लक्ष व नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे. आहारात फळे, भाज्या, कोशिंबिरी, उसळी या भरपूर असाव्यात. गोड पदार्थ कमी तेलकट, तळलेले आणखी कमी असावे. सुकामेवा व इतर पौष्टिक पदार्थांचा अती मारा करू नये. एकूण गर्भवतीने जेवढी भूक असेल तेवढेच खावे. घरच्यांनी खाण्याचा अतिआग्रह करू नये. आणखी एक गोष्ट म्हणजे गर्भारपणात स्वतः करून खाणे ही गोष्ट गर्भवतीला अवघड जाते, अशावेळी घरच्यांनी करून खाऊ घातले तर जास्त अंगी लागेल.

३) केशरदूध अथवा नारळपाणी रोज प्यायल्याने बाळ गोरे होते.

बाळाचा रंग हा सर्वस्वी जनुकांवर अवलंबून असतो. ज्या क्षणी गर्भधारणा होते त्या क्षणी बाळाचा रंग ठरलेला असतो, त्यात बाहेरच्या कोणत्याही गोष्टींनी कसलाही फरक पडत नाही. आणि मला वाटतं आता आपण सर्वांनीच या रंगभेदाच्या विळख्यातून बाहेर पडायला हवं. एक हसरं, निरोगी बाळ हवं.. त्याच्या रंगाने काय फरक पडतो? बाळाचं निरागस आणि लोभस हास्य ही सौंदर्याची परिसीमा आहे, नाही का?

(उद्या बोलू दुसऱ्या एका गैरसमजाविषयी)

(लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सप्रेग्नंसी