आपल्या शरीराला सशक्त आणि निरोगी ठेवण्यासाठी काही पौष्टिक घटकांची गरज असते. प्रोटिन्स, व्हिटॅमिन, फॅट, खनिजे यांची माहिती तर आपल्याला आहेच. पण त्यासोबतच ओमेगा ३ फॅटी ॲसिडचीही तेवढीच गरज आहे. गरोदर महिलांना आणि पोटात वाढणाऱ्या बाळाला योग्य पोषण मिळावे, म्हणून ओमेगा ३ फॅटी ॲसिड अत्यंत गरजेचे असते. काही मोजक्या पदार्थांमधूनच आपल्याला ते मिळते. त्यामुळे ओमेगा ३ फॅटी ॲसिडचा पुरविठा करणारे पदार्थ कोणते आहेत आणि शरीराला जर पुरेशा प्रमाणात ओमेगा ३ फॅटी ॲसिड मिळाले नाही, तर काय नुकसान होऊ शकते, याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. गरोदरपणी योग्य प्रमाणात ओमेगा ३ फॅटी ॲसिड मिळाले तर नक्कीच बाळांतपणात उद्भवू शकणाऱ्या अनेक आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात.
ओमेगा ३ फॅटी ॲसिड म्हणजे नेमके काय?
आपण जेवणात अनेक पदार्थ खातो, त्या माध्यमातून शरीराला फॅट्स मिळतात. ओमेगा ३ फॅटी ॲसिड अशाच प्रकारचे आहे. हे एक पॉलीअनसॅच्यूरेटेड फॅटी ॲसिड असून वेगवेगळ्या अन्न पदार्थांमधून ते मिळते. हे ॲसिड शरीरातील कोशिकांमध्ये जमा होते आणि त्यांना सक्रिय करते. त्यांच्या कार्याला गती देते. हृदय रोगापासून संरक्षण देण्याचे तसेच शरीर मजबूत करण्याचे कामही ओमेगा ३ फॅटी ॲसिड करते.
गरोदरपणी का खावे ओमेगा ३ फॅटी ॲसिड?
गरोदरपणात जर योग्य प्रमाणात ओमेगा ३ फॅटी ॲसिड खाल्ले गेले, तर त्याचे शरीराला अनेक लाभ होतात. यामुळे आईला तर पोषण मिळतेच पण बाळाचा मेंदू योग्याप्रकारे विकसित होण्यासाठीही खूप मदत होते. बाळाचे न्यूरो ट्रान्समिटर मेटाबॉलिझम विकसित होण्यासाठीही ओमेगा ३ फॅटी ॲसिड अतिशय उपयुक्त असते. बाळांतपणानंतर शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. अशातच बाळाला सांभाळणे, त्याचे दुखणे- खुपणे, बाळाला दूध पुरते का, त्याचे पोट भरतेय का, अशी सतत चिंता असते. त्यामुळे बाळांतपणानंतर अनेक महिलांना प्रचंड मानसिक तणावाला सामाेरे जावे लागते. हा त्रास असह्य होऊन अनेकींना नैराश्य येते. जर शरीरात योग्य प्रमाणात ओमेगा ३ फॅटी ॲसिड असेल तर मात्र बाळांपणानंतर येणाऱ्या नैराश्य टाळता येते.
बाळालाही होतात फायदे
गरोदरपणात आणि त्यानंतरही आईने ओमेगा ३ फॅटी ॲसिडचे सेवन योग्य प्रमाणात ठेवले तर ते बाळासाठीही खूपच फायद्याचे असते. यामुळे बाळाला अनेक लाभ होतात.
- गर्भाचा मेंदू विकसित होण्यास मदत होते.
- बाळाचा इंटेलिजंट कोशंट किंवा आयक्यू लेव्हल चांगल्याप्रकारे विकसित होतो.
- संवाद कौशल्याचा विकास होतो.
- वर्तणूकीसंदर्भात समस्या निर्माण होत नाहीत.
- बाळाचा प्रत्येक टप्प्यावरचा विकास जलद होत जातो.
- ऑटिझम किंवा सेरेब्रल पाल्सी असा त्रास बाळामध्ये जाणवण्याची शक्यता खूप कमी होते.
स्तनदा मातेला भरपूर दूध येते
आईचे दूध हे बाळासाठी वरदान असते. त्यामुळे पहिले सहा महिने तरी आईला योग्य प्रमाणात दूध आले पाहिजे, जेणेकरून बाळाचे व्यवस्थित पोट भरू शकेल. म्हणूनच स्तनदा मातेला ओमेगा ३ फॅटी ॲसिडचा पुरवठा करणारे पदार्थ भरपूर प्रमाणात मिळणे गरजेचे आहे. याशिवाय हे फॅटी ॲसिड आपले शरीर किंवा नवजात बाळाचे शरीर आपोआप निर्माण करू शकत नाही. त्यामुळे बाळाला ओमेगा ३ फॅटी ॲसिडचा पुरवठा होण्यासाठी आईने त्याचे सेवन करणे उत्तम.
कोणत्या पदार्थांमधून मिळते ओमेगा ३ फॅटी ॲसिड?
मासे, अंडी, सी फूड, सोयाबिन, अक्रोड मोहरीचे तेल, जवस, काळे तीळ
ओमेगा ३ फॅटी ॲसिडचे इतर फायदे
- मुलांच्या आरोग्यासाठी आणि निरोगी वाढीसाठी अतिशय उपयुक्त् आहे.
- हृदय, मेंदू व डोळ्यांसंबंधी आजार रोखण्यासाठी ओमेगा ३ फॅटी ॲसिडचे नियमित सेवन करावे.
- रक्ताभिसरण क्रिया व ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी हे ॲसिड अतिशय फायदेशीर आहे.
- आजकाल डोळ्यांसबंधी आजार वाढल्यामुळे आणि लहान मुलांचा स्क्रिन टाईम जास्त झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी त्यांना ओमेगा ३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात देणे गरजेचे आहे.