बाळाला ९ महिने पोटात वाढवणं हे एका आईसाठी जितकं महत्त्वाचं असतं तितकंच जन्म झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात त्याची काळजी घेणंही महत्त्वाचं असतं. सुरुवातीचा बराच काळ बाळ हे आईच्या दूधावरच अवलंबून असल्याने आईचे दूध हे बाळासाठी अमृतासमान असते. बाळासाठी हे स्तनपान जितकं महत्त्वाचं असतं तितकंच ते आईच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचं असतं. बाळाचा जन्म झाल्यावर आईला दूध येणं ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काही कारणाने त्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता असते (Paushtik ladoo recipe for breastfeeding mother).
काही जणींना लवकर आणि पुरेसे दूध येते, तर काही जणींना दूध वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.आई जेव्हा मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त असेल तेव्हाच ती बाळाला पुरेसे दूध देऊ शकते. बाळाला दूध पुरत नाही मग फॉर्म्युला मिल्क किंवा गाईचे दूध देण्याचा पर्याय उपलब्ध असतोच. पण शक्यतो आईला पुरेसे दूध आले तर बाळाचे जास्त चांगेल पोषण होत असल्याने आईला जास्त दूध येण्यासाठी आईने सुरुवातीपासून आणि प्रसूती झाल्यानंतरही चांगला आहार घेण्याची आवश्यकता असते. यासाठी स्तनदा मातांनी खायला हवेत अशा पौष्टीक लाडूची रेसिपी पाहूया...
१. पॅनमध्ये साधारण २ चमचे तूप घालून त्यावर डिंक चांगला तळून घ्यायचा. हाडं बळकट होण्यासाठी आणि पाठदुखी कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
२. फुललेला डींक एका ताटात काढून ठेवायचा आणि चांगला गार होऊ द्यायचा. डींकामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
३. हा डींक गार झाल्यावर त्याचा हाताने किंवा वाटीने बारीक चुरा करुन घ्यायचा.
४. मग त्याच पॅनमध्ये खसखस चांगली भाजून घ्यायची, त्यातच खोबऱ्याचा कीस खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि डींकाच्या पूडमध्ये हे मिक्स करायचे.
५. पुन्हा पॅनमध्ये २ चमचे तूप घेऊन त्यात बदामाचे काप, काजू, आक्रोड आणि पिस्ते चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे.
६. सुकामेवा भाजून झाला की यामध्येच मनुके, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया घालून हलक्या परतून घ्यायच्या.
७. हे सगळे खरपूस भाजलेले मिश्रण डींक आणि खोबऱ्याच्या मिश्रणात घालायचे आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून ते चांगले एकजीव करायचे.
८. पुन्हा पॅनमध्ये तूप घालून कमी गॅसवर या तूपात अंजीराचे काप आणि खजूर चांगला परतून त्याची बारीक पेस्ट करुन घ्यायची.
९. यामध्ये सुकामेव्याचे मिश्रण घालून हे सगळे हाताने एकजीव करायचे आणि याचे एकसारखे लाडू वळायचे.