Join us   

स्तनपानाचे वरदान देणारे एक सुंदर हार्मोन, पण त्याचेच काम बिघडले तर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 3:06 PM

स्तनपानाने बाळाचं पोट भरण्यासाठी आवश्यक मदत करणारी पिट्युटरी ग्रंथी, तिच्या कामात बिघाड झाला तर अनेक प्रश्न निर्माण होतात, पण त्यावर उपचार आहेत.

ठळक मुद्दे प्रोलॅक्टिन सस्तन प्राण्यांमध्ये असलेले वरदानच ठरते.अशीच उपाय योजना करून आई आपल्या दत्तक मुलाला गर्भधारणा न होता स्तनपानाचे सुख घेऊ शकते

डॉ. यशपाल गोगटे

मेंदुच्या तळाशी मटारच्या दाण्याएवढी एक ग्रंथी असते. पिट्युटरी ग्रंथी. या ग्रंथीतून तीन प्रमुख सेक्स हार्मोन्स निर्मिले जातात- FSH, LH व प्रोलॅक्टिन. यातील FSH व LH हे हार्मोन्स बीजांड व वृषण येथून तयार होणाऱ्या हार्मोन्स वर नियंत्रण ठेवतात. प्रोलॅक्टिन हे मात्र एक वेगळेच कार्य करत असते. सस्तन प्राण्यांना एक वैशिष्ट्य प्रदान करणारे हे हार्मोन आहे. गर्भधारणेपासून वाढत जाणारे हे हार्मोन प्रसूती नंतरही एक ते दीड-दोन वर्षापर्यंत सक्रिय असते. प्रोलॅक्टिन या हार्मोनला मातृत्वाचे हार्मोन असेही म्हणता येईल. या हार्मोनचे मुख्य कार्य स्तनांचा विकास करून दूध निर्मिती करणे हे असते. या व्यतिरिक्त स्त्रियांमध्ये मातृत्वाची भावना निर्माण करण्याचे काम देखील हे हार्मोन करत असते. प्रसूती नंतर बाळाने दुग्धपान केल्यावर रक्तामध्ये हे हार्मोन वाढत असते व आईला पर्याप्त प्रमाणात दूध येऊन बाळाची भूक शमते. हे हार्मोन नैसर्गिक गर्भनिरोधकाचे देखील काम करते. प्रोलॅक्टिन मुळेच बरेच वेळा बाळाला दूध पाजत असतांना या काळात मासिक पाळी येत नाही व गर्भधारणा देखील होत नाही. गर्भधारणा व प्रसूती काळादरम्यान हे हार्मोन सक्रिय होणे नैसर्गिक आहे. त्यामुळे इतर वेळेस हे हार्मोन वाढल्यास त्याला आजाराचे स्वरूप येते. हे हार्मोन किती वाढले आहे या वरून आजाराचे गांभीर्य लक्षात येते. या आजाराला हायपर-प्रोलॅक्टिनेमिया (hyperprolactinemia) असे म्हणतात. या आजाराची विशिष्ट लक्षणे म्हणजे- स्तनातून दुधासारखा स्त्राव येणे, पाळी अनियमित होणे, वंध्यत्व इ. हे होय. 

पुरुषांमध्ये देखील हे हार्मोन वाढल्यास..

नपुंसकत्व येऊ शकते. हार्मोन अति वाढल्यास डोके दुखणे, मळमळ, दृष्टीदोष होणे हे होऊ शकते. वाढलेल्या हार्मोनच्या प्रमाणावरून बहुतेक वेळेस आजारामागील कारणे लक्षात येऊ शकतात.

यावर उपचार काय?

२०० ng/ml या पातळी पेक्षा वर असल्यास बहुतेक करून पिट्युटरी ग्रंथीमध्ये ट्युमर असण्याची शक्यता अधिक असते. ट्युमर असल्यास तज्ज्ञ डॉक्टर योग्य त्या तपासण्या करतात व निदान कायम करतात. हा पिट्युटरी ग्रंथीचा एकमेव असा आजार आहे ज्यात ट्युमर असला तरी शक्यतो ऑपरेशनची गरज पडत नाही. काही विशिष्ट गोळ्यांनी हार्मोनचे प्रमाण कमी होते व ट्युमरचा आकार देखील छोटा होतो. ४० ते २०० ng/ ml या मध्ये असल्यास पिट्युटरी ग्रंथीचे आजार नसून इतर कारणांमुळे प्रोलॅक्टिन हार्मोन वाढलेले असण्याची शक्यता अधिक असते. थायरॉईडचे विकार, काही औषधांचा दुष्परिणाम बरेच वेळा या वाढीला कारणीभूत असतात. सामान्यपणे ऍसिडिटी करता, मानसिक रोगाकरता घेतलेली औषधेही या हार्मोनचे प्रमाण वाढवू शकतात. अशा वेळेस हा आजार निदर्शनास येण्याचे कारण म्हणजे प्रसूती काळ नसतांनाही स्तनातून दूध येणे हे होय. घाबरून जाऊन ते दूध पिळून काढण्याचा प्रयत्न केला जातो. पण असे केल्यास मेंदूला बाळ दूध पीत असल्याचा संदेश पोहचून अधिक दूध निर्मिती सुरु आहेत. त्यामुळे आजार वाढत चालला आहे अशी स्थिती निर्माण होते. या वरील उपाय म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही औषधे बदलून घेणे श्रेयस्कर ठरते. असे दूध येत असल्यास आजार नियंत्रणात आणायचा असल्यास काही काळा करता स्तनांना हाताळणे (अंघोळ करतांना, शरीर संबंध ठेवतांना) टाळावे. प्रोलॅक्टिन कमी असल्यास प्रसूतीकाळात आईला दुधाची निर्मिती कमी होते. त्यामुळे ज्या औषधांचा दुष्परिणाम हे हार्मोन वाढवणे आहे तीच औषधयोजना या वेळी लागू पडत असते. अशीच उपाय योजना करून आई आपल्या दत्तक मुलाला गर्भधारणा न होता स्तनपानाचे सुख घेऊ शकते. असे हे प्रोलॅक्टिन सस्तन प्राण्यांमध्ये असलेले वरदानच ठरते.

( लेखक हार्मोन तज्ज्ञ आहेत.) dryashpal@findrightdoctor.com

टॅग्स : प्रेग्नंसी