Lokmat Sakhi >Health >Pregnancy > बनतेय एक पोषण शिदोरी! फेसबुक ग्रूपही जेव्हा पोषण चळवळीचा भाग होतो.. 

बनतेय एक पोषण शिदोरी! फेसबुक ग्रूपही जेव्हा पोषण चळवळीचा भाग होतो.. 

धान्य, भाज्या वापरून बनविलेल्या पोषक पाककृती तुम्हीही देऊ शकता? - त्याचा उपयोग अंगणवाडी ताईंना होऊ शकेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:23 PM2021-09-07T16:23:27+5:302021-09-07T16:36:10+5:30

धान्य, भाज्या वापरून बनविलेल्या पोषक पाककृती तुम्हीही देऊ शकता? - त्याचा उपयोग अंगणवाडी ताईंना होऊ शकेल!

Poshan Shidori for Anganwadi.. when Facebook groups become part of the nutrition movement. | बनतेय एक पोषण शिदोरी! फेसबुक ग्रूपही जेव्हा पोषण चळवळीचा भाग होतो.. 

बनतेय एक पोषण शिदोरी! फेसबुक ग्रूपही जेव्हा पोषण चळवळीचा भाग होतो.. 

Highlightsआता संपर्क संस्था, युनिसेफ, नवी उमेद आणि मुंबई स्वयंपाकघर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिदोरी’ नावाच्या उपक्रमाने आकार घेतला आहे.हा आहार जास्तीत जास्त पोषक कसा करता येईल याचा विचार संपर्क या संस्थेने केला छायाचित्रं:- गुगल

- भक्ती चपळगावकर 

मुंबई स्वयंपाकघर हा फेसबुक ग्रुप मी पाच वर्षांपूर्वी सुरू केला. मी मूळची मराठवाड्यातली. इतर अनेक लोकांप्रमाणे संधींच्या शोधात मुंबईला शिफ्ट झाले, नंतर याच शहरात विसावले. माझ्यासारखे मुंबईत राहणारे अनेक जण आपल्या आई, आजींनी केलेल्या खाद्यपदार्थांना आठवून हळहळतात. माझ्या आईच्या पाककृती, विस्मृतीत गेलेले पदार्थ आणि उन्हाळी वाळवणं याची माहिती देण्यासाठी मी हा ग्रुप तयार केला आणि लवकरच अनेक जणांनी मुंबई स्वयंपाकघर जॉईन करून आपले खाद्यानुभव या व्यासपीठावर सांगायलाच सुरुवात केली. आज हा ग्रुप मराठवाड्यासह विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र इथल्या पाककृतींचा खजिना झाला आहे. या ग्रुपवर सोप्या पाककृती, परदेशी खाद्यपदार्थ, मराठी खाद्यसंस्कृती, विस्मृतीत गेलेल्या पाककृती, रोजचे पदार्थ या आणि अशा अनेक गोष्टींची चर्चा होते.
आता संपर्क संस्था, युनिसेफ, नवी उमेद आणि मुंबई स्वयंपाकघर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिदोरी’ नावाच्या उपक्रमाने आकार घेतला आहे.

छायाचित्र:- गुगल 

अंगणवाडी ताई तिच्या भागातल्या स्तनदा माता, लहान मुले, गर्भवती महिला यांना पोषक आहार मिळेल याची काळजी घेते. सध्या कोरोनामुळे हा आहार प्रत्यक्ष देता येत नसला तरी ती आयसीडीएस (Integrated child development scheme) तर्फे दिला जाणारा शिधा त्यांना मिळेल याची व्यवस्था करत आहे. ही ताई त्या लहान मुलांची शिक्षिका आणि गर्भवती आणि स्तनदा मातांची मैत्रीणही असते. ती त्यांना भेटून त्यांनी कोणता आहार घेतला पाहिजे याची माहिती देते. हा आहार जास्तीत जास्त पोषक कसा करता येईल याचा विचार संपर्क या संस्थेने केला आणि आपण फेसबुकच्या माध्यमातून रेसिपीज जमा करूयात, त्यातल्या निवडक रेसिपीज खेडोपाडी, अंगणवाडी ताईंकडे पोहोचवल्या तर? असा विचार पुढे आला. त्यातून शिदोरी प्रकल्पाची कल्पना पुढे आली. मुंबई स्वयंपाकघरवर पाककृती शेअर होतील. या रेसिपी मुंबई स्वयंपाकघरचे सदस्य आणि अंगणवाडी सेविका मिळून करतील.

छायाचित्र:- गुगल 

महिन्यातून एकदा एका विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडी ताईंशी झूमद्वारे संपर्क साधायचा, त्यांना पाककृतींचे व्हिडिओ दाखवायचे आणि ते व्हिडिओ इतर अंगणवाडी ताईंनाही पाठवायचे. व्हिडिओत पाककृतींमध्ये असलेल्या पोषणमूल्यांची सुद्धा माहिती असेल. त्यांचा प्रसार त्या पुढे करतील अशी ही योजना आहे.

छायाचित्र:- गुगल 

फेसबुक ग्रुप फक्त चर्चेसाठी न राहता सामाजिक बदलांसाठी अशा तऱ्हेचे एक माध्यम म्हणून वापरला जाण्याचा हा पहिला प्रयोग असावा. सुरुवातीला काही मोजक्या विभागात हा प्रयोग होईल. म्हणजे काही मोजक्या तालुक्यांतल्या अंगणवाडी ताईंना यात सहभागी केले जाईल. यासाठी राज्य सरकार, स्थानिक आमदार आणि सरकारी कर्मचारी यांचीही मदत घेतली जाईल. टेक होम राशनच्या व्यतिरिक्त रानभाज्या, बांधावरल्या भाज्या, गावोगावी उपलब्ध असणारी कडधान्यं, परसदारातला मसाला वापरून केले जाणारे पदार्थ, बाजरी, ज्वारी, कुळीथ यासारख्या पिठांचे पदार्थांच्या पाककृतीसुद्धा शेयर होतील. सरकारी मदतीशिवाय जर त्यांना हे पदार्थ उपलब्ध झाले तर त्यातूनही पोषण मिळेल. शिदोरी उपक्रम हा समाज माध्यमे, सरकारी योजना आणि सामाजिक संस्था यांना एकत्र आणून होणारा एक वेगळा प्रयोग आहे.

(लेखिका  मुक्त पत्रकार आहेत. )

Web Title: Poshan Shidori for Anganwadi.. when Facebook groups become part of the nutrition movement.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.